esakal | जम्मू ते केरळ व्हाया महाराष्ट्र; कुठे लॉकडाऊन, कुठे निर्बंध?
sakal

बोलून बातमी शोधा

Corona lockdown

काही राज्यांनी एक आठवड्याचा तर काही राज्यात दोन आठवड्याचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय नाइट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. एकीकडे लोकांचे जीव वाचवणं आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था सुरु ठेवण्याचं आव्हान राज्य सरकारांसमोर आहे.

जम्मू ते केरळ व्हाया महाराष्ट्र; कुठे लॉकडाऊन, कुठे निर्बंध?

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासात देशात जवळपास 3 लाख नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 2023 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील अनेक राज्ये सध्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं दिसत आहे. काही राज्यांनी एक आठवड्याचा तर काही राज्यात दोन आठवड्याचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय नाइट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. एकीकडे लोकांचे जीव वाचवणं आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था सुरु ठेवण्याचं आव्हान राज्य सरकारांसमोर आहे. लसीकरण मोहिम लशीच्या तुटवड्यामुळे मंदावली आहे. तर रुग्ण संख्येत अचानक मोठी वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत आहे.

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध

महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध आहेत. दरम्यान, राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी लॉकडाऊन करण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत झाल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा लवकरच करतील असंही त्यांनी म्हटलं होतं. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा सध्या बंद आहेत. तसंच रात्रीची संचारबंदी असून वीकेंड लॉकडाऊन आहे. अनेक शहरांमधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली असून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येत आहे.

हेही वाचा: Corona Vaccine: आत्ताच लस मिळत नाहीये, 1 मे नंतर काय होईल !

जम्मू काश्मीर

जम्मू काश्मीरमध्ये आठ जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, अनंतनाग आणि कुपवाडा जिल्ह्यांचा समावेश आहे.

ओडिशात नाइट कर्फ्यू

5 एप्रिलपासून ओडिशातील दहा जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसंच ओडिशातील पश्चिम भागातील कर्फ्यू हा 5 एप्रिलनंतर पुन्हा वाढवला.

हेही वाचा: कोरोनाचा उद्रेक! 24 तासात जवळपास 3 लाख रुग्ण, 2000 मृत्यू

मणिपूरमध्ये परीक्षा पुढे ढकलल्या

कोरोनाला रोखण्यासाठी मणिपूरमध्येही रात्री सात वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय़ घेतला गेला आहे. रात्रीची संचारबंदी कधीपर्यंत असेल हे मात्र सांगण्यात आलेलं नाही. याशिवाय राज्यात परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दिल्लीत उद्रेक होणार?

राजधानी दिल्लीला देखील कोरोनाने विळखा घातला आहे. पुढील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या टोक गाठणार असल्याचा स्पष्ट इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला. रुग्ण संसर्गाचा दर हा ५० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 26 एप्रिलला पहाटे 5 पर्यंत सहा दिवस दिल्लीत लॉकडाऊन सुरु राहील. दिल्लीत मागील 24 तासांत 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी कोविड-19 चे 24375 नवे रुग्ण समोर आले होते.

हेही वाचा: लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय; PM मोदींचा राज्यांना सल्ला

हरियाणा

हरियाणातही नाइट कर्फ्यू असून रात्री दहा ते सकाळी पाच या वेळेत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच सर्व शाळा आणि कॉलेजेस 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

पंजाबमध्ये 10 दिवस कडक निर्बंध

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 20 ते 30 एप्रिल पर्यंत सिनेमा हॉल, बार, जिम, कोचिंग सेंटर आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टॉरंटसुद्धा रविवारी बंद राहणार आहेत. बस, रिक्षा, टॅक्सीमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्केच प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे.

हेही वाचा: पुन्हा आढळले अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ

उत्तर प्रदेशात 6 जिल्हे पूर्ण लॉकडाऊन

उत्तर प्रदेशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथ यांना राज्यातील पाच जिल्ह्यात पूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूरचा समावेश आहे. सोमवारी रात्रीपासून लॉकडाऊन लागू केला आहे. उच्च न्यायालयाने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू कऱण्याचा विचार सरकारने करावा असं म्हटलं आहे. कोरोनामुळे उत्तर प्रदेशात सोमवारी दिवसभरात 167 जणांचा मृत्यू झाला असून 28 हजार 287 नवीन रुग्ण सापडले आहेत.

गुजरात

गुजरातमध्येही कोरोनामुळे भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातील 20 शहरांमध्ये नाइट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री 8 ते 6 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात प्रवासासाठी कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.

हेही वाचा: गुजरातमध्ये हॉस्पिटल फुल्ल; मशिदीत सुरू केलं कोविड सेंटर

छत्तीसगढमध्ये लॉकडाऊन

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं खबरदारी म्हणून छत्तीसगढच्या सर्व जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या तारखांना सर्व जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. याआधीही वेगवेगळ्या तारखांना जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 13 हजार 834 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 165 जणांचा मृत्यू झाला.

तेलंगणा सरकारकडे 24 तासांचा वेळ

तेलंगणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आठवडाभर लॉकडाऊनबाबत विचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ दिला आहे. एकतर रात्रीची संचारबंदी किंवा आठवड्याचा लॉकडाऊन असे पर्याय न्यायालयाने सुचवले आहेत. सरकारने काही निर्णय घेतला नाही तर आम्ही आदेश देऊ असंही न्यायालयाने बजावलं आहे.

हेही वाचा: दिल्लीत आठवडाभराचा कडक लॉकडाउन, सोमवारपर्यंत राजधानी बंद

केरळमध्ये 15 दिवस कर्फ्यू

केरळ सरकारने सोमवारी अनेक कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मंगळवारपासून दोन आठवड्यांसाठी रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. चित्रपटगृहे रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

इतर राज्यांमध्येही लॉकडाऊनसारखी परिस्थिती

राजस्थानमध्ये पंधरा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. य़ाशिवाय मेघालयाने परराज्यातील प्रवासी, पर्यटकांना राज्यात प्रवेश बंदी घातली आहे. तसंच नोएडात 30 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हिमाचलमध्येही रुग्णसंख्या वाढत असली तरी राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचं म्हटलं आहे. ओडिसात गेल्या 24 तासात सर्वाधिक 4 हजार 445 रुग्ण सापडले आहेत.

loading image
go to top