esakal | गुजरात सरकारने नाही, लोकांनीच पुकारला १० दिवसांचा लॉकडाऊन

बोलून बातमी शोधा

Valsad Lockdown

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुका आणि अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामने हे कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यास कारणीभूत ठरले आहेत.

गुजरात सरकारने नाही, लोकांनीच पुकारला १० दिवसांचा लॉकडाऊन
sakal_logo
By
वृत्तसंस्था

Lockdown : अहमदाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सामान्यांपासून ते केंद्र सरकार सर्वांनाच जेरीस आणलं आहे. दररोज मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी वीकेंड लॉकडाउन किंवा आठवड्याभराचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही ठिकाणी कोणतेच निर्बंध नसल्याचे चित्रही दिसत आहे. गुजरातमध्येही कोरोनाने विक्राळ रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. वलसाडमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत तेथील लोकांनीच १० दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. येथील व्यापारी आणि दुकानदारांच्या संघटनेने जिल्हाधिकारी आर. आर. रावल आणि भाजप आमदार भरत पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची घोषणा केली.

हेही वाचा: कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर; दुपटीने वाढली संख्या

सोमवारी (ता.१९) वलसाड जिल्ह्यात कोरोनाचे ७१ नवे रुग्ण आढळून आले असून तेथील रुग्णसंख्या २ हजार १०१ वर पोचली आहे. तसेच ६ जणांचा मृत्यूही झाला होता. सध्या ४१६ रुग्णांवर सरकारी तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. १० दिवस लॉकडाउनची घोषणा होताच अनेकांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानेही बंद केली. त्यामुळे शहरातील मॉल आणि मेगा स्टोअरच्याबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच भाजी मंडईतही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: देश लॉकडाऊन होतोय; केरळ ते जम्मू प्रत्येक राज्यात निर्बंध

दरम्यान, १ एप्रिलपासून गुजरात सरकारने कोणत्याही राज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अहवाल आणणे बंधनकारक केले होते. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग केली जात आहे. ज्यांच्याकडे कोरोना चाचणी अहवाल नाहीत, त्यांच्याकडून ८०० रुपये शुल्क आकारून त्यांची विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक याठिकाणी तपासणी केली जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. राज्यातील उद्याने आणि शाळा आधीच बंद करण्यात आली आहेत. तसेच अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, भावनगर, जामनगर, गांधीनगर आणि जुनागडसह इतर २० शहरांत रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुन्हा आढळले अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ

गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुका आणि अहमदाबादच्या मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामने हे कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यास कारणीभूत ठरले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुजरात बोर्डने दहावी आणि बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.