लोकशाहीला कलंक : ट्रम्प यांची गच्छंती कराच

पीटीआय
Thursday, 14 January 2021

राज्यघटनेनुसार, २५ वी घटनादुरुस्ती ही कोणाला शासन करण्याचे माध्यम नाही. या घटनादुरुस्तीचा वापर करणे म्हणजे चुकीचा पायंडा पाडल्यासारखे होईल, असे पेन्स यांनी पत्रात म्हटले आहे.

वॉशिंग्टन - अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हकालपट्टीसाठी २५ व्या घटनादुरुस्ती तरतूदीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या लोकप्रतिनिधी गृहाने काल बहुमताने मंजूर केला. मात्र, सत्तेला केवळ आठच दिवस राहिले असताना याची आवश्‍यकता नाही, असे सांगत देशाचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी आधीच आपला विरोध व्यक्त केला आहे. यामुळे महाभियोगाच्या प्रस्तावावर मतदान होणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांची मान्यता असल्यास राज्यघटनेच्या २५ व्या घटनादुरुस्ती तरतूदीनुसार अध्यक्षांची हकालपट्टी करता येते. या तरतूदीचा आधार घेण्याची विनंत करणारा प्रस्ताव लोकप्रतिनिधीगृहाने काल २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर केला. पेन्स यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. प्रतिनिधीगृहात असा ठराव येणार असल्याने त्याआधीच पेन्स यांनी अमेरिकी काँग्रेसच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांना पत्र लिहित आपला विरोध स्पष्ट केला होता. ‘अध्यक्षांचा कार्यकाल आता फक्त आठ दिवस राहिला आहे. आणि तरीही तुम्हाला या तरतूदीचा वापर करावासा का वाटतो? अशी कृती आपल्या देशासाठी आणि राज्यघटनेसाठी हितकारक नाही,’ असे पेन्स यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यघटनेनुसार, २५ वी घटनादुरुस्ती ही कोणाला शासन करण्याचे माध्यम नाही. या घटनादुरुस्तीचा वापर करणे म्हणजे चुकीचा पायंडा पाडल्यासारखे होईल, असे पेन्स यांनी पत्रात म्हटले आहे.  यानंतर सभागृहात २५ व्या घटनादुरुस्तीचा वापर करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडून तो मंजूर झाला. लोकशाहीवर हल्ला झाला आणि या हल्ल्यामागे ट्रम्प यांचा हात होता, हे स्पष्टच आहे, असे पेलोसी यांनी ठराव मंजूर करताना सांगितले. आज (ता. १४) महाभियोगावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस

अमेरिकेत कधी नव्हे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सर्वाधिक घाला होत आहे. ही महाभियोगाची प्रक्रिया म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठे सूडबुद्धीचे राजकारण आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, मावळते अध्यक्ष

यूट्यूबही डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून चार हात दूर 
ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुकने कारवाई केल्यानंतर यूट्यूबनेही अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झटका दिला आहे. ट्रम्प यांची यूट्यूब वाहिनी किमान एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. यामुळे ट्रम्प यांची ऑनलाइन उपस्थिती घटली आहे. ट्रम्प यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओमुळे कंपनीच्या धोरणांचा भंग होत असल्याने त्यांची वाहिनी स्थगित केली असल्याचे ‘ट्वीट’ यूट्यूबने केले आहे. नवीन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यास दोन आठवड्यांसाठी आणि तिसऱ्यांदा नियमभंग झाल्यास कायमस्वरुपी ट्रम्प यांची वाहिनी बंद केली जाणार आहे.

हे वाचा -मुंडेच्या राजीनाम्याची मागणी ते कर्नाटकातला भ्रष्ट कारभार; देशविदेशातील घडामोडी एका क्लिकवर

जीवे मारण्याच्या धमक्या
ज्यो बायडेन यांना विजयी घोषित करण्यासाठी मतदान केलेल्या खासदारांना धमक्या मिळत असून काही जणांना तर जीवे मारण्याची धमकी मिळत आहे, असा दावा भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी काल केला. ही  धोकादायक परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

रिपब्लिकन नेत्यांचा विरोध
डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाला रिपब्लिकन नेत्यांचा असलेल्या विरोधाची धार बोथट होत असून अमेरिकी काँग्रेसमधील वरीष्ठ सदस्या लिझ चेने यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

हे वाचा - 350 आरोपी, 900 साक्षीदार; इटलीतल्या खटल्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald trump Rejects 25th Amendment democracy