सॅटेलाइटने टिपल्या चीनच्या कुरापती, समोर आली धक्कादायक माहिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव अजूनही निवळलेला नाही. अधिकारी पातळीवर चर्चा सुरू असली तरी त्यावर समाधानकारक तोडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे.

लेह, ता. 1 - भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत.उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रात पॅगॉंग सरोवराजवळील फिंगर ४ आणि फिंगर ५ या दरम्यान चीनचा मोठा नकाशा काढला असून तेथे चीन असे नाव असणारे मांडरीन भाषेत चिन्ह देखील काढलेले दिसते. विशेष म्हणजे फिंगर एक ते फिंगर आठ या भागात गस्त घालण्याचा अधिकार भारताकडे असताना तेथे घुसखोरी करत चीनने नकाशा काढून कुरापत केली आहे.  गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव अजूनही निवळलेला नाही. अधिकारी पातळीवर चर्चा सुरू असली तरी त्यावर समाधानकारक तोडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे. चीनकडून सातत्याने भारताच्या भूभागावर दावा सांगितला जात आहे. आता चीनने पॅगॉंग सरोवराजवळचा भाग आपला असल्याचे म्हटले आहे. 

फिंगर चारवर चीनचा दावा 
पॅगॉंग सरोवराजवळील पर्वतरांगा आणि खोरे हे एखाद्या हाताच्या बोटाप्रमाणे दिसत असल्याने त्या भागात फिंगर भाग असले म्हटले जाते. फिंगर एक ते आठपर्यंत गस्त घालण्याचा अधिकार भारताकडे आहे तर त्याचवेळी चीन फिंगर चारवर देखील अधिकार सांगत आहे. फिंगर चारजवळ दोन्ही देशाचे सैनिक समोरासमोर आले आहेत. सध्या चीनचे सैनिक फिंगर चारवर असून त्यांनी या ठिकाणी त्यांनी बळ वाढवले आहे. 

हे वाचा - भारत चीन संघर्षावर विशेष लेख : 'तायपिंग आणि संपूर्ण शांतता'

पॅगॉंग सरोवराजवळ उभारला बेस कॅम्प 
उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रात चीनने केवळ सरोवराच्या परिसरातच नाही तर मोठ्या प्रमाणात सैनिकांची जमवाजमव केली आहे. फिंगर चार आणि फिंगर पाच यादरम्यान चीनने मँडरिन भाषेत चिन्ह आणि नकाशा तयार केला आहे. त्याची लांबी ८१ मीटर तर रुंदी २५ मीटर इतकी आहे. उपग्रहाच्या माध्यमातून हा नकाशा आणि मँडरिन भाषेचे चिन्ह सहजपणे पाहता येते. मँडरिन भाषेत चिन्हाचा अर्थ चीन असा आहे. उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रात या भागात चीनने किमान १८६ निवारागृहे, वेगवेगळ्या आकाराच्या छावण्या आणि तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या झोपड्या दिसतात. या छावण्या केवळ सरोवराच्या किनाऱ्याजवळ नाही तर एका शिखरालगत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये दिसून येतात. अशा रितीने छायाचित्रात फिंगर चार ते आठ यादरम्यान चीनच्या अनेक छावण्या दिसून येत आहेत. 

वाचा :  हाँगकाँगवर चीनचा संपूर्ण कब्जा; संसदेत कायदा मंजूर

उपग्रहामुळे पोलखोल 
लडाखच्या सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली उपग्रहातून टिपल्या जात आहेत. उपग्रहातील छायाचित्रात फिंगर पाचच्या परिसरात चीनने मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचे दिसून येते. फिंगर चारच्या किनाऱ्यावर चीनचे बांधकाम देखील दिसते. पॉंगॉंग सरोवरात चीनचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. ओपन सोर्स इंटलिजन्स ॲनलिस्टच्या मते, सरोवरापासून १९ किलोमीटर दक्षिणेकडे चीनने रसदही तयार केली आहे. 

हे वाचा - भारतीय प्रसारमाध्यमांबाबत चीन सरकारचा मोठा निर्णय

अरुणाचलच्या सीमाभागात चीनच्या हालचाली 
अरुणाचल प्रदेशच्या मॅकमोहन रेषेजवळ चीनने हालचाली वाढवल्या असल्याने भारतीय लष्कराला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तुकड्या मोठ्या संख्येने चौक्यांवर तैनात केल्या असून सीमाभागात त्यांनी गस्तीतही वाढ केली आहे. तवांग आणि वालोंग या अरुणाचलच्या सीमाभागात चीनच्या पीएलएच्या हालचाली वाढल्या आहेत. तिबेटच्या सीमेवरील मॅकमोहन रेषेलगत असलेले चीनचे लष्करी तळ त्सो झोंग येथे सैनिकांचे बळ वाढवले आहे. तर तसेच भारताची चौकी वॉलोंगच्या किबीथूजवळ चीनने गस्त वाढवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sattelite image of china map near pangong lake