सरले वरीस धोक्याचे, आगामी सावधानीचे

bye bye 2020 welcome 2021
bye bye 2020 welcome 2021

2020 हे खऱ्या अर्थाने करोनामुळे जगाची कसोटी घेणारे वर्ष ठरले. वर्षाची अखेर होताना करोनाच्या आणखी एका विषाणूने (कोविद-19 व्हियूआय) ब्रिटनला ग्रासले, तिथं नवी टाळेबंदी घोषित करण्यात आली. तब्बल चाळीस देशांनी ब्रिटनच्या नागरिकांना तसेच अऩ्य नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी घातली. करोनाचा प्रतिबंध करणाऱ्या अर्धा डझन लसी (व्हॅक्सीन्स) उपलब्ध होण्याची शक्यता असताना, नवा विषाणू आणखी काय थैमान घालणार, याची काहीच कल्पना जगाला आलेली नाही. नव्याने आलेली लस लागण थोपविण्यास लागू पडेल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. करोनाने अंटार्कटिकालाही सोडलेले नाही. गेल्या शंभर वर्षात जगाला अनेक साथींचा सामना करावा लागला. विज्ञानाच्या साह्याने नवनव्या लसी निर्माण करून माणसानं साथीच्या आजारावर मात केलीय. तशीच मात करोनावरही होईल. प्रश्न आहे, तो त्यासाठी किती वेळ, महिने, वर्ष लागणार, याचा.  

करोनाने जगाला पूर्णपणे बदललय. गेल्या मार्चपासून ते डिसेंबर अखेर 9 महिने घराबाहेर पाऊल न टाकलेली लाखो कुटुंबे जगात आहेत. गेल्या काही वर्षात संगणक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना घरातून काम करण्याची सवलत देत आहेत. आता तो जागतिक नियम ठरलाय. त्यास न्यू नॉर्मल म्हणता येईल. शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक संस्थासाठी हे वर्ष सुटीचे ठरले. विद्यार्थी रिमोट लर्निंग करू लागले. पालकांची जबाबदारी वाढली. त्याच बरोबर संगणकावरून वर्ग घेण्याची प्रथा पडल्याने मुलामुलींचे खेळण्याचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम स्थुलतेवर होत आहे. 

गेले वर्ष अनेकार्थाने मानवजातीला आव्हानात्मक ठरले. नैसर्गिक संकटे ही जणू विकसनशील व अविकसित देशांसाठी राखीव आहेत, असे आजवर चित्र होते. अमेरिका, युरोप विकसनशील देश याकडे नंदनवने या नजरेनं माणूस पाहात होता. परंतु, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपात आग, पूर, सागरी तुफानांनी केलेल्या कहराने तेथील जनतेला सळो की पळो करून सोडले. 2020 च्या पहिल्या सहामाहीत जगावर कोसळलेल्या दोनशेपेक्षा अधिक नैसर्गिक संकटांनी 75 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. डिसेंबर अखेर आलेल्या अऩ्य संकटांनी केलेल्या नुकसानीचे प्रमाण 100 अब्ज अथवा त्यापेक्षाही अधिक झाले आहे. याचा अर्थ, करोनाव्यतिरिक्त येत्या वर्षातही अनेक संकंटांचा सामना करण्यासाठी जगाला सिद्ध व्हावे लागेल. निसर्गाला नष्ट करण्याच्या मागे लागलेल्या मानवजातीला हवामानबदलाचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यात सर्वात आघाडीच्या अमेरिकेचे तऱ्हेवाईक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजही गंभीर नैसर्गिक आपत्तींसाठी हवामानबदल हे प्रमुख कारण होय, हे मानावयाला तयार नाही. सुदैवाने अमेरिकेत निवडणुका होऊन अध्यक्षपदी जो बायडन व उपाध्यक्षपदी कमला हॅरिस यांना यश मिळाल्याने हवामानबदल विषयक जागतिक करारनाम्याला व प्रयत्नांना येत्या वर्षात काही प्रमाणात यश येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षाच्या 25 प्रमुख घटनांची जंत्री गुगलवर पाहावायास मिळते. त्यातील पुढील काही पहा - पॅरासाईट या पहिल्या गैरइंग्रजी चित्रपटाने ऑस्कर जिंकले. ऑगस्टमध्ये लेबॅननमध्ये झालेल्या आमोनियम नायट्रेटच्या साठ्याला आग लागल्याने 205 लोकांचा मृत्यू व 6500 जखमी झाले. बाईलवेडा हॉलिवुड निर्माता हार्वे विनस्टीन यास अभिनेत्रींवर केलेल्या बलात्कारांच्या आरोपाखाली 23 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ऑस्ट्रेलियात 2019 व 2020 दरम्यान जंगलांना लागलेल्या वणव्यांमुळे 3 अब्ज वन्यप्राणी होरपळून मेले. 46 दशलक्ष एकर जमीन भस्मसात झाली. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याची बहीण किम यो जॉंग उत्तराधिकारी ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्क याने आपल्या मुलाचे नाव एक्स इए-12 असे ठेवले. पण त्याचा उच्चार कसा करायचा, हे आपल्याला ठाऊक नाही, असे तो म्हणतो. उडत्या तबकडीची छायाचित्रे पेंटॅगॉनने औपचारिकरित्या जारी केली. त्यामुळे अंतराळात अऩ्य कोणती मानवजात आहे काय, याबाबत प्रश्न निर्माण झाले. हे गूढ अद्याप मानवजातीला उलगडलेले नाही. तथापि, शास्त्रज्ञांच्या मते आकाशगंगेत सम्पर्क साधता येण्यासारख्या 36 संस्कृती असाव्या. याचा अर्थ मानवजात ही काही एकमेवाद्वितीय नव्हे, असे दिसत आहे. 

