ऐकावं ते नवलच; चीनमधील धरणामुळं म्हणे पृथ्वी फिरायची थांबते

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

जगातलं सर्वात मोठं धरण असलेल्या थ्री गोर्ज डॅमबाबत अनेक अद्भुत अशा गोष्टी सांगितल्या जातात. याच्या बांधकामासाठी इतकं लोखंड वापरलं आहे ज्यामध्ये 60 आयफेल टॉवर तयार होतील. 

बिजिंग - भारताचा शेजारी देश चीन सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. जगात कोरोना पसरायला याच देशातून सुरुवात झाली. जगभरातील अनेक देश चीनवर आरोप करत आहेत. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी आता नैसर्गिक संकट ओढावलं आहे. चीनमधील 24 राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत असून अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची माहिती जशी लपवली तशीच आता पूरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल चीनने मौन बाळगलं आहे. दरम्यान, गेल्या 30 वर्षातील भीषण अशा पूरस्थितीचा सामना सध्या चीन करत असल्याचा दावा केला जात आहे. 

युगशुओ काउंटीमध्ये असलेल्या गुआंग शी क्षेत्रातील धरण पाण्याचा दाब थोपवू न शकल्याने वाहून गेल्याची घटनाही घडली आहे. 1965 मध्ये उभारण्यात आलेलं हे धरण 195 हजार क्यूबिक मीटरपेक्षा अधिक पाणी अडवत होतं. एवढं पाणी ऑलिम्पिकचे 78 स्विमिंग पूल भरण्यासाठी पुरेल. हे धरण फुटल्यानंतर आजुबाजुच्या परिसरात हाहाकार माजला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार 7 जुनला हे धरण फुटलं. त्यानंतर शाजीक्सी गावातील रस्ते, बागा आणि शेतांमध्ये पाणी घुसलं. स्थानिक माध्यमांनी या बातम्यांकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळेच इथल्या परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही आणि संकट कोसळलं.

हे वाचा - पुरीच्या जगन्नाथ मंदिराची रहस्ये निसर्गालाही देतात आव्हान

चीनच्या अनहुई प्रांतातही पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी चक्क एक धरण फोडण्यात आलं. सरकारी मिडिया सीसीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, गेल्या रविवारी नदीच्या खोऱ्यात पुरामुळे वाढलेला पाण्याचा दाब कमी करण्यासाठी यांगत्सी नदीची उपनदी चूहीवर असलेलं धरण स्फोटकांनी उडवण्यात आलं आहे. 

देशातल्या पूरस्थितीला चीन स्वत:च कारणीभूत आहे. त्यांनी 1950 आणि 1960 च्या दशकात दुष्काळ संपवण्यासाठी बेसुमार धरणांची उभारणी केली. यावेळी त्यांनी इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. परिणामी धरणांच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं. चीनमधील धरणांबाबत अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1954 पासून 2005 पर्यंत जवळपास 3 हजार 486 धरणं फुटली होती. यंदा सुरु असलेलं पावसाचं थैमान पाहता आणखी काही धरणं फुटू शकतात. यामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या थ्री गॉर्जस डॅमचा समावेश आहे.

हे वाचा - अद्भुत! मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतो ध्वनी

थ्री गॉर्ज डॅम चीनमधील सर्वात मोठं धरण आहे. यांगत्सी नदीवर असलेलं हे धरण फुटलं तर यामुळे जवळपास 5 कोटी लोकसंख्येला फटका बसू शकतो. तसंच हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चीनच्या जल संधारण मंत्रालयाच्या यांगत्सी नदी जलविज्ञान समिती आणि चीन थ्री गोर्ज ग्रुपने सांगितलं की, धरण ओव्हर फ्लो होण्यापासून वाचवण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले होते. या धरणाची उंची 185 मीटर आहे. गेल्या मंगळवारी धरणातील पाण्याची पातळी 163.5 मीटरपर्यंत पोहोचली होती. काही माध्यमांनी असाही दावा केला आहे की, धरणातून पाणी सोडण्यात येत असताना धरणाच्या काही भागाचं नुकसान झालं आहे. सरकारकडूनही धरणाचे थोडेसे नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. 

जगातील सर्वात मोठं धरण असलेल्या या डॅमचे रुंदी अडीच किलोमीटर इतकी तर उंची जवळपास 630 फूट इतकी आहे. जगातलं सर्वात मोठं हायड्रोइलेक्ट्रिक धरण म्हणून या डॅमला ओळखलं जातं. या धरणामुळे यांगत्सी नदीच्या 1 हजार किमीपर्यंत पूरपरिस्थिती निर्माण होते. थ्री गोर्ज डॅम फुटल्यास चीनमधील 24 राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल.

हे वाचा - आइनस्टाइन आणि चार्ली चॅप्लिन भेटल्यावर काय बोलले?

थ्री गोर्ज डॅमबाबत अनेक अद्भुत अशा गोष्टी सांगितल्या जातात. याच्या बांधकामासाठी इतकं लोखंड वापरलं आहे ज्यामध्ये 60 आयफेल टॉवर तयार होतील. या डॅमबाबत आणखी एक दावा केला जातो. धरणातील पाणी पातळी जेव्हा कमाल उंचीवर पोहोचते त्यावेळी पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होतो असा दावा करण्यात येतो. आतापर्यंत याबाबत कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र जेव्हा धरण पूर्ण क्षमतेनं भरतं तेव्हा 42 बिलियन टन इतका पाणीसाठा असतो. याचा परिणाम पृथ्वीवर होतो. यामुळे एक दिवस 0.06 मायक्रो सेकंदांनी वाढतो असं म्हटलं जातं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china three gorges dam Yangtze River world largest dam