esakal | लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

लस कुणी आणि कधी घ्यावी, लस घेण्याआधी काय काळजी घ्यावी, लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील.

लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - कोरोनाला रोखण्यासाठी भारतात 1 मे 2021 पासून व्यापक स्तरावर लसीकरण सुरू केले जाणार आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. भारतात लसीकरण मोहीम सुरू होऊन 3 महिने पूर्ण झाले असले तरी लशीबाबत अनेकांच्या मनात भीती आहे आणि अनेक शंका आहेत. लस कुणी आणि कधी घ्यावी, लस घेण्याआधी काय काळजी घ्यावी, लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील.

तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असे कोमॉर्बिड म्हणजे इतर दीर्घकालीन आजार असतील. तर लस घ्यायलाच हवी. कारण या लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने सुरुवातीला प्राधान्याने या लोकांना लस द्यायला सुरुवात केली. शिवाय या रुग्णांनी लस घेण्यासाठी आपल्या या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांच्या वेळापत्रकातही बदल करू नये. त्यांनी आपली औषधेही ठरलेल्या वेळेत घ्यावी असं पुण्याच्या संचेती रुग्णालयाचे चेअरमन आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पराग संचेती यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: मेनोपॉजमध्ये ताणतणाव का जाणवतो? वाचा कोणत्या काळात घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

महिलांसाठी महत्त्वाचं

पुण्याच्या नोबेल रुग्णालयातील वरिष्ठ फिजिशिअन डॉ. रिमा काशिवा यांनी सांगितले, 'महिलांबाबत सांगायचे झाले तर मासिक पाळीत लस घ्यावी की नाही असा प्रश्न निर्माण होतो. मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही, असे सरकारने सांगितले आहे. गरोदर महिलांबाबत म्हणायचे तर सध्या तरी गरोदर महिलांनी लस घेऊ नये, असं सांगण्यात आले आहे कारण याबाबत अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे कोरोना होऊन गेला असेल तर त्यांनी लस कधी घ्यावी. तर अशा व्यक्तींनी बरे झाल्याच्या दिवसानंतर ४५ दिवसांनी लसीकरण करून घ्यावे. गर्भावस्थेत कोरोना झाला असेल तर तिची प्रसूती झाल्यावर एक वर्षाने त्या महिलेला लस घेता येईल.'

हेही वाचा: आहारात करा ५ पदार्थांचा समावेश; होणार नाहीत लशीचे साईड इफेक्ट्स

लस घेण्याआधी काय करावं

लस घ्यायला जाताना काही विशेष काळजी घेण्याची गरज नाही. पण रिकामी पोटी जाऊ नका. कारण लस घेतल्यानंतर अशक्तपणा किंवा क्वचित प्रसंगी लस घेतल्यानंतर चक्कर आल्यासारखेही वाटेल. त्यामुळे थोडंतरी खाऊन जावं.

लस घेतल्यानंतर होणारा सामान्य त्रास

लस घेतलेला भाग किंचितसा दुखू शकतो. तिथे सूज येऊ शकते. पण काही दिवसांतच ती आपोआप कमी होते.

काही जणांना ताप, शरीर दुखणे, अशक्तपणा अशा समस्या उद्भवू शकतात.

लसीकरणानंतर जाणवणारे हे सर्व सौम्य असे दुष्परिणाम आहेत.

लशीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. लक्षणेही काही दिवसांत कमी होतील.

हेही वाचा: पेन किलर घेऊ नका! सध्याच्या काळात ठरु शकतं घातक

कोरोना लशीचा एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर कोरोनाचा दुसरा डोस घ्यावा. दोन्ही डोस घेतल्यानंतरच कोरोना लशीचा प्रभाव दिसून येईल. लस घेतल्यानंतर तुम्ही कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित आहात असे नाही. लसीकरणानंतरही तुम्हाला कोरोना होऊ शकतो. पण तो गंभीर स्वरूपाचा होत नाही. त्यामुळे लस घेतली तरी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, हात सॅनिटाइझ करणे, स्वच्छता राखणे अशा कोरोना नियमांचे पालन करायलाच हवे. जेणेकरून तुमच्यापासून इतरांना कोरोना संसर्ग होणार नाही आणि कोरोना संक्रमण पसरणार नाही.