esakal | धावताय... अशी घ्‍या हृदयाची काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Kaushik Patil

काही लोकांना चालल्यावर अथवा अवजड कामे केल्यावर दम लागणे, भरपूर घाम येणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे असतात. अशांमध्ये बऱ्याचदा मॅरेथॉनसारखा लांब पल्ला पळल्यावर हेच ब्लॉकेज फुटून हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका असतो. याच्या योग्य निदानासाठी ईसीजी, टू डी इको आणि ट्रेडमिल अथवा स्ट्रेस टेस्ट करणे गरजेचे असते. 

धावताय... अशी घ्‍या हृदयाची काळजी

sakal_logo
By
विशाल पाटील

सातारा : सदृढ आरोग्यासाठी धावायचंय... व्यायाम करायचाय, तर तुमचे हृदय त्या क्षमतेचे आहे का, हे नक्‍कीच तपासा. हृदयाचे स्नायू कमकुवत असतील, तर हृदय बंद पडण्याचाही धोका असतो. व्यायाम करताना अथवा धावताना हार्टऍटॅक आल्याच्या अनेक घटना ऐकण्यास मिळतात. सर्वांनी जागरूक होऊन हृदयाला हृदयापासून जपले पाहिजे, याबाबत सातारा येथील हृदयरोग तत्‍ज्ञ डॉ. कौशिक पाटील यांच्‍याशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी हृदयविकाराबाबत अनेक बाबींचा उलगडा केला. 

हे वाचा : तरुणांनो करा, हृदयावर प्रेम... 

डॉ. पाटील म्‍हणाले, ‘‘मी लहानपणापासून तीस वर्षांत साताऱ्यात झालेले अनेक बदल पाहिले. यामध्ये सर्वात क्रांतिकारी आणि चांगला बदल म्हणजे लोकांमध्ये आलेली मॅरेथॉनबद्दलची आवड..! क्रांतिकारी म्हणायचे कारण, की यामुळे लोकांच्या आरोग्य आणि व्यायामाबद्दलच्या विचारांमध्ये आलेली क्रांती. यामुळे लोकांना व्यायाम आणि त्याबद्दलचे महत्त्व कळू लागले आहे. हृदयरोगतज्ज्ञ म्हणून या बदलाचे महत्त्व मला अधिकच जाणवते. सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्‍पर्धेत देश विदेशातील धावपट्टू सहभागी  होत असतात.  त्‍यांचा उत्‍साह अवर्णनीय होता.‘‘


हेही वाचा : Video : रिमिक्‍स गाण्यांवर नृत्यातून फिटनेसचा मंत्र


यातीलच एक गृहस्थ मॅरेथॉननंतर दोन दिवसांनी माझ्याकडे तपासणीसाठी आले. त्यांना मॅरेथॉन झाल्यावर त्याच सायंकाळी छातीत थोडेसे दुखले होते. त्यांनी हा मॅरेथॉनमुळे झालेला त्रास असावा, असा अंदाज केला. मात्र, सलग दोन दिवस दुखत राहिल्यामुळे आणि नंतर वेदना असह्य झाल्याने ते तपासणीसाठी ताबडतोब आले. ईसीजी काढल्यावर त्यामध्ये मोठा हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा "टू डी इको' केल्यावर हृदयाचे स्नायू तीस टक्केच काम करत असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत दोन दिवस गेल्यावर औषधांबरोबर अँजिओग्राफी हा उत्तम पर्याय असतो.

त्यांची अँजिओग्राफी केल्यावर दोन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यामध्ये एका रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या झालेल्या असल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. कोणत्याही प्रकारच्या तणावामुळे रक्तवाहिनीतील ब्लॉकेज फुटल्यास त्यामध्ये गुठळ्या होऊन हृदयाचा झटका (हार्ट ऍटॅक) येतो. हा मानसिक अथवा शारीरिक तणाव असू शकतो. या गृहस्थांच्या बाबतीत मॅरेथॉन पळल्यामुळे झालेल्या शारीरिक तणावामुळे ही परिस्थिती उद्‌भवली. 

धावपटूंनी करावी तपासणी... 

1) क्‍यूटी (प्रोलॉगेंशन) (QT - prolongation) 
ईसीजी (इलेक्‍ट्राकार्डिओग्राम) मध्ये विविध गोष्टी तपासून पाहिल्या जातात. यामध्ये क्‍यूटी सेग्मेंट लांबला गेल्यास अशा रुग्णांमध्ये अचानक हृदयाचे ठोके वाढून मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. त्यामुळे ईसीजीमध्ये क्‍यूटी प्रोलॉगेंशन आहे का हे पाहणे गरजेचे आहे. अगदी असाच धोका ब्रुगाडा सिंड्रोम या जन्मजात आजारात असतो, जो ईसीजीद्वारे अगोदरच ओळखता येतो. 


