लॉकडाऊननंतर मंदीतून बाहेर येण्यासाठी इटलीच्या सरकारने घेतला 'हा' निर्णय

italy
italy

रोम, ता. ३ (पीटीआय): तीन महिन्यांनंतर इटलीने युरोपातील पर्यटकांना देशाची कवाडे उघडी केली आहेत. आगामी उन्हाळ्यात पर्यटन व्यवसाय चांगला होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, या आशेने इटलीने पर्यटनाला हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु कोरोनाच्या धास्तीने युरोपातील पर्यटक इटलीत पाऊल ठेवतील की नाही, याबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. कोरोनाला सामोरा जाणारा इटली हा युरोपातील पहिला देश असून तेथे आतापर्यंत ३३ हजार जणांचे बळी गेले आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना इटलीत लॉकडाउन लागू करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या मंदीचा अनुभव इटली घेत असून तो दूर करण्यासाठी पर्यटक इटलीत येणे गरजेचे आहे. असे इटलीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. देशात येणाऱ्या नागरिकांना विलिगीकरणात ठेवले जाणार नाही, अशी हमी देण्यात आली आहे. परंतु लोंबार्डी प्रांतात दररोज नवीन रुग्ण सापडत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकांना इटलीचे निमंत्रण देणे जोखमीचे ठरु शकते, असा इशारा तज्ञांनी सरकारला दिला आहे. 

इटलीत केवळ मिलान, रोम आणि नेपल्स येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची शक्यता होती. गेल्या दोन आठवड्यापासून रेस्टॉरंट, कॅफे आणि बिच आंशिक प्रमाणात सुरू आहे. रोममध्ये १२०० हॉटेल्स असून त्यापैकी ४० हॉटेल सुरू झाले आहेत. त्याचवेळी मिलानमध्ये केवळ १२ हॉटेल सुरू असून तेथील पदार्थ देखील खूप महाग झाले आहेत. 

श्रीमंत देशांच्या पंक्तीत समावेश असणाऱ्या स्वित्झर्लंडने येत्या १५ जूनपासून जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रियाच्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इटलीच्या सीमा बंदच राहतील, असे स्वित्झर्लंड सरकारने स्पष्ट केले आहे. ज्यांना इटलीत जायचे आहे त्यांना परतल्यानंतर आरोग्यचाचणीला सामोरे जावे लागेल, असे स्वित्झर्लंडने नमूद केले आहे. 

व्हिएन्ना: येत्या पंधरा जूनपर्यंत ऑस्ट्रिया हे लगतच्या देशातील म्हणजेच जर्मनी, स्वित्झर्लंड, झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया आणि हंगेरीतील नागरिकांवरील निर्बंध मागे घेणार आहे. परंतु इटलीवरील बंदी कायम ठेवली आहे. इटली अजूनही हॉटस्पॉट असल्याचे ऑस्ट्रियाच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सीमेवर नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. ऑस्ट्रियाला सात देशांच्या सीमा असून नागरिकांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. परंतु इटली अपवाद असेल. तीन आठवड्यापूर्वीच ऑस्ट्रियाने कोरोनासाठी लागू केलेला लॉकडाउन काढला होता. त्यानंतर संसर्गाची भिती असतानाही हजारो दुकाने सुरू झाली. परंतु प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही आरोग्यमंत्री रुडॉल्फ अन्सकोबर यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com