esakal | Ganesh Festival 2021 'सुखकर्ता, दु:खहर्ता‘ आरती सर्वप्रथम का म्हटली जाते?
sakal

बोलून बातमी शोधा

'सुखकर्ता, दु:खहर्ता‘ आरती सर्वप्रथम का म्हटली जाते?

'सुखकर्ता, दु:खहर्ता‘ आरती सर्वप्रथम का म्हटली जाते?

sakal_logo
By
टीम सकाळ

- दा. कृ. सोमण

काव्यमंदिरातील देवघरे

गणेशपूजन झाल्यानंतर आरती म्डणतात. आरत्यांमध्ये पहिली आरती समर्थ रामदास स्वामीनी रचना केलेली ‘ सुखकर्ता, दु:खहर्ता ‘ ही गणेशाची आरती प्रथम म्हटली जाते. आरत्यांच्या पुस्तकातही ही आरती प्रथम क्रमांकावर दिलेली असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही आरती पाठ असते. समर्थ रामदास स्वामीनी रचना केलेली ही आरती अतिशय लोकप्रिय झाली आहे. “ आरत्या म्हणजे मराठी भाषेतील भक्तिरसप्रधान काव्यमंदिरातील स्वतंत्र देवघरं आहेत. “ असे श्री . ल. रा. पांगारकर यांनी म्हटले आहे. समर्थ रामदासांची ‘ सुखकर्ता दु:खहर्ता ‘ ही आरतीचे देवघर तर प्रवेशद्वारावरच विराजमान झाले आहे. हिंदू धर्म व संस्कृतीत श्रीगणेशाचे स्थान एकमेकाद्वितीय असे आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या आरंभी श्रीगणेशाला वंदन केले जाते. श्रीगणेश हाच सुखकर्ता आहे, दु:खहर्ता आहे. विघ्नहर्ता आहे, विद्यादाता आहे, शांतीकर्ता आहे, वैभवदाता आहे, बुद्धीदाता आहे.

हेही वाचा: उमेदवाराने येथे नारळ फोडले कि विजयश्री मिळतेच असा 'खांदवे गणपती'

समर्थ रामदास स्वामी ( इसवी सन १६०८ - १६८१ ) महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संत होऊन गेले. त्यांनी मुसलमानी सत्तेविरोधात मोठी लोकजागृती केली. त्यांनी शहापूर, मसूर, उंब्रज, शिराळे, मनपाडळे, पारगाव, माजगाव, वहेगाव, शिंगणवी आणि चाफळ येथे मारुतीची स्थापना केली. लोकांचे धर्मविषयक औदासीन्य, भ्रांती व भ्रष्टता नाहीशी करून त्यांच्या चित्तात शुद्ध परमार्थविचार ठसवावा हेच रामदासांचे प्रमुख उद्दिष्ट होते. प्रयत्न, प्रत्यय व प्रबोध या तीन शब्दात समर्थांच्या चरित्राचे व ग्रंथांचे सार आहे. समर्थांनी जनप्रबोधनार्थ ग्रंथांची रचना केली. ग्रंथराज श्रीदासबोध, मनोबोध, आत्मारामादि अध्यात्मग्रंथ, दोन कांडांचे रामायण , हजारो आरत्या, पदे, अभंग , सवाया, विविधवृत्तात्मक श्लोक इत्यादी ग्रंथरचना केली. चाफळ आणि शिवथरघळ ही आपल्या कार्याची दोन प्रधान केंद्रे निर्माण केली. या दोन्ही केंद्रांमध्ये समर्थांनी स्थापन केलेली गणेशमूर्ती आहे. समर्थ रामदास कोणत्याही शुभकार्यारंभी श्रीगणेशाची उपासना करीत असत. समर्थ रामदासांची ‘ सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती खूप लोकप्रिय झाली आहे.

