...म्हणून प्रियांका गांधींना आव्हान देणाऱ्या अदितींशी पंगा घेणं काँग्रेसला परवडणार नाही

congress,  politics, aditi singh, priyanka gandhi
congress, politics, aditi singh, priyanka gandhi

नवी दिल्ली : लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने मदतीच्या स्वरुपात बस सेवा देण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. या मुद्यावरुन पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काँग्रेस-भाजप यांच्यात राजकारण सुरु झाल्याची चर्चाही रंगली. पायपीट करत घराची वाट धरलेल्या मजुरांना मदत देण्याच्या मुद्यावरुन काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक युद्धात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या रायबरेली मतदार संघातील महिला आमदार अदिती सिंह या युवा महिला आमदाराने उडी घेतल्याचे पाहायला मिळाले.

बसच्या मुद्यावरुन अदिती सिंह यांनी प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधत पक्षाला घरचा आहेर दिला. अदिती सिंह यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी  एनआरसी आणि जम्मू-काश्मीरमधील कलम 370 च्या संदर्भात काँग्रेसच्या विचारसणीच्या विरोधात वक्तव्य केली होती. मागील वर्षीच रायबरेली सदर या मतदार संघातील आमदार अदिती सिंह यांची सदस्यता रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. काँग्रेस विधीमंडळाच्या नेत्या आराधना मिश्रा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांच्यासमोर ही याचिका दाखल केली होती. 

अदिति सिंह यांनी पार्टीच्या विरोधात जाऊन गांधी जयंती निमित्त एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावरुन हा सर्व प्रकार घडला. अदिती सिंह यांना महिला काँग्रेसच्या महासचिव पदावरुन हटवण्यात आले होते. पक्षाच्या विरोधातील भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसने त्यांचे सदस्यत्व काढून घेतले तरी त्यांच्या आमदारकीवर याचा परिणाम होणार नाही. उत्तर प्रदेशमधील राजकीय पटलावर मोठा उलटफेर झाल्यानंतरही ज्या मतदार संघात जराही फरक पडला नाही तो मतदारसंघ म्हणजे रायबरेली सदर पूर्व. अखिलेश सिंह यांनी हा गड कायम आपल्याकडे राखण्यात यशस्वी झाले आहेत. अदिती सिंह त्यांची कन्या आहे. अखिलेश यांना पराभूत करणे शक्य नाही हे समजल्यानंतर काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेतले होते. काँग्रेसला त्याचा फायदाही झाला. सोनिया गांधींना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यामध्ये अखिलेश यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यांच्या निधनानंतर अदिती या राजकारणात आल्या. 

विशेष म्हणजे अदिती सिंह यांना राजकारणा आणण्यामागे प्रियांका गांधीचा हात असल्याचे मानले जाते. ज्यांनी त्यांना राजकारणाच्या मैदानात आणले त्यांच्याविरोधातच आता आदिती सिंह आव्हान निर्माण करताना पाहायला मिळत आहे. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने 36 तासांचे विषेश सत्र बोलवले होते. काँग्रेसने व्हिप जारी करत या सत्राचा विरोध दर्शवला होता. मात्र अदिती सिंह यांनी या सत्रात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. जे योग्य वाटले ते केले. मी शिक्षित युवा आमदार आहे. विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि तिच महात्मा गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षाला उत्तर दिले होते.   

रायबरेली विधानसभेच्या 5 जागेपैकी  काँग्रेस- भाजप प्रत्येकी दोन तर समाजवादी पक्षाकडे 1 जागा होती. दिनेश सिंह भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. हचंदपूरचे आमदार आणि दिनेश सिंह यांचे भाऊ हे देखील भाजपच्या बाजूने असल्याचे मानले जाते. त्यामुळे चार आमदार भाजपच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत अदिती सिंह भाजपात गेल्या तर काँग्रेसच्या अडचणी आणखी वाढतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com