माझा छोटा भाऊ (नितीश) हत्यारा आहे: लालूप्रसाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

नितीशकुमार यांना फक्त खुर्ची हवी आहे. भाजपसोबत कधीही जाणार नाही, असे नितीश यांनी म्हटले होते. नितीश यांना बिहारमधील जनतेला धोका दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल द्वेष असल्याचे ते म्हणत असे. पण, आता त्यांच्यासोबतच ते सत्तेत सहभागी झाले आहेत. नितीश कुमार आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कुशीत जाऊन बसले आहेत.

पाटणा : तेजस्वी बस बहाना था, उनको भाजप के साथ जाना था, असे सांगत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका करत माझा छोटा भाऊ हत्यारा असल्याचा आरोप केला आहे. भ्रष्टाचारापेक्षा हत्येचा गुन्हा मोठा असल्याचाही टोला त्यांनी नितीशकुमारांना लगावला आहे.

लालूप्रसाद म्हणाले, की नितीशकुमार यांना फक्त खुर्ची हवी आहे. भाजपसोबत कधीही जाणार नाही, असे नितीश यांनी म्हटले होते. नितीश यांना बिहारमधील जनतेला धोका दिला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल द्वेष असल्याचे ते म्हणत असे. पण, आता त्यांच्यासोबतच ते सत्तेत सहभागी झाले आहेत. नितीश कुमार आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कुशीत जाऊन बसले आहेत. नितीश कुमार यांच्यावर 16 नोव्हेंबर 1991 ला हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्यावर सिताराम सिंह यांच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. नितीश यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही याबाबतचा उल्लेख केलेला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांपेक्षा हा आरोप कितीतरी मोठा आहे. मला वाटतंय बरे झाले, खोटारडे आणि संधीसाधू नितीश आमच्यातून निघून गेले. नितीश यांनी भाजपसोबत मिळून सीबीआयकडे गुन्हा दाखल केला.

नितीश कुमार यांचा सांप्रदायिकतेला असलेला विरोध हा ढोंग होते. ते खऱ्या अर्थाने भस्मासुर निघाले. आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे, लालूप्रसाद यांनी सांगितले.

बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या 'अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला होता. महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावरील नवे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज (गुरुवार) सकाळी नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री झाले. या युतीवर लालूप्रसाद यादव यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. 

नरेंद्र मोदी यांना भाजपने 2013 मध्ये पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी दिल्यावर नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली होती. तीन वर्षांनी घटनाक्रम बरोबर उलट फिरला आहे. भाजप या सरकारमध्ये सहभागी झाले आहे. लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्यावरील राजीनाम्याचा दबाव वाढला होता. संयुक्त जनता दलाने वेळोवेळी इशारा दिल्यानंतर देखील लालूप्रसाद यादव यांनी तो गांभीर्याने घेतला नव्हता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Lalu Prasad Yadav reacts after Nitish Kumar swearing as Bihar cm