कोरोनाविरोधात यशाची चिन्हे; तीन आठवड्यांत ७ राज्यांत एकही मृत्यू नाही  

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 10 February 2021

भारतातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचलेल्यांपैकी ९७ टक्के लोक अनुभवाच्या आधारे समाधानी असून त्यांची प्रकृतीही चांगली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

नवी दिल्ली - कोरोनाविरोधातील लढाईत भारताला यश येताना दिसत असून गेल्या तीन आठवड्यांमध्ये सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. तसेच, आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १५ राज्यांमध्ये एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच, भारतातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचलेल्यांपैकी ९७ टक्के लोक अनुभवाच्या आधारे समाधानी असून त्यांची प्रकृतीही चांगली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागच्या पाच आठवड्यांत देशपातळीवर रोजच्या नवीन रूग्णसंख्येत तब्बल ५५ टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे, असा दावा त्यांनी केला. देशातील कोरोनाच्या प्रसाराला करकचून ब्रेक लागला असून महाराष्ट्र, केरळ वगळता अन्यत्र कोरोनाची नवी रूग्णसंख्या व मृत्यूसंख्या चांगलीच आटोक्‍यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र सिरो सर्वेक्षणानुसार देशातील ७० टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्या अजूनही कोरोनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील गटात असल्याने नागरिकांनी अजूनही कोरोना आरोग्य नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची तेवढीच गरज असल्याचेही सरकारने अधोरेखित केले आहे. 

हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड

डॉ. पॉल व भूषण यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून व मागच्या ३ आठवड्यांत ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-१९ मुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. ७ राज्यांत मागच्या ५ आठवड्यांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येत ५५ टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. गेल्या २४ तासांत एकही कोरोना मृत्यू न झालेली राजधानी दिल्ली तर सामूहिक प्रतिरोधक क्षमतेच्या (हर्ड इम्युनिटी) दिशेने झपाट्याने चालल्याचे राज्य सरकारने आकडेवारीसह म्हटले आहे. ३३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत उपचार सुरू असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारंच्याही खाली आली असून मृत्यूचे प्रमाणही वेगाने घटत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रोज देशात २११ जणांचा मृत्यू होत होता व फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात त्यात ५५ टक्‍क्‍यांनी घट झाली असून रोज ९६ जणांचा मत्यू कोरोनामुळे होत आहे. मागील २४ तासांत १४ हजार ०१६ भारतीयांनी कोरोनाला हरविले आहे. भारतात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.२५ टक्के असून याबाबत भारताने अमेरिका, ब्रिटन, इटली, रशिया, ब्राझील व जर्मनीलाही मागे टाकले आहे. 

ईडी लागली पत्रकारांच्या मागे; न्यूज क्लिकच्या ऑफिसवर छापा

येथे तीन आठवड्यांत एकही मृत्यू नाही
अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, दादरा आणि नगर हवेली, मिझोराम, नागालँड आणि लक्षद्वीप बेटे

दक्षिण आफ्रिकेचा विषाणू नाही
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूचा भारतात संसर्ग झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, या प्रकारचा विषाणू अत्यंत वेगाने पसरतो, असेही त्यांनी सांगितले. कोव्हिशील्ड लस सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर परिणामकारक ठरत नाही, तर गंभीर रूग्णांवरच ती प्रभावी ठरते असे आढळून आल्याचेही त्यांनी म्हटले. कोरोना लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करणे हे आरोग्य यंत्रणेचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. 

हे वाचा - नवरीचा व्हायरल व्हिडिओ तर ट्रेलर होता; पिक्चर अभी बाकी है!

देशातील स्थिती
केवळ ५ राज्यांतून कोरोनाचे ८१ टक्के रूग्ण
७० टक्के रुग्ण महाराष्ट्र व केरळमध्ये  
उपचार सुरू असलेल्यांची संख्या १.३२ टक्के 
बरे होणारे १ कोटी ५ लाख ४८ हजार ५२१ 
१२ राज्यांमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक लसीकरण
११ राज्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी लसीकरण
लसीकरणात वेगाने ६० हजारांचा टप्पा ओलांडला

पहिल्या टप्प्यातील लसीकरण
आरोग्य सेवक   - ५४,८२,१०२
कोरोना  योद्धे- ७,७६,९०६
एकूण- ६२, ५९,००८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india victory in the battle against Corona No deaths in 7 states in three weeks