Latest Marathi News | ‘PFI’ कार्यकर्ता असल्याच्या संशयातून एकास अटक; ATSची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One arrested on suspicion of being PFI worker Action by ATS 
jalgaon

Jalgaon : ‘PFI’ कार्यकर्ता असल्याच्या संशयातून एकास अटक; ATSची कारवाई

जळगाव : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात ‘पीएफआय’शी संबंधित कार्यकर्ता असल्याच्या संशयातून जळगाव एटीसीने तरुणाला पहाटेच अटक केली. उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा. अक्सानगर, जळगाव), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पटेलविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसून, सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

जळगाव दहशतवादविरोधी शाखा, एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने उनैस उमर खय्याम पटेल यास पहाटे साडेतीनला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. (1 arrested on suspicion of being PFI worker Action by ATS Jalgaon Latest Marathi News)

हेही वाचा: Jalgaon : समस्या अधिक, पण विषय न मिळाल्याने महासभाच नाही!

यंत्रणा तोंडघशी अन्‌ संशयिताची मुक्तता

संशयित उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा. अक्सानगर) यास न्यायालयात हजर करून त्याच्या स्थानबद्धतेची मागणी पोलिसांनी केली. मात्र, स्थानबद्धतेसाठी कुठलेही शाश्वत ठोस कारण पोलिस सादर करू न शकल्याने पोलिसांची स्थानबद्धतेची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत संशयित तरुणाला ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस ठाण्यात दररोज १० ते २ या वेळेत हजेरी, न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठेही बाहेरगावी जाण्यास प्रतिबंध या अटीवर मुक्तता केली. दरम्यान, पटेल याची न्यायालयाने अटी-शर्तींवर मुक्तता केल्यानंतर सायंकाळी त्याला एमआयडीसी पोलिसांत हजर करण्यात आले. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक (कलम-१०७,११०) कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

असा झाला युक्तिवाद

निरीक्षक प्रतापसिंह शिकारे : मुंबईच्या काळाराम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जळगावातून यापूर्वी अब्दुल हादी अब्दुल रऊफ याला अटक झालेली आहे. आज ताब्यात घेतलेला तरुण संबंधित संघटनेशी निगडित कार्यक्रमांमध्ये सक्रिय सभासद आहे. पुण्यात घडलेल्या आंदोलनाप्रमाणे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी सण-उत्सवाच्या काळात अप्रिय घटना घडू नये, सार्वजनिक शांततेचा भंग नये म्हणून संशयिताला किमान पंधरा दिवस स्थानबद्ध करण्याची परवानगी द्यावी.

हेही वाचा: Jalgaon : बिबट्याचा 24 तासांत दुसरा हल्ला वासराचा पाडला फडशा

ॲड. स्वाती निकम (सरकारी वकील) : अटकेतील संशयिताच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच शहरात कुठलही अप्रिय घटना घडू नये, यासाठी संशयिताला स्थानबद्ध करणे आवश्‍यक आहे. पीएफआय संघटनेवरील कारवाईमुळे संघटनेशी संबंधितावर पोलिसांची नजर असून, गोपनीय अहवालावरून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असून, संशयिताला स्थानबद्ध करण्यात यावे.

ॲड. शरीफ पटेल (संशयिताचे वकील) : मुंबईत दाखल गुन्ह्यात आमच्या अशिलाचे कुठेच नाव नाही किंवा कोणाचीही तक्रार नाही. जळगावातून अटक करण्यात आलेला संशयित अब्दुल हादी याला ताब्यात घेत पोलिसांनी लेखी जबाब नोंदवून घेतला. त्याच्या सोबत असलेल्या जिलानी नावाच्या तरुणाचाही लेखी जबाब झाला. त्यातही कुठलाच उल्लेख नाही. इतकंच नाही, तर दहशतवादविरोधी पथकाच्या अहवालातही आमच्या अशिलाने कुठले कृत्य घडवून आणल्याचे नमूद केलेले नाही. एक उच्चशिक्षित तरुण शाळकरी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देत असेल तर तो गुन्हा होत नाही. या व अशा कारणातून अशिलाच्या मूलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाही. आम्ही जामीन देण्यास तयार आहे, दररोज पोलिस ठाण्यात हजेरीलाही उपस्थित राहू आणि पोलिसांना सहकार्य करू.

हेही वाचा: Jalgaon : प्रौढाकडून अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग

टॅग्स :JalgaoncrimeNIAATS