Jalgaon News : पळून गेलेल्या दुसऱ्या बुरखाधाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

second absconding criminal

Jalgaon News : पळून गेलेल्या दुसऱ्या बुरखाधाऱ्याला अटक

जळगाव : जिल्‍हा न्यायालयाच्या पूर्व गेटवर मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलेल्या मनोहर सुरळकरचा पळून गेलेला साथीदार सुरेश रवी इंधाटे (वय ३५) याला कल्याण रेल्वेस्थानकावर अटक (Arrest) करण्यात आली. (Crime branch arrests second absconding criminal within 24 hours in bhusawal cases jalgaon news)

या कटात एकूण चार नावे संशयितांनी सांगितली असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांनी सांगितले.

धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय १८, रा. पंचशीलनगर, भुसावळ) याच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेतील चौघांपैकी दोघांचा जामीन मंजूर झाला असून, कारागृहात असलेले शेख शमीर ऊर्फ समीर ऊर्फ भांजा शेख जाकीर (वय २१) आणि रेहानुद्दीन ऊर्फ भांजा रेहान नईमोद्दीन (२१)

यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी सोमवारी (ता. २०) न्यायालय परिसरात दबा धरून बसलेल्या मनोहर सुरळकरला पोलिसांनी अटक केली होती. झटापटीत पळालेल्या सुरेशसह या गुन्ह्यात आणखी तीन संशयित असल्याचे मनोहरने पोलिस चौकशीत सांगितले होते.

२४ तासांत अटक

पोलिसांच्या हातातून सुरेश इंधाटे पळून गेल्यावर त्याने न्यायालयाच्या मागील गल्लीतून खानदेश सेंट्रल व तेथून पळून जात थेट रेल्वेस्थानक गाठले. मंगला एक्स्प्रेसमध्ये चढून तो मुंबईच्या दिशेने निघाला. तो मुंबईच्या दिशेने पळाल्याची शक्यता लक्षात घेता पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तातडीने कल्याण आरपीएफ,

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

जीआरपीएफ यांना संशयिताचे फोटो पाठविले होते. निरीक्षक किशन नजन पाटील यांना पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंगला एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर पोचताच स्कॉडप्रमुख अनिल उपाध्याय यांनी संशयिताला पिस्तूल व चार जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.

यांचा कटात सहभाग

न्यायालयात दोघांना आणताना हल्ला करण्यासाठी त्याचा मित्र सुरेश इंधाटे याच्यासह प्रवीण मेघे, विक्की वाघ यांचा कटात सहभाग असल्याचे मनोहर सुरळकर याने शहर पोलिस ठाण्यात चौकशीदरम्यान सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेने कसून चौकशी सुरू केली. त्यापैकी सुरळकर याच्या मुलाच्या खुनाच्या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी फुटू नये, यासाठी त्याचेही नाव सांगितले आहे.

न्यायालयात वकिलांना वाटतेय भीती

सोमवारी (ता. २०) जिवंत काडतुसासह पिस्तूलधारींच्या विषयाची चर्चाच सुरू असताना, मंगळवारी (ता. २१) न्यायालयात लाडू गँगच्या दर्शन ऊर्फ चंद्रकांत कुमार शर्मा चॉपरसह मिळून आला.

न्यायालयातील काही वकिलांनी याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना खासगीत फोन करून वकिलांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे, तर जिल्‍हा न्यायालयात अशा पद्धतीने खुनी हल्ला चढविणाऱ्यांचे वकीलपत्रच कोणी स्वीकारू नये, असाही एक मुद्दा यातून समोर येत आहे.