हरिद्वार ते उनाऊ दरम्यान गंगा नदीवर आता "नो डेव्हलपेंट झोन'

पीटीआय
गुरुवार, 13 जुलै 2017

हरिद्वार ते उनाऊ या भागात वाहणाऱ्या गांगेच्या पात्रापासून 100 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास या योजनेन्वये बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर, गंगा नदीच्या पात्राच्या 500 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही स्वरुपाचा कचरा फेकण्यात येऊ नये, असेही लवादाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

नवी दिल्ली - राष्ट्रीय हरित लवादाकडून आज (गुरुवार) गंगा नदीच्या एकूण लांबीपैकी उत्तराखंडमधील हरिद्वारपासून उत्तर प्रदेशमधील उनाऊ या ठिकाणापर्यंत "नो डेव्हलपमेंट झोन' लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. हरिद्वार ते उनाऊ या भागात वाहणाऱ्या गांगेच्या पात्रापासून 100 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास या योजनेन्वये बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर, गंगा नदीच्या पात्राच्या 500 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही स्वरुपाचा कचरा फेकण्यात येऊ नये, असेही लवादाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकारकडून जजमाउ ते उनाओ या भागामधील जनावरांच्या चामड्याचे कारखाने येत्या सहा आठवड्यांत हलविण्यात यावेत, असे निर्देश लवादाकडून देण्यात आले आहेत. गंगेच्या काठावरील चामड्याचे कारखाने हे या नदीच्या प्रदुषणामागील एक मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. गंगा प्रदुषित करणाऱ्यास आता 50 हजार रुपयांचा पर्यावरण दंड ठोठाविण्यात येणार आहे. याचबरोबर गंगा वा तिच्या उपनद्यांवर करण्यात येत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासंदर्भातही उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथीला सरकारांना लवादाकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर,

गंगेच्या शुद्धीकरणासंदर्भात लवादाकडून संमत करण्यात आलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी एक निरीक्षण समितीही स्थापन करण्यात आली आहे.
गंगा नदीचे शुद्धीकरण हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. पायाभूत सुविधा विकास व पर्यावरण अशा दोन्ही दृष्टिकोनामधून गंगा नदीचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, लवादाकडून देण्यात आलेले हे निर्देश संवेदनशील आहेत.

जागतिक बॅंकेच्या 4200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत अलाहाबाद ते हल्दिया हा 1600 किमीचा जलमार्ग हा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करण्याचे केंद्र सरकारने योजिले आहे. 

या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून वाराणसी ते हल्दिया हा 1300 कि.मी. अंतराचा मार्ग सध्या विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाकडे उत्तर भारतातील वाहतुकीची प्रमुख वाहिनी म्हणून पाहिले जात आहे, कारण हा मार्ग उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगाल मधून जातो. या प्रकल्पामुळे अतिवर्दळीच्या वाहतूक पट्ट्यातील कोंडी कमी होईल असे प्रकल्प दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुमारे दीड महिन्यापूर्वी रात्री झालेल्या बैठकीत "नमामी गंगे' या अभियानाचा आढावा घेतला आहे. या अभियानाअंतर्गत सरकारने आत्तापर्यंत कोणकोणती कामे कशा पद्धतीने केली आहेत, याचे सादरीकरण करण्यात आले होते. 

गंगा नदीविषयी : 

  • भारतातील सर्वात लांब नदी 
  • लांबी 2,510 कि.मी. 
  • जलवाहन क्षेत्र 8,38,200 कि.मी. 
  • गंगेचा उगम - उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री "भागीरथी' या नावाने उगम 
  • देवप्रयाग येथे अलकनंदा नदी ही गंगेला मिळते 
  • देवप्रयागनंतर भागीरथी-अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला "गंगा' हे नाव प्राप्त होते. 
  • बांगलादेशमध्ये गंगा "पद्मा' नावाने वाहते. 
  • पं. बंगाल व बांगलादेश या भागात गंगेच्या असंख्य शाखांचा प्रवाह होऊन जगातील सर्वात मोठा विस्तीर्ण 58,782 कि.मी. क्षेत्रफळाचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. 
  • गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या मुखालगत 16,900 चौ. कि.मी. विस्ताराचा अरण्यमय व दलदलीचा सुंदरबन हा प्रदेश विखुरलेला आहे. हा प्रदेश बंगाली वाघांचे माहेरघर आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: NGT declares ‘No-Development Zone’ near river Ganga