
Ganeshotsav 2022 : बाप्पासाठी बनवा खास चॉकलेट, पान अन् ड्रायफ्रूट्स मोदक, पाहा रेसिपी
Ganesh Chaturthi Recipes : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला होता. पण यंदा मात्र गणेशोत्सव जोरदार साजरा होणार असं चित्र आहे. घरोघरी गृहिणींची तर एक वेगळीच लगबग सुरू आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन रेसिपी शोधण्यात महिला वर्ग बिझी झालाय. बाप्पासाठी गव्हाचे आणि तांदळाचे उकडीचे मोदक तर सगळेच बनवतात.पण, यावर्षी तूम्हालाही काही हटके करायचे असेल तर मोदकाच्या या रेसिपीज नक्की ट्राय करा... (chocolate paan dryfruits modak)
चॉकलेट मोदक
साहीत्य -
डार्क चॉकलेट कंपाऊंड, बदाम,काजू, १ कप पिस्ता, अर्धा कप कंडेंस्ड दूध, १ चमचा तूप आणि मोदक साचा
कृती :
पहिली स्टेप म्हणजे चॉकलेट वितळवून घेणे. डार्क चॉकलेट कंपाऊंडमध्ये तूप घालून वितळून घ्या. चॉकलेट वितळण्यासाठी डबल बॉयलिंग पद्धतीने चॉकलेट वितळावे.
दुसऱ्या एका भांड्यात काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळ समप्रमाणात एकत्र करून घ्या.
यामध्ये कंडेंस्ड मिल्क घालून छान मिश्रण तयार करून घ्यावे.
मिश्रणात चॉकलेट टाकून ते थंड होण्यास ठेवावे.
तयार मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत.
खजूर ड्रायफ्रुट मोदक
साहीत्य -
खजूर बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप), १ कप बदाम, भरडसर वाटून, १ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून, तूप आणि खसखस
कृती :
खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे.
यानंतर त्यात वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
मिश्रण नीट मिक्स करून कोमटसर असतानाच मोदक पात्रात घालून मोदक बनवावेत.
गुलकंद पान मोदक
साहीत्य -
खायची सहा पाने, १ चमचा तूप, २ कप बारीक साखर, गुलकंद, कंडेंस्ड मिल्क, १ कप सुक्या खोबऱ्याचा किस, खायचा हिरवा रंग आणि बडीशेफ
कृती :
सर्वात आधी पानांची देठं काढून पाने बारीक कापून घ्या.
मिक्सरमध्ये पानाचे काप, कंडेंस्ड दूध आणि साखरेची बारीक पेस्ट तयार करुन घ्या.
एका पॅनमध्ये चमचाभर तूप टाकून नाराळचा खिस भाजून घ्या. आता यामध्ये पान-साखरेची पेस्ट मिक्स करुन परतून घ्या. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा रंग घाला.
आता या मिश्रणात गुलकंद,एक चमचा कंडेंस्ड मिल्क आणि बडीशेफ घाला.
हे मिश्रण थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्यात घालुन आकार द्या.