अमेरिकेने इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांना ठार केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला जवळजवळ तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. सूर्यापेक्षा सुमारे 2 दशलक्ष पटीने चमकणारा भलामोठा तारा एकाएकी दिसेनासा झाला. शुक्रावर असलेल्या वातावरणात जीवन शक्य आहे, असे दिसून येताच मंगळाचे आकर्षण कमी झाले. बांग्लादेशात आलेल्या आम्फन वादळाने 100 लोक ठार झाले, तर 40 लाख लोकांना हलवावे लागले. अभिनेत्री कंगना रानावत हिच्या रंगोली चंदेल या बहिणीने खोट्या बातम्या शेअर केल्या व मुस्लिमांना ठार मारण्याबाबत केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने तिचे खाते बंद केले. ब्रिटनने अखेर युरोपीय महासंघाला रामराम ठोकला. प्रिन्स हॅरी व पत्नी मेघन मर्केल यांनी ब्रिटनच्या राजघराण्यापासून फारकत घेतली.            
आफ्रिकेहून आलेल्या टोळधाडींनी राजस्तानच्या 20 जिल्ह्यातील 90 हजार हेक्टर जमिनीवरील पीक फस्त व नष्ट केले. एके पहाटे सानफ्रान्सिस्कोमधील नागरीक उठले, पाहातात तो काय आकाश नारिंगी रंगाच्या धुळीने माखलेले होते, नजिकच्या रानावनातून वणवे पेटल्याचा हा परिणाम होता. दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात वाळवंटातील एका टेकडीवर 120 फूट लांब मांजरीचे चित्र पुरातत्व खात्याच्या तज्ञांना दिसले. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येनंतर एनॉनिमस हॅकरगटाने पुन्हा डोके वर काढले व या गटाने मिन्नेपोलीसच्या पोलिस खात्याला धमकी देणारा व्हिडिओ पाठविला. करोनाचा कहर असतानाही सुमारे तीस देशात निवडणुका पार पडल्या.    

