Gauri Avahana 2021 गौराई पूजन...अन्‌ चाळकरी भक्तजन

Gauri Avahana 2021 गौराई पूजन...अन्‌ चाळकरी भक्तजन
Updated on

गौरी गणपतीचे दिवस आले, की मला माझ्या लहानपणातला हा गौरीपूजन सोहळा हमखास आठवतो. तो प्रत्येक वेळी माझ्या जाणिवेत नवी भर घालतो. मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर या त्यावेळी, म्हणजे साधारण सन १९६५-६६ च्या दरम्यान, अगदी तरुण, उमेदीतल्या कार्यकर्त्या होत्या. लाटणे मोर्चा, घागर मोर्चा यांद्वारे सामान्य गृहिणींचे नियमित पाणीपुरवठ्याचे प्रश्न त्या आवेशाने आणि पोटतिडकीने सरकारसमोर मांडत असत. मला तपशील आता ठळक आठवत नाही; पण आम्ही राहात होतो त्या मालाडच्या गोविंदनगर चाळींसाठी त्या शिवणवर्ग, मेणबत्त्या तयार करण्याच्या कार्यशाळाही नियमित घेत. त्यासाठी आठवड्यातून दोनदा चाळीच्या कमिटी हॉलमध्ये त्या यायच्या. गोविंदनगर चाळींमध्ये निदान पाच-सहा हजारांचा मतदारवर्ग होता. काँग्रेस, जनसंघ हे पक्षही तिथे कार्यरत होते. तरीही मृणाल आणि त्यांच्या सहकारी यांच्याबद्दल आदर सगळ्यांकडून सारखाच होता. पाणीवाल्या बाया म्हणून ओळख मिळाली होती. कुचेष्टेने नव्हे, प्रेमानेच.

Gauri Avahana 2021 गौराई पूजन...अन्‌ चाळकरी भक्तजन
गौरी-गणपती सणानिमित्त कोकणात जादा गाड्या

या दोघींची नावं मला आठवतात. चेहरे आठवतात. साधी सुती पातळं नेसायच्या. एक वेणी घालायच्या. प्रसाधनं कसलीही नव्हती. गोरेगावपासून गोविंदनगरला त्या चालत यायच्या. कसलाही बडेजाव, भपका नव्हता. विशेष म्हणजे समाजसेवा करताना पक्ष कधीच आडवा येऊ दिला नव्हता. गोविंदनगरातला पाणीपुरवठा नियमित झाला होता, गरजू बायकांना शिवणयंत्र मिळाली होती. गरीब विद्यार्थ्यांसाठी चाळीचे खास मोफत शिकवणी वर्ग सुरू झाले होते. त्यामुळे या पाणीवाल्या बायका आमच्या चाळीतल्या बायकांचे दैवत होत्या.

Gauri Avahana 2021 गौराई पूजन...अन्‌ चाळकरी भक्तजन
कोरेगाव गौरी गणपती सजावट स्पर्धेस चांगला प्रतिसाद, अंकिता बर्गे ठरल्या विजेत्या

गौरी-गणपतीचे दिवस. गोविंदनगरचा सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. त्यात एका वर्षी मृणाल यांनी तिथल्या रस्त्यांसाठी श्रमदान शिबिर घेतले. सगळा युवावर्ग आणि अगदी शाळकरी मुलांनाही त्यात सामावून घेतलं होतं. रोज अगदी सकाळीच त्या सगळ्याजणी चालत यायच्या. श्रमदानासाठी स्वतःही पदर बांधायच्या. घमेली डोक्यावर घ्यायच्या. गोविंदनगरचा नितळ रस्ता तयार झाला तो गौरी आवाहनाचा दिवस होता. आमच्या चाळीतल्या बायकांनी आपसांत काही ठरवलं. श्रमदान संपवून घरी निघालेल्या मृणाल, अहिल्या यांना आग्रहाने हाताला धरून चाळीतल्या ज्येष्ठ शिक्षिका डिसोजा यांच्याकडे आणलं. त्यांचीच एकट्याची मोठी डबलरूम होती. बाकी आम्ही सगळे सिंगलवाले. सगळ्यांसाठी वर्गणी जमवून घेतलेल्या साध्याशाच नव्या साड्या त्यांना नेसायला दिल्या. घरोघरीच्या अन्नपूर्णांनी केलेला पुरणा-वरणाचा घास त्यांना आग्रहाने खायला लावला. दातारआजीसह सगळ्यांनी त्यांना औक्षण केलं. आम्ही पोरी सगळी गंमत बघत होतो.

Gauri Avahana 2021 गौराई पूजन...अन्‌ चाळकरी भक्तजन
गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण, सोलापूर शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचा उपक्रम 

मृणाल यांचे डोळे पाणावले. ‘किती दिवसांनी असं कोणी न्हायला घातलं!’ ‘किती दिवसांनी गरम-गरम आयतं जेवलो.’ ‘कमाल केलीत. अगं, तुमच्या घरी गौरी यायच्या आहेत ना?’ असं त्या गहिवरून म्हणाल्या. ‘हे बघा, पाणीवाल्या बायांनो, पाणवठ्यावरून खड्यांच्या गौरी आणतात. तुम्ही साक्षात पाणवठा आणलात. खडी-वाळूने आमचा रस्ता केलात. गौरी-गौरी काय कोणी वेगळ्या असतात? आमचं हे गौरीपूजनच आहे!’ दातारआजी हात जोडून म्हणाल्या. सगळ्याच बायकांनी त्यांना वाकून नमस्कार केले. इतरवेळी त्या कोणीही असे नमस्कार घेत नसत. माझ्या आईने मलाही त्यांच्या पायांवर डोकं ठेवायला सांगितलं. मला आठवतात ती पावलं.

Gauri Avahana 2021 गौराई पूजन...अन्‌ चाळकरी भक्तजन
भाज्यांचे दर कडाडले; गौरी गणपती सणामुळे भाज्यांनी गाठली शंभरी

खरबरीतशी. राजकारणाची आव्हानात्मक वाट दमदारपणे, प्रामाणिकपणे चालणारी... पक्षातीत विचारांच्या दिशेने समाजाभिमुख होऊन चालणारी... गौरींची पावलं...! आणि १९६५च्या दरम्यान असं गौरीपूजन करणाऱ्या चाळकरणीही... मला तेवढ्याच शुभंकर वाटतात. ही आठवण माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावी... राजकारण असंही निर्मळ असू शकतं, ही साक्ष त्यांना द्यावी, म्हणूनच गौरीपूजनाचा हा अनुपम देव्हारा आज मांडावासा वाटला!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com