esakal | पंजाब देणार चीनला मोठा दणका, सायकल उद्योगात हालचाली सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

cycle

दरवर्षी भारतात 22 मिलियन तर चीनमध्ये 90 मिलियन सायकलची निर्मिती केली जाते. भारतातून 5 टक्के तर चीनमधून 67 टक्के सायकलींची निर्यात केली जाते.

पंजाब देणार चीनला मोठा दणका, सायकल उद्योगात हालचाली सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत चीन सीमेवर वाद सुरु असताना देशातील सर्वात मोठी सायकल निर्मिती करणारे केंद्र असलेल्या लुधियानमध्ये आता याचा बदला घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. चीनमधून 70 टक्क्यांहून अधिक सायकलच्या भागांची आयात केली जाते. त्यासाठी चीनवर असलेलं अवलंबित्व कमी करण्यासाठी सायकल उद्योग समुहात हालचाली केल्या जात आहेत. यासाठी मोठ्या कंपन्यांचा शोध घेतला जात आहे. पंजाबमधील सायकल कंपन्यांचा देशातील एकूण सायकल उद्योगाच्या 7 हजार कोटींच्या उलाढालीत 90 टक्के वाटा आहे. आता या उद्योगाने टप्प्या टप्प्याने आयात कमी करण्यासाठी तयारी करत आहे. 

चीनवर अवलंबून राहणं कमी करण्यासाठी लुधियानातील सायकल निर्मिती उद्योगाने पावले उचलली आहेत. यासाठी सायकल जगतातील दिग्गज कंपनी हिरो सायकलने बुधवारी युनायटेड सायकल पार्ट्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (यूसीपीएमए) च्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यावेळी हिरो सायकलचे अध्यक्ष पंकज मुंजाल यांनी लहान कंपन्यांना टेक्निकल सपोर्ट देऊ असं सांगितलं. हिरो सायकलचे व्यवस्थापकीय संचालक एस के रॉय म्हणाले की, टप्प्या टप्प्याने चीनवर अवलंबून राहणं कमी करण्यासाठी आपल्याला सुरुवात करण्याची गरज आहे.

रॉय यांनी सांगितलं की, आम्ही युसीपीएमएच्या सदस्यांना ब्लॅक रोडस्टर सायकलच्या विक्रीसाठी जास्त अवलंबून राहणे कमी करून त्यातून बाहेर पडण्याबाबत सांगितलं. सध्याच्या परिस्थितीत आपण उद्योग, व्यवसायाच्या संधीकडे पाहिलं पाहिजे. चांगल्या दर्जाच्या सायकलचे पार्ट तयार करण्यासाठी आवश्यक अभ्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. 

हे वाचा - आणखी एका शेजाऱ्यानं भारताशी घेतला पंगा, निर्यात रोखली

युसीपीएमएचे उपाध्यक्ष गुरुचरण सिंग जेम्को म्हणाले की, आम्ही चीनकडून पुर्ण सायकल गिअर शिफ्टर्स, ब्रेक, क्लिपर्स इत्यादींची आयात करतो. हे लगेच थांबवता येणार नाही. मात्र ही आयात टप्प्या टप्प्याने कमी करता येईल. आम्ही नवीन कौशल्ये शिकून नव निर्मिती करू. 

युसीपीएमएचे माजी अध्यक्ष चरणजीत सिंग विश्वकर्मा म्हणाले की, अलॉय फ्रेम्स, फायबर फ्रेम्स, कार्बन फ्रेम्स यांची निर्मिती अद्याप भारतात केली जात नाही. त्यामुळे देशात 1 लाखाहून अधिक सायकल्स दर महिन्याला चीनमधून आयात केल्या जातात. चीनवर हा उद्योग मोठ्या प्रमाणावर अवलंबून असून या फ्रेम्सची निर्मिती भारतीय कंपन्यांनी करण्याची आवश्यकता आहे.

