
Jalgaon News: तळणी परिसरासह खुल्या भूंखंडांचा विकास होणार - आमदार किशोर पाटील
भडगाव : शहरातील कॉलनी भागात असलेल्या तळणीच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी तब्बल ४ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे तळणी परिसराचे रुप पालटणार आहे. तर शहरातील सर्व ‘ओपन स्पेस’ विकसित करण्याठी १५ कोटी व रस्त्यांसाठी ६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
त्यातील रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली असून इतर कामेही तातडीने सुरू होतील. याशिवाय ग्रामीण भागासाठी देखील बजेट आणि इतर योजनांच्या माध्यमातून ६० कोटीचा निधी मंजूर करण्यात यश आल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
भडगाव तालुक्याच्या विकासासाठी कधी नव्हे एवढा निधी मंजूर झाल्याचे सांगून आमदार पाटील यांनी सांगितले, की शहरासाठी ४० तर ग्रामीण भागासाठी ६० कोटीचा निधी आपण आणला आहे. मंजूर निधीतून सर्व कामे तातडीने सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तळणीचे रुप पालटणार
शहरातील तळणीच्या विकासासाठी शासनाने ४ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. ज्यातून तळणी परिसराला सरंक्षण भिंत, पादचारी रस्त्यासह पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध कामे केली जातील. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल. तळणी परीसर अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होता. येथील कामांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून लवकरच कार्यारंभ आदेश होऊन कामाला सुरवात होईल असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
खुल्या भूखंडांचा विकास
शहरातील सर्व ९५ ‘ओपन स्पेस’ विकासित होणार असून त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील काही ‘ओपन स्पेस’ विकसित करण्याचे काम सुरू आहे. उर्वरीत खुल्या भुखंडांच्या कामाची ‘वर्क ऑर्डर’ही झाल्या असून ही कामे ही लवकरच सुरू होतील. त्यामुळे कॉलनी भागाच्या सौंदर्यात भर पडेल.
याशिवाय अंत्यत दुरावस्था झालेला बाळद रस्त्यासह शहरातील रस्त्यांसाठी तब्बल साडे सहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यासोबतच मटन मार्केट ते भडगाव पेठ दरम्यान गिरणा नदीवर १३ कोटी खर्चाच्या पुलाला निधी मंजूर केला असून हे कामही लवकरच सुरू होईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण भागाला ६० कोटी
ग्रामीण भागाच्या विकासासाठी तब्बल ६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कजगाव ते वाडे रस्त्यासाठी ४ कोटी १६ लाख मिळाले आहेत. याशिवाय वाडे ते गोंडगाव, वलवाडी ते भडगाव, जुना महिंदळे रस्ता, जुवार्डी ते आडळसे, जुवार्डी ते खेडगाव, नालबंदी ते शिवणी, पिचर्डे ते बात्सर- खेडगाव, तांदूळवाडी ते मळगाव, मळगाव ते वाडे या नऊ रस्त्यांसाठी बजेटमधून प्रत्येकी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
याशिवाय वाडे येथील भवानी शेरी रस्ता, नावरे ते नावरे फाटा, उमरखेड ते फाटा, जुवार्डी ते बहाळ, फाटा ते पिचर्डे, गोंडगाव ते बांबरुड जुना रस्ता, कनाशी ते बोदर्डे, बोदर्डे ते स्मशानभूमी रस्ता, बोरनार ते स्मशानभूमी रस्ता, वडगाव ते बाळद, लोणपिराचे ते कजगाव, कोठली ते स्मशानभूमी रस्ता, घुसर्डी ते फाटा, बाळद ते भडगाव, पेडगाव ते शिंदी, शिंदी फाटा ते शिंदी रस्त्यासाठी प्रत्येकी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
पाढंरथ येथे गिरणा नदीला सरंक्षण भिंतीसाठी चार कोटी मंजूर झाले आहेत. यासोबतच विश्रामगृह बांधकामासाठी दोन कोटीचा निधी शासनाने दिला आहे.
मुलभूत सुविधांतर्गत दहा कोटी
आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण विकास विभागाकडून गाव विकासासाठी भडगाव तालुक्यात दहा कोटीचा निधी मंजुर झाल्याचे सांगितले. तर सामाजिक न्याय विभागांतर्गत दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत चार कोटीचा निधी मंजुर झाल्याचीही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
''भडगाव तालुक्याचा सार्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मंजूर झालेल्या कामांनी शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे. लवकरच १३० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल. ग्रामीण भागासाठी ६० कोटीचा निधी मंजूर करण्यात यश आले आहे. आपण दिलेला शब्दापेक्षाही अधिकची कामे होत असल्याचे समाधान आहे.'' - किशोर पाटील, आमदार ः पाचोरा-भडगाव
शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, शशिकांत येवले, सुनील देशमुख, वडध्याचे युवराज पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास पाटील, माजी उपनगराध्यक्ष आनंद जैन, शिवसेनेचे तालुका संघटक स्वप्निल पाटील, माजी नगरसेवक संतोष महाजन, इमरान अली सय्यद, वैद्यकीय आघाडीचे डॉ. प्रमोद पाटील, महेंद्र ततार, सुरेंद्र मोरे, रावसाहेब पाटील, सचिन वाणी आदी उपस्थित होते.