Jalgaon Crime News : शिंगाईत येथील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; शेतात दुपारचा थरार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Jalgaon Crime News : शिंगाईत येथील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; शेतात दुपारचा थरार!

पहूर (जि. जळगाव) : पहूर - जामनेर मार्गावरील सोनाळा शिव रस्त्यावर शिंगाईतच्या तरुणाची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना मंगळवारी (ता. २१) दुपारी तीनच्या सुमारास घडली. (young man was brutally killed crushing by stone unknown criminal jalgaon crime news)

पहूर -जामनेर मार्गावर हॉटेल वृंदावननजीक सोनाळा -पहूर शिव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू वाघ (वय ३७) याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

प्रमोद वाघ सकाळपासूनच घरून निघाला होता. दुपारी जामनेरहून पहूर येथे जातो, असे शालक (रा.पाटखेडा) यांस फोनवरून सांगितले. शेतकरी प्रफुल्ल पाटील हे सायंकाळी पाचच्या सुमारास शेताकडे गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली दारूच्या बाटल्यांसह ३ ग्लास, पाणी बॉटल आणि अर्धवट खाल्लेला वडापाव आढळून आला.

बाजूलाच रक्ताने माखलेला दगड पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. मारेकऱ्यांनी निर्दयपणे प्रमोदच्या डोक्यात दगड टाकल्याने झाडाखाली दगड आणि माती रक्ताने माखली होती. प्रमोदचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह लिंबाच्या झाडापासून शेतात पंधरा ते वीस फूट अंतरावर फरपटत नेऊन टाकून दिल्याचे आढळून आले.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

शेतकऱ्याने तत्काळ पहूर पोलिसांची संपर्क केला. पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक संजय बनसोड, किरण गर्जे, तालुका समादेशक भगवान पाटील, रवींद्र देशमुख, विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टेलरने पटवली ओळख

मृताच्या पॅन्टवर चॉईस टेलर्स अशी पट्टी आढळून आल्याने जामनेर येथील चॉईस टेलर्सचे संचालक विजय जैन यांना घटनास्थळी बोलावले असता त्यांनी मृतास ओळखले.

अतिरिक्त पोलिस अधिक्षकांची भेट

चाळीसगाव येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविली. जळगाव येथील न्यायवैद्यक पथकाचे वाघ यांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले दगड व माती ताब्यात घेतली असून, मयताजवळील मोबाईल फोन मारेकऱ्यांनी लांबविल्याचे समजते.

नक्कीच पहूर येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मारेकरी झाले कैद असतील, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत प्रमोद वाघ याच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे पहूरसह सोनाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

मारेकरी फरार

अज्ञात मारेकऱ्यांनी मद्यपान करून प्रमोद वाघ यांची हत्या करून घटनास्थळावरून पोबारा केला. मारेकऱ्यांनी नेमकी हत्या कशावरून केली? त्यांच्यात कोणते पूर्ववैमनस्य असे होते? याविषयी उलट सुलट चर्चा सुरू होती.

टॅग्स :Jalgaoncrimemurder case