हे वाचा - जगात या आजारामुळे दर 10 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू
    
आणखी एक होऊ पाहात असलेला बदल म्हणजे, युरोपात हलाल मांस खाण्याच्या मुसलमान व ज्यूंच्या (कोशऱ) सवयींना होणारा प्राणीबचाव संघटनांचा जोरदार विरोध. प्राण्यांचे हालहाल करून मारणे, याला हलाल म्हणतात. त्याअयवजी प्राण्याला मारण्याआधी बेशुद्ध करता आल्यास  होणाऱ्या यातना त्याला जाणवार नाही, अशा पद्धत वापरण्यात आली पाहिजे, असा आग्रह संघटना, काही देश करीत आहेत. युरोपात त्याबाबत कायदाही आहे. ब्रिटनमध्ये हलाल पद्धतीने केली जाणारी कत्तल प्राण्याला न कळेल अशा रितीने केली जात असल्याने तिला सर्वसाधारणतः मान्यता आहे. काही देशांनी हलाल मांसाला पूर्णपणे बंदी केली आहे. या मोहिमेप्रमाणेच जगातील मांसाहार संपुष्टात आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या पेशीपासून शाकाहारी मांस तयार करण्यास सुरुवात केली असून, त्याकडे भावी खाद्य या दृष्टीने पाहिले जात आहे. ते दिसण्यास अगदी खऱ्या मांसासारखे व चवीसारखे असल्याने 2027 अखेर त्याची बाजारपेठ 35.4 अब्ज डॉलर्स इतकी वाढलेली असेल. सध्या याची बाजारपेठ 4.3 अब्ज डॉलर्सची आहे. त्यामुळे माणूस शाकाहाराकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 

भारताकडे पाहिल्यास ठळकपणे डोळ्यात भरणारी व देशाचे लक्ष वेधणारी दोन निदर्शने दिल्लीत झाली. पहिले, नागरिकत्व नोंदणी कायद्याविरूद्ध झालेले महिलांचे शहीनबाग येथे तब्बल 101 दिवस झालेले निदर्शन व बैठा संप. दुसरे, केंद्राच्या तीन कृषिविषयक कायद्यांविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर गेले 33 दिवस चाललेले व 2021 मध्येही चालणारे शेतकऱ्यांचे आंदोलन. लव्ह जिहादच्या संदर्भात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यात झालेले कायदे, त्याविरूदद्ध निरनिराळ्या मानवाधिकार संघटनांनी सुरू केलेली आंदोलने, न्यायालयात दाखल करण्यात आलेले खटले याकडे पाहता, येत्या वर्षी त्यांना अधिक धार येईल, अशीच चिन्हे आहेत. गेल्या मार्चमध्ये करोनाची लागण झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांनी एकामागून एक जाहीर केलेल्या टाळेबंदीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तथापि, करोनाच्या बाधेबाबत जगात चौथ्या क्रमांकावर असलेला भारत हे वर्ष संपण्यापूर्वी पहिल्या क्रमांकावर पोहोचला. त्याचबरोबर आर्थिक गर्तेत लोटला गेला. 

सरत्या वर्षात दिल्लीत आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेवर आला. काँग्रेसचे कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले व काही दिवसातच त्यांचे सरकार कोसळून भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येवरून उठलेल्या वादळाने राजकीय वळण घेतले. चीनविरुद्धचा तणाव वाढू लागला. संबंध तणावग्रस्त झाल्याने याच वर्षी सरकारने चीनच्या तब्बल अडिचशे डिजिटल एप्लिकेशन्सवर बंदी घातली. दोन दिवसांपूर्वी चीनहून येणाऱ्या नागरिकांनाही भारतात प्रवेशबंदी करण्यात आली. त्यामुळे, सुमारे पंधरा वर्षे पीपल टू पीपल कॉंट्याक्टबाबत केलेल्या साऱ्या घोषणा संपुष्टात आल्या. पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले चालू राहिले. दरम्यान, भारतीय लष्कराने चीन व पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध करण्याची सिद्धता दर्शविली. फ्रान्सहून झालेल्या राफेल विमानांच्या आगमनाने वायुदलाचा विश्वास द्विगुणित झाला. मोदींनी अयोध्येतील राममंदिराचा शीलान्यास केला. माजी राष्ट्रपती प्रणब मुकर्जी, भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग, रामविलास पासवान यांचे निधन झाले. 

या ठळक घटनांची सूची बरेच काही सांगून जाते. या पार्श्वभूमीकडे पाहता, आगामी वर्ष जगासाठी तितकेच कसोटीचे ठरेल. त्यामुळे, प्रत्येक पातळीवर सावधानता बाळगावी लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com