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्रागणेशाच्या ‘ सुखकर्ता दु:खहर्ता या आरतीमध्ये चार मुद्दे मांडण्यात आले आहेत. आरतीच्या पहिल्या चार चरणात श्रीगजानन हा किती वरदायी, कृपावंत, अलौकिक आणि वैभवशाली आहे ते त्यानी सांगितले आहे. श्रीगणेश हा असा वरदायी असल्याने त्याची आरती कशी करावी त्यामुळे काय होते ते पुढच्या चरणात सांगितले आहे. त्यानंतरच्या कडव्यात श्रीसमर्थांनी श्रीगणेशाचे सगुण रूप उलगडून दाखविले आहे. त्यानंतरच्या कडव्यात समर्थानी श्रीगणेशाचे निर्गुण रूप समर्थपणे उलगडून दाखविले आहे. छपन्न शब्दसंख्या असलेली ही श्रीगणेशाची आरती शुद्ध म्हणायला पाहिजे. ‘ दर्शनमात्रे मन:कामना

पुरती ‘ असे म्हणावयास हवे.’ रत्नाखचित फरा ‘ नव्हे, रत्नखचित फरा हवे. ‘ चंदनाची ओटी ‘ नव्हे, चंदनाची उटी हवे. ‘ हिरेजडित मुकुट शोभे तोबरा ‘ नव्हे ! हिरेजडित मुगुट शोभतो बरा ‘ हवे. ‘ रुणझुणती नौपुरे ‘ नव्हे. रुणझुणती नुपुरें हवे. ‘ तसेच बरेच लोक ‘ संकष्टी पावावेव’ म्हणतात. तेही ‘ संकटी पावावे ‘ असेच म्हणायला हवे.

हेही वाचा: 'लालबाग राजा'च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर

समर्थांनी रचलेल्या या महान आरतीचा आपण अर्थ समजून घेऊया

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची ।

कंठी शोभे माळ मुक्ताफळांची ॥१॥

समर्थ रामदास हे उत्तम कवी होते. गहन विषय सहज सुलभतेने मांडणे हा त्यांचा मोठा गुण होता. आरतीमधील पहिली ओळ ‘ सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी ‘ अशी समजून घ्यावी लागते

श्रीगणेश हा सुखकर्ता आहे हे समर्थानी आरतीमध्ये प्रथम सांगितले आहे. सुख म्हणजे काय ? मनातील इच्छा फलद्रुप होणे , सर्वच क्षेत्रात अनुकूलता लाभणे म्हणजे सुख ! संस्कृतमध्ये सुखाची व्याख्या ‘ अनुकूल वेदनीयं सुखम् ‘ अशीच केलेली आहे. गणेश हा दु:खहर्ता आहे. दु:ख नाहिसे करणारा आहे. संस्कृतमध्ये दु:खाची व्याख्या

‘प्रतिकूल वेदनीयं दुःखम् अशी केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रतिकूल वातावरण राहिले तर माणसाला दु:ख होते. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे. तो विघ्ने नाहिशी करणारा आहे. तो विघ्नाना दूर करणारा आहे. श्रीगणेशाच्या आरतीमधील पहिली ओळ भक्ताच्या मनांत आत्मविश्वास निर्माण करते. परंतु एक गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे की श्रीगणेश आरती म्हणणाऱया प्रत्येकाच्या जीवनात सुख निर्माण करीत नसतो, तसेच दु:ख दूर करीत नसतो. तर जे सदाचरणी असतात, मेहनती असतात, योग्य दिशेने अथक परिश्रम करीत असतात, त्यांच्याच मार्गातील विघ्ने तो दूर करीत असतो. त्यांच्यावर कृपा करीत असतो.

हेही वाचा: बाप्पाची आरती अन् नमाज अजान! दोन्ही योग एकाच दिवशी

सुखाचे दोन प्रकार असतात. एक ‘ प्रेयस ‘ आणि दुसरे ‘ श्रेयस ‘ ! भौतिक सुखाला प्रेयस सुख म्हणतात. व आध्यात्मिक सुखाला श्रेयस सुख म्हणतात. श्रीगणेश उपासना श्रेयस सुख प्राप्त करून देत असते.

