आता लक्ष सिनेटच्या निर्णयाकडे;लोकप्रतिनिधीगृहात ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर

पीटीआय
Friday, 15 January 2021

अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी २५व्या घटनादुरुस्तीचा वापर करत ट्रम्प यांची थेट हकालपट्टी करण्यास नकार दिल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करत त्यावर मतदान घेतले.

वॉशिंग्टन - कॅपिटॉल इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात दाखल झालेल्या महाभियोगाचा प्रस्ताव आज लोकप्रतिनिधीगृहात २३२ विरुद्ध १९७ मतांनी मंजूर झाला. यामुळे महाभियोगाला दोन वेळा सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे एकमेव अध्यक्ष ठरले. 

अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी २५ व्या घटनादुरुस्तीचा वापर करत ट्रम्प यांची थेट हकालपट्टी करण्यास नकार दिल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करत त्यावर मतदान घेतले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्व सदस्यांबरोबरच रिपब्लिकन पक्षाच्याही दहा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणी प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला. भारतीय वंशाच्या चारही प्रतिनिधींनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

लोकप्रतिनिधीगृहानंतर सिनेटनेही हा ठराव मंजूर केल्यास ट्रम्प यांची हकालपट्टी होईल. मात्र, त्यांचा कार्यकाल एक आठवडाच उरला असल्याने आणि वीस जानेवारीला ज्यो बायडेन यांचा अध्यक्ष म्हणून शपथविधी होताच ट्रम्प हे आपोआपच पदावरून दूर होणार असल्याने ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या मोठ्या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, महाभियोगाबरोबरच सिनेटमध्ये इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

हेही वाचा - ट्रम्प यांच्यावरील बंदीनंतर ट्विटरच्या CEOने सोडलं मौन, म्हणाले, 'कारवाईवर अभिमान नाही'

ट्रम्प हे देशासमोर धोका बनलेले आहेत. त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान खोट्याचाच प्रचार केला. लोकशाहीवर संशय व्यक्त केला आणि सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. 
- नॅन्सी पेलोसी, अमेरिकी काँग्रेसच्या अध्यक्ष 

मानलं रावं! एक-दोनदा नव्हे तर तब्बल 157 वेळा दिली ड्रायव्हींग टेस्ट, तेव्हा...

यापुढे काय? 
महाभियोगाचा हा प्रस्ताव आता सिनेट या वरीष्ठ सभागृहासमोर जाईल. येथे ट्रम्प यांच्याविरोधात सुनावणी आणि मतदान होईल. सिनेटचे कामकाज १९ जानेवारीपर्यंत संस्थगित करण्यात आले आहे. सर्व सदस्यांचे एकमत असेल तरच यापूर्वी सिनेटचे विशेष सत्र बोलाविता येणार आहे. सिनेटमध्ये हा ठराव मंजूर होण्यासाठी ठरावाच्या बाजूने दोन तृतीयांश मते पडणे आवश्‍यक आहे. या सभागृहात दोन्ही पक्षांचे समसमान ५० सदस्य आहेत. 

लोकल प्रवासासाठी सामान्य नागरिक अजूनही वेटिंग लिस्टमध्ये


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved impeachment against Donald Trump