सगळ्यात मोठा मॅच फिक्सर भारताच्या ताब्यात; १२ दिवसाची कोठडी

वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

संजीव चावला याचे भारतात हस्तांतर

नवी दिल्ली : क्रिकेट सामन्यांच्या फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि तथाकथित बुकी संजीव चावला याचे आज ब्रिटनहून भारतात हस्तांतर करण्यात आले. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या गुन्हेगार हस्तांतर करारांतर्गत प्रथमच एका मोठ्या प्रकरणातील गुन्हेगाराचे हस्तांतर झाले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी कप्तान हॅन्सी क्रोनिए याचा समावेश असलेले हे प्रकरण आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली पोलिसांच्या पथकाने आज सकाळी संजीव चावलाला ब्रिटनहून भारतात आणले. त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या फेब्रुवारी २००० मधील भारत दौऱ्यावेळी चावलाने क्रोनिएला हाताशी धरत फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. ब्रिटिश न्यायालयात सादर झालेल्या कागदपत्रांनुसार चावला हा व्यवसायासाठी १९९६ मध्ये बिझनेस व्हिसावर ब्रिटनमध्ये आला होता. मात्र, भारताने त्याचा पासपोर्ट रद्द केल्यावर पाच वर्षांनंतर त्याने ब्रिटनचा पासपोर्ट मिळविला होता. भारताने १९९२ मध्ये ब्रिटनबरोबर गुन्हेगार हस्तांतर करार केला होता. त्यानंतर प्रथमच एका मोठ्या प्रकरणातील गुन्हेगाराचे हस्तांतर झाले आहे.

केजरीवालांच्या शपथविधीचे कोणा-कोणाला निमंत्रण

भारताने केलेल्या हस्तांतराच्या अर्जाविरुद्ध चावला याने मानवाधिकार न्यायालयात अपील केले होते. ते अपील गेल्या आठवड्यात फेटाळण्यात आले होते. चावला याला भारतात आणल्यावर त्याच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन तुरुंगाच्या स्वतंत्र खोलीत त्याला ठेवले जाईल, ही भारताने दिलेली हमी ब्रिटनमधील न्यायालयाने मान्य केली.

न्यायालयाच्या आवारातच बाँबस्फोट; तीन जखमी

चावलाला १२ दिवसांची कोठडी
ब्रिटनहून हस्तांतर केलेल्या बुकी संजीव चावला याला आज पोलिसांनी न्यायालयात सादर केले असता त्याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी त्याला १४ दिवस कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती. पाच सामन्यांच्या फिक्सिंगमध्ये चावलाचा सहभाग असल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjeev Chawla Accused In 2000 Match Fixing Scandal Extradited From UK