श्रीगणेशाच्या सर्वांगाला शेंदूराची म्हणजे सिंदूराची उटी लाविलेली आहे. शेंदूर हा सर्व ऋतूंमध्ये रक्षण करणारा आहे. शेंदूराचे कवच रक्षण करणारे आहे. गणेशमूर्तीच्या गळ्यामध्ये मोत्यांची अलौकिक सुंदर माळ शोभून दिसत आहे.

हेही वाचा: मुंबई: आज चौपाटीवर गेल्यास असं होणार गणेश मुर्तीचं विसर्जन

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।

दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥

मंगलमूर्तीच्या केवळ प्रसन्न दर्शनाने अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. कोणतेही शुभकार्य करायला लागणारा आत्मविश्वास, ताकद निर्माण होते. त्यामुळे ते कार्य निर्विघ्नपणे यशस्वी होते. गणेशमूर्तीकडे पाहिल्यावर मन प्रसन्न होते. सारखे टक लावून पहात रहावेसेच वाटते.

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

हिरेजडित मुगुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपूरें चरणी घागरिया ॥२॥

हेही वाचा: गणेशोत्सवातून बुद्धिवर्धन व आरोग्यरक्षण...

समर्थांनी या आरतीची रचना करतांना किती योग्य सुंदर शब्दांची निवड केली आहे ते या ठिकाणीही दिसून येते. गौरीने आपल्या कुमाराच्या मुकुटावर जो फरा ( मुकुटाच्या मध्यभागी लावलेले पदक ) बसविला आहे तो रत्नजडित आहे. श्रीगजाननाला चंदनाची, कुंकुमाची आणि केशराची उटी लावलेली आहे. श्रीगणेशाच्या मस्तकावर हिरेजडित मुकुट शोभून दिसत आहे. बालगणेशाच्या पायांतील पैंजण रुणझुण असा मधुर आवाज करीत आहेत.

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावें निर्वाणी रक्षावें सुरवरवंदना ॥३॥

श्रीगणेशाच्या उदरात अनंत ब्रह्मांडे साठवलेली असल्यामुळे समर्थ त्याला ‘ लंबोदर ‘ म्हणतात. लंबोदर पीतांबर गणेश फणिवरबंधन आहे. गणेशमूर्तीच्या कमरेवर नागाचा करगोटा आहे. भगवान शंकरांनी जेव्हा आपल्या मुलाचा -गणेशाचा उपनयन संस्कार केला त्यावेळी त्यांने आपल्या गळ्यातला नाग काढला आणि करगोटा म्हणून श्रीगणेशाच्या कमरेला बांधला. नाग हे योगाचे प्रतीक आहे. सज्जनांसाठी सरळ परंतु दुर्जनांसाठी तो वक्रतुण्ड म्हणजे वाकडा आहे. ‘ दास रामाचा वाट पाहे सदना ‘ हे सदन आत्मसाक्षात्काराचे आहे, ज्ञानांचे आहे. समर्थ हे रामाचे दास आहेत, तरीही त्यांनी या आरतीमध्ये श्रीगणेशाला साद घातली आहे. गजानना तू सर्वांच्या संकटांच्यावेळी मदत कर अशी प्रार्थनाही शेवटी समर्थ श्रीगणेशाला करीत आहेत.

श्रीगणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो रंगभूमीला कारक आहे. तो नटेश्वर आहे. तो गणांचा अधिपती आहे. तो रणांगणात लढणारा लढवय्या आहे. तो राजकारणपटू आहे. तो प्रेरणा देणारा आहे. आज आपण श्रीगणेशाची पूजा करून श्रीसमर्थ रामदास स्वामीनी रचना केलेली श्री गणेशाची आरती भक्तीभाव व श्रद्धेने म्हणूया.

(लेखक पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत)

loading image
go to top