कोरोना लसीवर श्रीमंत देशांच्या उड्या; आधीच खरेदी करतायत कोट्यवधी डोस

टीम ई-सकाळ
Saturday, 1 August 2020

अमेरिकेतील साथीच्या रोगांचे तज्ज्ञ अँथनी फाउची यांनी कोरोनाच्या लसी संदर्भात अंदाज वर्तवला आहे. फाउची यांच्या म्हणण्यानुसार 2020च्या वर्षाअखेरीस कोरोनावरची लस प्रत्यक्षात येईल. 

टोकियो : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. जगभरातील अनेक कंपन्या लसीची मानवी चाचणी करत असून, या लसी सुरक्षित असल्याचं स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळं या लसींचे डोस आधीच खरेदी करण्यासाठी श्रीमंत देशांची चढाओढ सुरू आहे. यात अमेरिकेसह युरोपीमधील बलाढ्य देश असून, त्या यादीत आता जपाननेही उडी घेतली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जपानने खरेदी केले डोस
कोरोना लसीचे डोस आधीच विकत घेण्याचा श्रीमंत देशांनी अक्षरशः सपाटा लावलाय. अमेरिकेने तर, प्रत्येक कोरोनो लसीतील काही डोस विकत घेऊन ठेवले आहेत. यात ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इस्रायल या देशांनीही डोससाठी करार करून ठेवले आहेत. आता जपानने Pfizer Inc आणि BioNTec SE या कंपन्यांचे डोस विकत घेऊन ठेवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 12 कोटी डोस खरेदी करण्यात येणार आहेत. या दोन्ही कंपन्यांना ऑक्टोबरपर्यंत आपली लस मान्यता मिळवेल, अशी आशा  व्यक्त करत आहेत.

वर्षाअखेरीस लस मिळणार
अमेरिकेतील साथीच्या रोगांचे तज्ज्ञ अँथनी फाउची यांनी कोरोनाच्या लसी संदर्भात अंदाज वर्तवला आहे. फाउची यांच्या म्हणण्यानुसार 2020च्या वर्षाअखेरीस कोरोनावरची लस प्रत्यक्षात येईल. अनेकांना हे स्वप्नवत वाटू शकतं. पण, मला हे स्वप्न वाटत नाही. हे सत्य आहे आणि ते सत्य सिद्धही होईल, असा दावा त्यांनी केलाय. अमेरिकेने वार्प स्पीड नावाने एक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना लस तयार करणं आणि ती मिळवं, हा त्याचा उद्देश आहे.

आणखी वाचा - भारतानंतर अमेरिकाही देणार चीनला दणका

उत्तर प्रदेशात चाचणी
भारत बायोटेक, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांनी तयार केलेल्या लसीची उत्तर प्रदेशात चाचणी सुरू आहे. कानपूरच्या राणा हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरमध्ये काही वॉलंटियर्सना ही लस देण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.

आणखी वाचा - पाकिस्तानचा आणखी एक बालिशपणा!

50 कोटी लसी वितरीत करणार!
अमेरिकेतील मॉर्डना कंपनीने अंतिम टप्प्यातील कोरोना चाचणी यशस्वी रित्या पार केली आहे. कंपनीने अमेरिकेत 30 हजार लोकांना ही लस दिली असून, त्यांचे चांगले परिणाम दिसत आहेत. या टप्प्यातही लस दिलेल्यांच्या शरिरात अँटी बॉडिज् तयार होण्यात यश आले आहे. मॉर्डना कंपनीने केलेल्या दाव्यानुसार 2021च्या सुरुवातीपासूनच कंपनी जगभरात 50 कोटी लसी वितरीत करण्याच्या तयारीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: japan booked huge number of doses covid19 vaccine