शाब्‍बास... अंध युगंधराने मारली बाजी 

सुनील शेडगे 
Saturday, 11 January 2020

काळोखाच्या आयुष्यात तिला वक्तृत्वाच्या प्रतिभेचे वरदान लाभले आहे. त्यामुळेच प्रकाशाच्या रेषांचे कवडसे ती अनुभवते आहे. अंगी असणारे वक्तृत्वाचे कौशल्य तिच्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी फुलविले.

नागठाणे (ता. सातारा) : नियतीने तिच्या पदरी आयुष्यभराचे अंधत्व दिले. त्यातून तिचे जग जणू काळोखाने व्यापून गेले. मात्र, परिस्थितीपुढे हार न पत्करता तिने वक्तृत्वाच्या रूपाने यशाच्या प्रकाशरेषा निर्माण केल्या आहेत. हे करताना तिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत तीन हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. 

हे वाचा : सातारा जिल्‍हा बँकेतही महाविकास

युगंधरा दत्तात्रय तोडकर या चिमुरडीच्या जिद्दीची ही प्रेरणादायी कहाणी. युगंधरा ही सातारा तालुक्‍यातील देगावची. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकते. सध्या ती पहिलीत आहे. आरंभीपासून पदरी अंधत्व आलेले. त्यामुळे तिचे जगणेच जणू अंध:कारमय बनले. मात्र, या काळोखाच्या आयुष्यात तिला वक्तृत्वाच्या प्रतिभेचे वरदान लाभले आहे. त्यामुळेच प्रकाशाच्या रेषांचे कवडसे ती अनुभवते आहे. अंगी असणारे वक्तृत्वाचे कौशल्य तिच्या आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी फुलविले.

आवश्‍‍य वाचा : आरर...महसूल, पाेलिसांचा असाही विक्रम

विशेष शिक्षक शहाबुद्दीन शेख, समीर मुलाणी, राधिका खांडेकर यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या वर्गशिक्षिका अश्विनी क्षीरसागर यादेखील तिच्यासाठी मोठे कष्ट घेत आहेत. त्याचेच फळ म्हणजे कऱ्हाड येथे नुकत्याच प्रेरणा असोसिएशनतर्फे 
आयोजित प्रेरणा टॅलेंट सर्च (भाषण कौशल्य स्पर्धा) या राज्यस्तरीय खुल्या वयोगटातील स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला.

हेही वाचा : राष्ट्रवादी येथे गुंडाळला महाआघाडीचा फॉर्म्युला

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते तिला तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. इतकेच नव्हे, तर समीर मुजावर अन्‌ राज मेडिकल यांच्याकडूनही तिला एक हजार रुपयांचे खास बक्षीस देण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे स्पर्धेत सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत साक्षी निकम (अपशिंगे), प्रांजल वाघमळे (कण्हेर), अर्जुन नलवडे (वाढे) यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली. तिच्या यशाबद्दल प्राथमिक शाळा, व्यवस्थापन समिती तसेच देगावच्या ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. 

आणखी वाचा : Video:मेंदूतील गाठीने हिरावले पीएसआय होण्याचे स्वप्न; हवाय मदतीचा हात

तिचे शिक्षकही अंध
युगंधराला मार्गदर्शन करणारे विशेष शिक्षक शहाबुद्दीन शेख हे स्वतः अंध आहेत. ते नित्याने शाळेत येऊन ब्रेल लिपीच्या साह्याने तिला शिकवतात. संदीपभाऊ शिंदे मित्र समूहाने त्यांना नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational Story Of Blind Yugandhara Todkar Satara News