मुझे फरक पडता है : विराट कोहलीचे दिल्ली प्रदूषणावर भाष्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

कोहलीने प्रदूषण कमी करण्याबाबत काही उपाय सुचवले. तो म्हणाला, ''जेव्हा जमेल तेव्हा लोकांनी आपला प्रवास इतरांसोबत शेअर करावा अशी माझी विनंती आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत, दिल्लीतील नागरिकांना येथील वाढते प्रदूषण कमी करण्याबाबत आवाहन केले आहे. ''दिल्ली, आपल्याला बोलायची गरज आहे'', असे म्हणत, कोहलीने, #MujheFarakPadtaHai हा हॅशटॅग वापरून दिल्लीकरांना प्रदूषण पातळी कशी कमी करता येईल याबाबत उपाय सुचवले.

'दिल्लीमध्ये प्रदूषणाची स्थिती कशी आहे हे मला ठाऊक आहे. आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे, कारण बरेच लोक प्रदूषण कमी करण्याबाबत फक्त चर्चा आणि वाद-विवाद करताना दिसतात. आपण त्याबद्दल काहीच करत नाही; तर आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रदूषणाविरोधात सामना करू. दिल्लीतील प्रदूषण कमी करणे ही आपली जबाबदारी आहे,' असे कोहली म्हणाला.

या व्हिडिओमध्ये कोहलीने प्रदूषण कमी करण्याबाबत काही उपाय सुचवले. तो म्हणाला, ''जेव्हा जमेल तेव्हा लोकांनी आपला प्रवास इतरांसोबत शेअर करावा अशी माझी विनंती आहे. तसेच नागरीकांनी बस, मेट्रो, ओला अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. आपण आठवड्यातून एकदा असे केले तरी प्रदूषणात मोठा फरक पडू शकतो, कारण लहान कृतीदेखील मोठा बदल घडवू शकतात. तुम्हाला पटलं तर आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला पाठिंबा दर्शवा.''

देशाच्या राजधानीत मागील आठवड्यापासून प्रदूषित हवेमुळे दाट धुरके पडत आहे. त्यामुळे, प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. एनसीआरमधील बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, हवेतून पाण्याचे फवारे उडविण्यावर बंदी घातली आहे. मागील आठवड्यात एआयआयएम्एसचे महासंचालक रणदीप गलेरीया यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची तुलना लंडनच्या 1952च्या संकटाशी केली. 'दिल्लीतील प्रदूषणाबाबत गंभीर पावले उचलली नाहीत तर, दिल्लीलादेखील अशाच प्रकारच्या 'वायू प्रदूषण आपत्तीला' सामोरे जावे लागेल जशी 65 वर्षांपूर्वी लंडन मध्ये आली होती.' असे पर्यावरण तज्ज्ञसुद्धा मान्य करतात.    

'शहरातील वाढत्या व धोकादायक प्रदूषण पातळीमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी त्रास असलेल्या व्यक्तींची संख्या 20 टक्क्यांपर्यंत गेली आहे.' अशी माहिती गलेरीया यांनी दिली. तसेच त्यांनी असाही इशारा दिला की, प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे फक्त एनसीआरमध्ये सुमारे 30,000 लोक आपले प्राण गमावू शकतात, अशी माहिती त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱया रूग्णांच्या संख्येवरून दिली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news virat kohli on delhi pollution we need to talk