हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

भारतीय उपग्रहांकडून मिळणारी माहिती व नौदलाच्या टेहळणीमधून हिंदी महासागरामध्ये सध्या किमान 14 चिनी लढाऊ जहाजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या जहाजांवर हवेत व जमिनीवर मारा करु शकणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. मात्र चिनी नौदलाच्या हिंदी महासागरामधील हालचालींची माहिती नौदलाकडून सातत्याने संकलित करण्यात येत आहे

बीजिंग - सिक्कीम सेक्‍टरमधील दोक लां भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर ठाकल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आक्रमक धोरण राबवित चीनकडून हिंदी महासागर क्षेत्रात एक पाणबुडी तैनात करण्यात आली आहे. डिझेलवर चालणाऱ्या या पारंपारिक पाणबुडीस चोंगमिंगदो या लढाऊ जहाजाचा आधार असून ही पाणबुडी हिंदी महासागरात नुकतीच दाखल झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

हिंदी महासागर क्षेत्रामध्ये चिनी नौदलाचा प्रभाव वाढत असल्याचे भारतीय नौदलाने परराष्ट्र मंत्रालयास दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 2013-14 पासूनच हिंदी महासागर क्षेत्रात चिनी नौदलाचा प्रभाव हळुहळू; परंतु सातत्यपूर्ण रीतीने वाढत आहे. भारतीय उपग्रहांकडून मिळणारी माहिती व नौदलाच्या टेहळणीमधून हिंदी महासागरामध्ये सध्या किमान 14 चिनी लढाऊ जहाजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या जहाजांवर हवेत व जमिनीवर मारा करु शकणारी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. मात्र चिनी नौदलाच्या हिंदी महासागरामधील हालचालींची माहिती नौदलाकडून सातत्याने संकलित करण्यात येत आहे.

सिक्कीममधील वादग्रस्त भागामधील आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने "विनायुद्ध स्थितीतील' काही सैन्य तुकड्या येथील डोका खिंडीमध्ये तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1962 पासून येथील डोकलाम भागावरील ताब्याबाबतचा वाद गेल्या महिन्यापासून पुन्हा सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने ही भूमिका घेतली आहे.

भारत-चीन दरम्यान सीमेवरील "ट्राय-जंक्‍शन पॉइंट्‌स'(जेथे तीन देशांच्या हद्दी मिळतात) निश्‍चित करण्याच्या संदर्भात उभय देशांत 2012 मध्ये झालेला करार आधारभूत मानण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार असे तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करताना संबंधित तिसऱ्या देशाबरोबर सल्लामसलतीची तरतूद आहे. त्यामुळे असा एखादा तिहेरी सीमा बिंदू निश्‍चित करण्याचा कोणताही एकतर्फी प्रयत्न हा या कराराचा भंग असल्याचे स्पष्ट करून भारताने चीनचा पर्दाफाश केला आहे. तसेच या परिसरात "जैसे थे' स्थिती राखण्याचे आवाहन केले आहे.

सिक्कीम येथील सीमारेषेवर अशा स्वरुपाचा तणाव असताना चिनी नौदलाची हिंदी महासागर क्षेत्रातील हालचाल अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese submarine in Indian Ocean