
Students Mental Health : यश की अपयश? परीक्षेची भीती वाटते? असे करा स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार...
Exam Studies and Mental Health : भारतातील मानसिक आरोग्य तज्ञांनी असे मत व्यक्त केलं आहे की दरवर्षी परीक्षेच्या आधी आणि आणि नंतर, त्यांच्याकडे असे बरेच तरुण येतात जे आपल्या परीक्षेच्या काळजीने ग्रासलेले असतात. त्यापैकी अनेक तर भविष्याच्या अनिश्चिततेमुळे बर्नआउटचे शिकार झालेले आहे. अनेकदा तर त्यांच्या परीक्षांनंतरच्या तणावाचा सामना करण्यासाठी त्यांना समुपदेशन आणि औषधांची गरज असते.
आपल्याकडे मुलांवरती आपल्या अपेक्षांच ओझं टाकण्याची जुनी परंपरा आहे, खरंतर आपल्या पाल्याचं काय होईल या चिंतेने पालक अनेकदा त्याच्या क्षमतांबद्दल शंका निर्माण करतात आणि परिणामी त्या मुलांनाही स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण होते. भारतात विद्यार्थीदशेतल्या अनेक मुलांना या मानसिक आजाराला सामोरे जावे लागते.
ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते तिथे सगळ्याच कुटुंबात चिंतेचे वातावरण असते. शिवाय पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे मुलांवर वेगळेच प्रेशर येते. भारतात, यशाचे मोजमाप बहुधा उत्कृष्ठ ग्रेडच्या संदर्भात केले जाते आणि याचा शिकार मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो.
जेव्हा विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांना बसतो, या स्पर्धा अर्थातच खूप कठीण असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठीचा तणावसुद्धा अधिकच तीव्र होतो. अअनेकदा मुलांची एकच तक्रार असते की त्यांना आपले लक्षकेंद्रित करता येत नाहीये, शिवाय त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना ते लक्षात राहत नाहीये.
विद्यार्थी क्वचितच मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतात किंवा समवयस्क/पालकांशी त्यांच्या समस्यांबद्दल बोलतात. दिवसभर सतत अभ्यास करणे, स्वतःला वेळ न देणे, पालकांचा दबाव आणि अपयशाची भीती यामुळे त्यांची स्थिती बिघडते. अशी तयारी वेळखाऊ आणि दमछाक करणारी असते आणि विद्यार्थी वारंवार एका परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या जीवनातील इतर पैलूंचा त्याग करतात.
आपल्या मेंदूला ब्रेकची गरज आहे हे सत्य विसरता कामा नये. ते २४/७ कार्य करू शकत नाही. जेव्हा स्पर्धा परीक्षा किंवा बोर्ड परीक्षांचे निकाल त्यांच्या अपेक्षेनुसार नसतात तेव्हा परिस्थिती आणखी वाईट होते.
अपयशाबद्दल बोलायचं झालं तर दुर्दैवाने, आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला अपयशासाठी तयार करत नाही. जर प्लॅन ए अयशस्वी झाला तर प्लॅन बी काय असेल हे कोणीही सांगत नाही. त्यामुळेच जेव्हा विद्यार्थ्यांना अपयश येते तेव्हा त्यांना वाटते की त्यांच्यासाठी जग संपले आहे. ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या प्रचंड तणावाला सामोरे जातात.
याच्यापासून वाचण्यासाठी फॉलो करा या टिप्स :
- तुमच्या शरीराची आणि मनाची कार्यक्षमता वाढवणारे वेळापत्रक तयार करा.
- पॉवर नॅर घेत तुमचे शरीर आणि मन ताजेतवाने ठेवा. दर १-२ तासांनी १५ ते २० मिनिटांचा छोटा ब्रेक तुम्हाला मदत करु शकतो.
- पौष्टिक पदार्थांचे सेवन करा आणि प्रत्येक रात्री किमान आठ तास शांत झोप घ्या.
- दीर्घ अभ्यास सत्रे व्यायामासाठीचा वेळ कमी करतात. परिणामी शरीर सुस्त होते आणि मन नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागते. व्यायामासाठीचा थोडा वेळ काढा.
- भावनिक आधारासाठी आपल्या प्रियजनांशी वारंवार बोला.
- अवास्तव अपेक्षांपासून दूर राहा.