तुम्हालाही दमाचा त्रास आहे? तर अशी घ्या काळजी

टीम ई सकाळ
Tuesday, 23 February 2021

अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील संबोधतात. दमा हा फुप्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्‍वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत.

नागपूर : अस्थमा किंवा दमा हा कॉमन आजार आहे. बऱ्याच लोकांना याचा त्रास असतो. वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. विशेषतः थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरून आल्यावर दम्याचे अटॅक येत असतात. श्वासनलिकेत जर काही इजा झाली असेल किंवा काही दोष निर्माण झाले असतील आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असेल तर दमा होऊ शकतो. यामध्ये खोकल्याची भयंकर ढास लागते. दमा बरा होऊ शकत नाही. परंतु, दमा नियंत्रित करता येतो.

दमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील (अतिसूक्ष्म धुलीकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदूषणांशी येणारा घनिष्ट संबंध. आनुवंशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी. आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थांची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्नपदार्थाने दम्याचा त्रास होतो हे ओळखता येईल. मुलांना होणाऱ्या ॲलर्जिक दम्याचे परीक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे.

अधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे. इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो.

अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील संबोधतात. दमा हा फुप्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषतः श्‍वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत. शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामी मूत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चरबी (लठ्ठपणा) आदी कारणांमुळेही दम लागू शकतो.

मात्र, त्याला दम्याचा आजार म्हणत नाहीत. फुप्फुसाच्या आत असलेल्या श्‍वसनवाहिन्यांवर सूज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्राव वाढून वाहिन्या आकुंचन पावतात. अशावेळी श्‍वास सोडताना त्रास होतो. एकूणच हा फुफ्फुसाचा आजार आहे.

दम्याची लक्षणे

 • आपणास वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे
 • वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव होणे
 • दमा पीडित लोकांचा कफ घट्ट आणि दुर्गंधीयुक्त असतो.
 • दम्याचा अटॅक आल्यावर खूप खोकला येतो. जीव कासावीस होतो.
 • अस्थमा असलेल्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो.
 • रात्री दोन नंतर शक्यतो अटॅक येतो
 • खोकल्याची प्रचंड उबळ येते.

काय केले पाहिजे?

 • प्रवासादरम्यान नेहमीच इनहेलर्स आपल्याबरोबर ठेवा
 • डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर कंट्रोलर इनहेलर घ्या
 • नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्या
 • घर स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवा
 • तंबाखूच्या धूम्रपानाप्रमाणे चिडचिडण्यापासून दूर रहा झोप घ्या
 • निरोगी जीवनशैली ठेवा

काय करू नये?

 • डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कंट्रोलर इनहेलर थांबवू नका
 • धूम्रपान करू नका
 • व्यायाम करणे थांबवू नका
 • दमा आणखी वाईट होत असेल तर व्यायामाचा योग्य मार्गाचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • जास्त खाऊ नका
 • वजन कमी करा

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

ही आहेत अस्थमाची कारण

 • कोरडा कफ झाला तर खोकला येतो, आणि दमा होऊ शकतो
 • वातावरणातील धूळ आणि धूर यांचे प्रमाण वाढले असेल तर  
 • अस्थमाचा त्रास होऊ शकतो
 • कधीकधी औषधांचा परिणाम होऊनही कफ कोरडा होतो आणि त्यामुळे देखील दमा होऊ शकतो
 • खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे देखील अस्थमा होऊ शकतो
 • मानसिक तणाव, येणारा प्रचंड राग आणि वाटणारी भीती यामुळे देखील अस्थमा होऊ शकतो

(वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur news Do you also have asthma