शेतकरी पुत्र तयार करणार कोरोनावर वॅक्सिन; आईच्या इच्छेसाठी परतला होता मायदेशी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला असून यावर औषध शोधण्यासाठी अनेक देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यातच भारतातील एका शेतकऱ्याचा मुलगाही वॅक्सिन तयार करण्यासाठी झटत आहे.

हैदराबाद - जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला असून यावर औषध शोधण्यासाठी अनेक देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यातच भारतातील एका शेतकऱ्याचा मुलगाही वॅक्सिन तयार करण्यासाठी झटत आहे. डॉक्टर कृष्णा एला असं त्यांचं नाव आहे. एका लॅबपासून सुरु केलेला प्रवास आता त्यांच्या स्वत:च्या कंपनीपर्यंत पोहोचला आहे. आता ते कोरोनाचं वॅक्सिन तयार करत असल्याचाही दावा करत आहेत. 

इंडिया टाइम्सने दिलेल्या वत्तानुसार हे वॅक्सिन 15 ऑगस्टला लाँच करण्याचा दावाही केला जात आहे. काही दिवसांपूर्वी याच्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतात हे वॅक्सिन हैदराबादमधील कंपनी भारत बायोटेककडून तयार केलं जात आहे. ही कंपनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सहकार्याने वॅक्सिन तयार करण्याचे प्रयत्न करत आहे. 

हे वाचा - वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी

कोरोनावर वॅक्सिन तयार करणार असल्यानं फर्म चर्चेत आली आहे असं नाही. याआधीही जगातील सर्वात स्वस्त हिपेटायटिसचं वॅक्सिन तयार केलं होतं. याच कंपनीने झिका व्हायरसवर जगात पहिली लस शोधली होती. या कामांसाठीही डॉक्टर कृष्णा एला यांच्या कंपनीचे नाव घेतले जाते. 

कंपनी स्थापन करणाऱ्या डॉक्टर कृष्णा एला यांचा जन्म तामिळनाडुतील थिरुथानी इथं झाला. ते एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या पुर्ण कुटुंबातील ते पहिलेच असे आहेत ज्यांनी कृषीच्या माध्यमातून बायोटेकॉलॉजीमध्ये पाऊल टाकलं. एका मुलाखतीत त्यांनी या प्रवासाबाबत सांगितलं होतं. त्यांनी आधी शेतीचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला शेती करायचा विचार होता. मात्र आर्थिक अडचणही होती. यामुळे त्यांनी एक केमिकल आणि फार्मास्युटिकल कंपनीसोबत काम सुरु केलं. त्यानंतर त्यांना फेलोशिप मिळाल्यानंतर अमेरिकेला शिक्षणासाठी गेले.

हे वाचा - अपयश आल्यावर वडील म्हणाले,'फक्त शेत विकलंय अजून किडनी आहे'; मुलगा दुसऱ्याच प्रयत्नात झाला IPS

मास्टर्सनंतर विस्कॉन्सिन मेडिसन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर अमेरिकेतच राहण्याचा त्यांचा विचार होता. मात्र डॉक्टर कृष्णा एला यांच्या आईला वाटत होतं की त्यांनी भारतात यावं. आईच्या इच्छेखातर ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी स्वस्तातले हिपॅटायटिस वॅक्सिन तयार करण्यासाठी काम केलं. हैदराबादमध्ये भारत बायोटेक नावाने एक लॅब उभारली आणि काम करण्यास सुरुवात केली.

डॉक्टर कृष्णा एला यांना 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांना बिझनेस लीडर ऑफ द इयर 2011 आणि 2008 मध्ये भारताच्या पंतप्रधानांकडूनही सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि शोधासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor krishna ella bharat biotech company corona vaccine