नोटाबंदीवर टीका केलेल्या अभिजित बॅनर्जींना नरेंद्र मोदी काय म्हणाले?

nobel prize winner abhijit banerjee meets pm narendra modi in delhi residence
nobel prize winner abhijit banerjee meets pm narendra modi in delhi residence

नवी दिल्ली : अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर बॅनर्जी यांनी टीका केली होती. तर, काँग्रेसच्या न्याय योजनेचे अभिजित बॅनर्जी शिल्पकार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि बॅनर्जी यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?
अभिजित बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. मानव जातीच्या सबलीकरणासाठी त्यांचे असणारे व्हिजन मला स्पष्ट जाणवले. आमच्यात वेगवेगळ्या विषयांवर खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला अभिमान आहे. मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

तिघांना संयुक्तरित्या नोबेल
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्च विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या बॅनर्जी यांना त्यांची पत्नी इस्तर डिफ्लो आणि मायकेल क्रेमर यांच्यासोबत संयुक्तपणे अर्थशास्त्रातील नोबले प्रदान करण्यात आले आहे. जगातील गरिबी दूर करण्यासाठीचे सिद्धांत मांडल्याबद्दल या तिघांना नोबेल प्रदान करण्यात येत आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय वंशाचे बॅनर्जी सध्या भारतात आले आहेत. कोलकात्यातील आपल्या आईला भेटण्यासाठी ते भारतात आले असताना त्यांना पंतप्रधान मोदींनी भेटीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार आज, दुपारी बाराच्या सुमारास बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. पण, सत्ताधारी भाजप किंवा पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन न केल्यामुळं सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा ठरला होता. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्वतः त्यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

जेएनयूमध्ये शिक्षण
अभिजित बॅनर्जी मुळचे कोलकात्याचे आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांचे उच्चशिक्षण झाले. त्यामुळे डाव्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. गरिबीसाठी  केल्या संशोधनाबद्दल सांगताना 'माझे बालपण कोलकात्यात गेले आहे. त्यामुळे गरिबी काय आहे हे मी जवळून पाहिले आहे,' अशी प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com