मलबार युद्धसराव; चीनला चोख प्रत्युत्तर

Chin
Chin

विशाखापट्टण - भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार शक्तीशाली देशांचा सहभाग असलेल्या मलबार युद्धसरावाला आज बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली. हा युद्धसरावाचा चार दिवसांचा हा पहिला टप्पा असून दुसरा टप्पा १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान अरबी समुद्रात होणार आहे. चीनच्या विस्तारवादाच्या पार्श्वभूमीवर हा सराव होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत, जपान आणि अमेरिका यांची नौदले संयुक्तरित्या मलबार युद्धसराव करतात. भारत-अमेरिका यांच्यात १९९२ मध्ये सराव सुरू झाला. भारताने १९९८ मध्ये पोखरणमध्ये अणूचाचणी केल्यानंतर १९९८-२००१ दरम्यान सराव झालेला नाही. भारतावर अमेरिकेने त्यावेळी लष्करी आणि आर्थिक निर्बंध लादले होते. २००२ मध्ये त्याचे पुनरूज्जीवन झाले. 

सरावात सहभागासाठी ऑस्ट्रेलिया सातत्याने विनंती करत असूनही भारताने चीनकडून चुकीचा अन्वयार्थ लावला जावू नये म्हणून विरोध केला होता. तथापि, लडाखमध्ये चीनने केलेली जमवाजमव आणि दक्षिण चीन समुद्रासह हिंद महासागरातील त्याचा वावर पाहून भारताने ऑस्ट्रेलियाच्या सहभागाचे स्वागत केलंय. भारत आधीपासूनच "क्वाड''चा (क्वाड्रिलॅटर सिक्‍युरिटी डायलॉग) सदस्य आहे. त्याच्या नोव्हेंबर२०१९ मधील बैठकीत त्याचा सहभाग होता. हिंद-प्रशांत भागात एकमेकांना संरक्षणात्मक आणि व्यूहरचनात्मक सहकार्य देणे हा "क्वाड"चा उद्देश असून, भारताबरोबरच अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया त्याचे सदस्य आहेत. 

अमेरिका, ऑस्ट्रेलियाशी सहकार्य 
सरावानिमित्ताने गुरूग्राममधील भारतीय नौदलाच्या हिंद महासागर फ्युजन सेंटरमध्ये (आयएफसी-आयओआर) ऑस्ट्रेलिया लायझन ऑफिसर नेमणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील म्युच्युअल लॉजिस्टिक्‍स सपोर्ट ऍग्रीमेंटनुसार एकमेकांच्या तळांचा वापर, इंधनाची आदानप्रदान आणि कार्यपद्धतीत गतीमानता आणली जाईल. भारताने अशा स्वरूपाचा करार अमेरिकेशी २०१६ मध्ये लॉजिस्टिक्‍स एक्‍सचेंज मेमरॅंडम ऑफ ऍग्रीमेंट या नावाने केलेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना हिंद-प्रशांत महासागराच्या भागात चीनकडून कुरापतीचा आणि संरक्षण सज्जतेला आव्हानांचा धोका वाटतो. त्याला तोंड देण्यासाठीची ही व्यवस्था आहे. 

जपानचा सहभाग
मलबार युद्धसरावामध्ये जपानचा कायमचा सहभाग सुरू झाला तो २०१५ पासून. २००७च्या सरावात अस्थायी स्वरूपात जपान सहभागी झाला तेव्हा चीनने आक्षेप घेतला होता. त्यानंतरही २००९, २०११ आणि २०१४ मध्ये जपानचा सरावात सहभाग राहिलाय. याआधी २०१८ मधील सराव फिलिपिन्स समुद्रात तर २०१९ मधील सराव जपानच्या किनाऱ्यावर झाला होता. यावेळी तो बंगालच्या उपसागरात होत आहे. अमेरिकेची सुरपकॅरियर निमित्झ आणि रोनाल्ड रेगन अनुक्रमे आखातात आणि बंगालच्या उपसागरात असल्याने त्यांचा सहभाग राहू शकतो. जपानकडून झुमो क्‍लास हेलिकॉप्टर असतील, विनाशिका होबर्ट ऑस्ट्रेलिया धाडेल, असा अंदाज आहे.

सरावात काय होते 
विमानवाहू नौकांचा सहभाग, पाणबुड्यांचा माग, उभय देशांच्या युद्धनौका, पाणबुड्या व इतर सुविधांचा एकमेकांच्या जवानांनी वापर करणे, त्यांवरील यंत्रणांची हाताळणी करणे, तेथे प्रशिक्षण घेणे अशा बाबी युद्धसरावात होत असतात. ऑस्ट्रेलियाच्या यावेळच्या सहभागाने क्वाड संकल्पनेला बळकटीच मिळणार आहे.

त्सुनामीने आणले जवळ 
२००४ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर हिंद-प्रशांत महासागरातील देशांना सहकार्यासाठी चार देश एकत्र आले तेव्हाच चीनने अस्वस्थता व्यक्त केली होती. त्याला पुन्हा २०१७ मध्ये उजाळा मिळाला. त्यानंतर व्हिएतनाम, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंड यांच्याशी मासिक पातळीवर सहकार्यावर चर्चा सुरू असते.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com