अमेरिकेत कोरोनाच्या बळींचा आकडा दीड लाख; रुग्णांची आकडेवारी धक्कादायक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

जगभरातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो आता 1 कोटी 60 लाखांवर गेला आहे. यात तीन राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढ सर्वाधिक आहे.

वॉशिंग्टन -  जगभरातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो आता 1 कोटी 60 लाखांवर गेला आहे. यात तीन राष्ट्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढ सर्वाधिक आहे, असे जॉन्स हॉपकिंन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 41 लाखांवर गेला आहे. ब्राझीलमध्ये 23 लाख आणि भारतात 13 लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. 

अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 47 हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ब्राझीलमध्ये 86 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ब्रिटनमध्ये मृत्यूचा आकडा 45 हजारांवर गेला आहे. अमेरिकेतील एकट्या न्यूयॉर्क शहरात 33 हजार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

हे वाचा - कोरोना विषाणूच्या प्रोटिनची पुनर्रचना; नवे संशोधन लसीच्या उत्पादनासाठी उपयुक्त

अमेरिकेतील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असेलल्या कॅलिफोर्नियात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे. इथल्या 4 लाख 53 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून 8427 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या बाबतीत न्यूयॉर्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 39 हजार कोरोनाबाधित असून मृत्यूचे आकडे मात्र सर्वाधिक आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 हजार 379 इतकी आहे. याशिवाय फ्लोरिडा, न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयसह इतर राज्यांमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील 12 राज्यांमध्ये 1 लाखाहून अधिक रुग्ण आहेत. 

हे वाचा - चीनच्या अडचणी वाढल्या; अणू केंद्रातील ९० वैज्ञानिकांनी दिला राजीनामा

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या रविवारी सकाळपर्यंत 43 लाखांवर पोहोचली होती. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दीड लाखांच्या वर पोहोचली आहे. रिकव्हरी होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असणे ही बाब अमेरिकेसाठी चिंतेची आहे. देसात आतापर्यंत 20 लाख 61 हजार रुग्ण बरे झाले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत ही संख्या 47.77 टक्के इतकी आहे. देशात 21 लाखाहून अधिक रूग्ण उपचार घेत आहेत. तर मृतांचे प्रमाण 3.46 टक्के इतके आहे. 

Edited By - Suraj Yadav


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US covid 19 updates death rate is more than 3 percent