याबाबत रॉय म्हणाले की, बाजारात उतरण्याची हीच वेळ होती. आपण हलक्या प्रतीच्या किंवा वजनाच्या फ्रेम तयार करण्याचा प्रयोग करत नाही. आपण एक नवी सुरुवात करायला हवी. ग्राहकांच्या अपेक्षा समजून आणि बाजारातील गरज लक्षात घेऊन पावले उचलायला हवीत असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - दलित आहे म्हणून उच्चवर्णीय भारतीयांकडून अपमानास्पद वागणूक

दरवर्षी भारतात 22 मिलियन सायकलची निर्मिती होते आणि त्या विकल्या जातात. त्यातील 16 मिलियन इतकी विक्री आठ मोठ्या कंपन्यांची असते. यातील 50 टक्के वाटा ब्लॅक रोडस्टर सायकलचा तर 24 टक्के फॅन्सी मॉडेल आणि 21 टक्के मुलांच्या सायकलचा आहे. यात फक्त 5 टक्के वाटा निर्यात करण्यात येणाऱ्या सायकलचा आहे. दुसरीकडे चीनमध्ये दरवर्षी 90 मिलियन सायकलची निर्मिती होते. त्यातील 60 मिलियन सायकल जगभरात निर्यात केल्या जातात. ही आकडेवारी पाहता चीनशी स्पर्धा कठीण आहे. 

रॉय यांनी सांगितलं की, चीनकडून उत्कृष्ट अशा सायकल आणि त्याचे पार्ट आयात केले जातात. अनेक युनिट्ससुद्धा लहान मुलांच्या आणि फॅन्सी मॉडेलच्या सायकलचे पार्ट  भारतात तयार करण्यापेक्षा ते आयात करण्यावर भर देतात. 

"इंदिरा गांधींच्या लेह भेटीनंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले; आता मोदी काय करतात ते पाहुया?"

ऑल इंडिया ट्रेडर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स फोरमचे अध्यक्ष बादीश जिंदल म्हणाले की, चीनकडून आयात करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनाबाबत भारत सरकारने किमान 10 वर्षांसाठी काहीतरी पॉलिसी तयार करण्याची गरज आहे. फक्त चर्चेनं काही होणार नाही. अनेक निर्मात्यांना वाटतं की जोपर्यंत आयात पूर्ण थांबवली जाणार नाही. तैवान, व्हिएतनाम किंवा युरोपियन युनियनकडे वळणार नाही तोपर्यंत बदल होण्याची शक्यता नाही. हे सगळं एका रात्रीत होणार नाही. 

2019-20 आर्थिक वर्षात भारतातील सायकल कंपन्यांनी 118 मिलियन अमेरिकन डॉलरचे सायकल पार्ट आयात केले होते. यातील 70 टक्के चीनमधून होते. एकूण आयातीमध्ये 2018-19 मध्ये ही आकडेवारी 255 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. तर 2017-18 मध्ये 241 मिलियन अमेरिकन डॉलर होती. यही आकडेवारी पाहता ऑल इंडिया सायकल्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सांगितलं की, 2019-20 मध्ये एकूण आयातीमध्ये घट झाली. यामागे कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कारणीभूत होती. 

हे वाचा - मोदींच्या मनात नेमकं काय सुरुय? चीनला दणका देण्याचा विचार?

एआयसीएमचे महासचिव डॉक्टर केबी ठाकुर म्हणाले की, एकूण आयातीमध्ये 70 ते 76 टक्के चीनचा वाटा असतो. नेहमीच हे वाढत राहिलं आहे. मात्र पहिल्यांदाच यात घट झाली आहे. कोरोनामुळे चीनकडून नोव्हेंबरपासून येणाऱ्या मालावर निर्बंध आले होते. मात्र आता देशात चिनविरोधी वातावरण तयार होत आहे. याचा प्रभाव चालु आर्थिक वर्षात बघायला मिळेल. 

दरम्यान, हिरो सायकल्सने म्हटलं की, चीनवर असलेलं अवलंबित्व कमी करण्यासाठी टेक्नॉलॉजी एकमेकांसोबत शेअर करायला आवडेल. युसीपीएमएने आयात कमी करण्यासाठी नवीन कौशल्य मिळवण्यासाठी अनेक इच्छुक कंपन्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.