उपवास करा, पण या 12 गोष्टी एकदा वाचाच

sabudana-khichdi
sabudana-khichdi

आषाढ महिन्यात सणावारांना सुरुवात होते आणि मग ओघानेच उपवासही सुरू होतात. आषाढी एकादशीपासून सुरू होणारे उपवास श्रावण महिना, गौरी-गणपती, नवरात्र असे करत पुढील काही महिने चालतात. या काळात पावसाळा असल्याने अग्नी मंद झालेला असतो, त्यामुळे शरीराला आराम देण्यासाठी या उपवासांचे नियोजन असते असे म्हटले जाते. उपवासाचे शरीराला फायदे होतात असे म्हटले जाते. पण त्याबरोबरच कडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थांचे जास्त सेवन झाल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे मनोभावे उपवास करणाऱ्यांनी हे उपवास करताना आपल्या आरोग्याला कोणता त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, असिडिटी, पोटाचे विकार यांसारख्या समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्य़ायला हवी. तसेच गर्भवती महिला, ज्येष्ठ व्यक्ती आणि श्रमाची कामे करणाऱ्यांनीही शक्यतो उपवास करु नयेत. अन्यथा श्रद्धेपोटी केलेल्या उपवासामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. जीवाला त्रास देऊन कोणतीही गोष्ट करु नका हे नक्की. तेव्हा उपवासाच्या बाबतीत खालील टीप्स जरुर वाचा आणि आपल्या आसपासच्या लोकांनाही याबद्दल पुरेशी माहिती द्या...

१. गर्भवती महिला, दिवसभर कष्टाचे काम करणारे लोक, ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेह किंवा इतर आरोग्याच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करणे टाळावे.

२. उपवास केला तरी तो योग्य पद्धतीने खाऊन करायला हरकत नाही. निरंकारी किंवा निर्जल उपवास करणे टाळावे, त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते.

३. केवळ पाणी पिऊन उपवास किंवा केवळ फळे खाऊन उपवास असे प्रयोग अनेक जण करताना दिसतात. यामुळे स्वत:वर ताबा राहण्यास मदत होते आणि वजन कमी होण्यासही त्याचा फायदा होतो असे अनेकांचे मत असते. मात्र तज्ज्ञांचा सल्ला न घेता अशाप्रकारे केलेले उपवास आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.

४. उपवासाला आपल्याकडे प्रामुख्याने साबुदाणा खाल्ला जातो. साबुदाणा हा प्रमाणात खाल्ल्यास त्यापासून काही अपाय होत नाहीत. मात्र प्रमाणापेक्षा जास्त साबुदाणा खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. साबुदाणा हा पिष्टमय पदार्थ असल्याने तो पचायला काही प्रमाणात जड असतो. तसेच साबुदाण्यातून शरीराला आवश्यक असणारे कोणतेही घटक मिळत नाहीत. त्यामुळे शक्य असल्यास साबुदाणा खाणे टाळावे.

५. उपवासाच्या अनेक पदार्थांमध्ये दाणे प्रामुख्याने वापरले जातात. मात्र दाणे हा काही वेळा पित्तासाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे. तसेच दाण्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे दाणे खाताना काळजी घ्यायला हवी.

६. शिवरात्रीच्या दरम्यान उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, शहाळे, नीरा अशी पेये आवर्जून घ्यावीत. त्यामुळे ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

७. रताळे, फळे, राजगिरा, सुकामेवा, खजूर, दही, ताक, दूध हे उपवासाला चालणारे काही आरोग्यदायी पदार्थ आहेत, त्यांचा आहारात जरुर समावेश करावा.

८. उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ खाल्ले जाण्याची शक्यता असते. मात्र तसे करणे टाळावे.

९. विशेषत: बाहेरचे अन्नपदार्थ खाताना विक्रेत्यांनी कोणत्या प्रकारचे तेल वापरले आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ आणि तेलकट पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.

१०. उपवासाच्या आधी आणि त्या दिवशी खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. त्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.

११. तुम्हाला कोणती औषधे सुरू असल्यास उपवास करताना डॉक्टरांचा य़ोग्य तो सल्ला घ्यावा अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो.

१२. चहा, कॉफी ही पेये उपवासाला चालत असली तरी ते योग्य प्रमाणात घ्यावे. त्याऐवजी ताक, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, आवळा सरबत अशी पेये केव्हाही चांगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com