‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी

mukhtar abbas naqvi
mukhtar abbas naqvi

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे.

अयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे.

निकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल.

‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत? यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com