2) एचसीएम (हायपरट्रॅफिक व कार्डिओमायोपॅथी) 
या जन्मजात आजारात हृदयाच्या स्नायूंची संख्या, तसेच आकारदेखील वाढतो. त्यामुळे ठोके देणारी यंत्रणेत बिघाड होतो. अशा रुग्णांचा खूप व्यायाम अथवा धावण्यामुळे अचानक मृत्यू ओढवतो. या आजाराचे "टू डी इको' (इकोकार्डिओग्राफी) द्वारे अगोदरच निदान करता येते. हा आजार अनुवंशिक असतो. म्हणजे आईवडिलांकडून तो मुलाकडे येतो. त्यामुळे जर कुटुंबात अकस्मात मृत्यूची घटना झाली असेल, तर धावपट्टूंनी (रनर्स) स्वतःचा "टू डी इको' करून घेणे आवश्‍यक आहे आणि आजार असल्यास पळण्याचा व्यायाम अथवा फुटबॉलसारखे मैदानी खेळ टाळावेत.

 
या आजारात हृदयरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे चालू ठेवावीत आणि गरज पडल्यास शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामध्ये "एलसीडी' हा एक पर्याय राहतो. हा डिवाईस हृदयात एका वायपरद्वारे शॉक देतो. त्यामुळे रुग्णाचे ठोके अचानक वाढल्यास "एलसीडी' शॉकद्वारे रुग्णांचा जीव वाचवता येतो.  "एलसीडी' असल्यास "एचसीएम'चे रुग्ण डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पळण्याचा व्यायाम करू शकतात. 


डायलेटेड कार्डिओमायोपॅथी (डीसीएमपी) 
"डीसीएमपी'मध्ये हृदयाच्या कप्प्याचा आकार वाढतो आणि हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता कमी होतो. अशा रुग्णांमध्ये जास्त पळण्यामुळे हृदय फेल होण्याचा (हार्ट फेल्युअर्स) धोका वाढतो, तसेच आकस्मिक मृत्यूचाही धोका असतो. यामध्ये डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमचा व्यायाम अथवा रनिंगचे नियोजन करू शकता. 

अवश्‍‍य वाचा : निरोगी आरोग्यासाठी योगा विथ डान्स अॅन्ड म्युझिक


एरिथिमोजेनिक राइट वेंट्रिक्‍युलर डिसप्लासी (एआरव्हीडी) : 
एआरव्हीडी या जन्मजात आजारात हृदयाच्या उजव्या कप्प्यातील मांस वाढते. अशा रुग्णांमध्ये जास्त धावल्यास अथवा जास्त श्रम केल्यास अचानक हृदयाचे ठोके वाढून मृत्यू होण्याचा धोका असतो. 


कोरोनरी आर्टरी अनोमॅली : 
कोरोनरी आर्टरी म्हणजे हृदयाला रक्तप्रवाह देणाऱ्या धमण्या. या धमन्यामध्ये उगमस्थान नियोजित जागी नसल्यास या रक्तवाहिन्या व्यायामाच्या वेळी स्नायू अथवा इतर रक्तवाहिन्यांमध्ये दबल्या जाऊन हृदयाचा रक्तप्रवाह खंडित होण्याचा धोका असतो. यामध्ये अचानक मृत्यू ओढवू शकतो. "टू डी इको'द्वारे याचे योग्यवेळी निदान करता येते आणि गरज पडल्यास वेळीच इलाज करता येतो. 


आवश्‍‍यक वाचा : साखर असूनही कसे राहतात प्रशांत दामले फिट अँड फाइन

कॉमोटिओ कॉर्डिस 
हे आकस्मिक मृत्यूचे क्वचितच आढळणारे कारण आहे. मैदानी खेळामध्ये (फुटबॉल, हॉकी, रग्बी) जर छातीवर जोरात ठोसा लावल्यास हृदयाला मुका मार लागतो आणि हृदयाचे ठोके देणाऱ्या यंत्रणेत बिघाड होतो. असे झाल्यास ठोके अचानक वाढल्यास जागेवर मृत्यू होऊ शकतो. 


कोरोनरी आर्टरी डिसिज : 
यालाचा हृदयाच्या धमण्यांमध्ये अडथळे म्हणजे ब्लॉकेज असणे म्हणतात. यामधील बऱ्याच रुग्णांना ब्लॉकेज असूनदेखील लक्षणे नसतात. काही लोकांना चालल्यावर अथवा अवजड कामे केल्यावर दम लागणे, भरपूर घाम येणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे असतात. अशांमध्ये बऱ्याचदा मॅरेथॉनसारखा लांब पल्ला पळल्यावर हेच ब्लॉकेज फुटून हृदयविकाराचा मोठा झटका येण्याचा धोका असतो. याच्या योग्य निदानासाठी ईसीजी, टू डी इको आणि ट्रेडमिल अथवा स्ट्रेस टेस्ट करणे गरजेचे असते. यामुळे वेळीच निदान झाल्यास पुढचा धोका ठळतो. 


आणखी वाचा : हेल्थ टिप्स - अपचनावर नियंत्रण

मॅरेथॉनपूर्वी करा खात्री... 

पळताना छातीत दुखते का? 
पळताना दम लागतो का? 
कधी चक्कर येऊन पडला आहात का? 
छातीत धडधड होते का? 
उच्च रक्तदाब आहे का? 
जवळच्या नातेवाइकांमध्ये कोणाचा आकस्मिक मृत्यू ओढवला आहे का? 
कुटुंबात कोणाला वयाच्या पन्नाशी अगोदर हृदयविकाराचा त्रास आहे का? 
यातील काहीपण असल्यास लांब पल्ल्याचे रनिंग करण्याअगोदर गरजेनुसार ईसीजी, टू डी इको अथवा ट्रेडमिल टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. 

loading image