सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; बंडकऱ्यांवर इंग्रज पडले भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; बंडकऱ्यांवर इंग्रज पडले भारी

ब्रिटिशांविरूद्धच्या बंडाची तिव्रता वाढल्यानंतर त्यात संस्थानचे काही सरदारही (देसाई) सामील झाले. यानंतर ब्रिटिशांनी बंडखोरांना थेट लक्ष करत त्यांनी ताब्यात घेतलेले एक-एक ठिकाण परत मिळवायला सुरूवात केली. मनोहरगडावरील बंडवाल्यांवर हल्ला करून त्यांना तेथून बाहेर येण्यास भाग पाडले. अखेर बंडखोर गोव्याच्या आश्रयाला गेले. यामुळे बंडाची तिव्रता उतरणीला लागली.

बंडाची धग हळूहळू पूर्ण संस्थानात पसरली होती. सुरूवातीला याचे केंद्र माणगाव खोर्‍याच्या वर सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेल्या मनोहर गडावरच होते. हळूहळू बंडातील सहभागी स्थानिकांची संख्या वाढली. त्याचे लोण संस्थानच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या गोव्याकडील भागापर्यंत (आताचा दोडामार्ग तालुका) पसरले. या भागातील हेवाळकर आणि उसपकर हे देसाई अर्थात स्थानिक सरदारांनी बंडात उडी घेतल्याने वेगळाच माहोल तयार झाला.

बंडामुळे संस्थानच्या सर्व भागातील व्यवस्था बिघडली होती. यामुळे बंडखोरांची सरशी होते असे वातावरण तयार झाले. यातून बंडात सहभाग घेणाऱ्यांची संख्याही वाढली. हिरसावंत डिंगणेकर यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांच्या एका गटाने बेळगावहून सावंतवाडीकडे येणाऱ्या रामघाटाखालील या मुख्य रस्त्यावरील भेडशीमध्ये कब्जा निर्माण केला. तेथील ब्रिटिशांच्या ठाण्यावर त्यांनी अंमल बसवला.

हेही वाचा: वाढदिवसाचा झिंगाट; विद्यार्थ्यानं केलं धक्कादायक कृत्य

या घटनेनंतर आणखी एक नाट्यमय घडामोड घडली. सावंतवाडी संस्थानचे पर्यायाने राज्यकर्ते असलेल्या ब्रिटिशांचे देसाई अर्थात या भागातील सरदार असलेल्या हेवाळकर आणि उसपकर देसाई यांनी बंडात सामील होत डिंगणेकर यांना उघड समर्थन दिले. ब्रिटिशांबाबत त्यांचे मन दूषीत होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थेतील बदल होता. या सरदारांच्या प्रभावाखाली ठरलेली काही खेडी होती. ब्रिटिशांनी कस्टम करावरील त्यांचा हक्क कमी केला. त्यांच्या खेड्यांमध्ये फौजदार नेमण्याचा हक्कही ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतला. तत्कालीन पोलिटीकल सुप्रीटेन्डट मिस्टर कोर्टनी यांच्या म्हणण्यानुसार, या देसायांच्या प्रभावाखाली असलेल्या खेड्यांमधून गोवा आणि सावंतवाडीकडे येणारे मुख्य रस्ते आहेत. या भागात वारंवार दरोडे पडतात. यामुळे येथून जाणारे व्यापारी, वाटसरू यांच्यात भीती आहे.

ही भीती नाहीशी होण्यासाठी प्रत्येक खेड्यात पोलिस नेमणे आवश्यक आहे. त्या-त्या भागातील देसायांना फौजदार नेमणुकीसाठी माणसे निवडून त्यांची नावे कळवायला सांगितली होती; पण त्यांना ते कबुल नव्हते. आपल्या गावातील पोलिसांचे अधिकारी आपणच आहोत. त्यात ब्रिटिशांचा थेट हस्तक्षेप नको असे त्यांना वाटायचे; मात्र या भागातील वाटसरूंच्या सुरक्षेबाबत ते जबाबदारी घेत नव्हते. म्हणून थेट फौजदार नेमल्याचे कोर्टनी यांचे म्हणणे होते. याच कारणावरून हे सरदार बंडामध्ये सामील झाले. रामघाट मार्ग बंद होणे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते. त्यांनी मद्रासच्या आठव्या फलटणीतील मेजर लुकस याला फौजेसह भेडशीत पाठवले. त्याने बळाचा वापर करून रस्ते मोकळे केले. बंडखोरांना बाजूला करून दळणवळण सुरू करून दिले.

हेही वाचा: वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी

बंड मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक पातळीवर काम सुरू केले. बंडखोरांना युद्धसामुग्री मिळू नये म्हणून दारू निर्मितीचे कारखाने बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र पोर्तुगिजांचा प्रभाव असलेले गोवा शेजारी असल्याने तेथून पुष्कळ युद्धोपयोगी साहित्य बंडखोरांना मिळत होते. शिवाय मनोहरगडावरील बंडवाल्यांनी शिवापूर आणि शिरशिंगे गावांच्या घनदाट जंगलात दारू तयार करण्याचा कारखाना चालू केला होता. त्यासाठीचा कच्चा माल कोल्हापूरकडून यायचा. अखेर मनोहरगडावरील बंडखोरांना टार्गेट करण्याचे धोरण ब्रिटिशांनी अमलात आणले. कर्नल वॉलेस हा यांच्या तुकडीसह मनोहरगडाच्या जवळ असलेल्या आणि या गडाइतकीच उंची असलेल्या कुरले उकीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उंच टेकडीवर तळ ठोकून होता. तेथून त्याने गडावर कुलपी गोळ्यांचा भडीमार सुरू केला. तिकडून जनरल डे ला मोटी यानेही हल्ले सुरू केले. त्यामुळे २६ जानेवारी १८४५ला रात्री फोंडसावंत तांबुळकर आणि त्यांचे मुलगे व इतर गडकरी युवराज आनासाहेबांना घेवून किल्ला सोडून पळून गेले. दुसऱ्याच दिवशी जनरल डे ला मोटी याने मनोहर व मनसंतोष हे दोन्ही किल्ले ताब्यात घेऊन त्यावर ब्रिटिश अंमल बसवला.

पळून जाणाऱ्या बंडवाल्यांचा कर्नल औट्स याच्या सैन्याने पाठलाग सुरू केला. त्यामुळे हे बंडखोर गोव्याच्या सरहद्दीलगत गेले. उसपकर व हेवाळकर देसाईंनी त्यांना आश्रय दिला. तेथेही त्यांनी रामघाट परिसरात बंडाळी सुरू केली. भेडशी येथे ब्रिटिशांचे छोटेसे ठाणे होते. त्याला वेढा दिला; मात्र कर्नल औट्स याचे सैन्य तेथे पोहोचताच वेढा सोडून ते पळून गेले. हेवाळकर देसाईंनी रामघाटाच्या पायथ्याशी मुळस येथे आपली एक चौकी बसवली. रस्त्यावर खोल खंदक खणण्यात आले. उसपकरांनी मांगेलीच्या घाटात असेच अडसर निर्माण केले. यामुळे बेळगावकडचा मार्ग पुन्हा बंद झाला. सरहद्दीत पोर्तुगिजांच्या आश्रयाला असलेले बंडखोरही सावंतवाडीत घुसून बळाचा प्रयोग करू लागले. अखेर कर्नल औट्स याने पूर्ण ताकद लावून बंडखोरांना संस्थानच्या हद्दीतून पळवून लावले.

हेही वाचा: भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे झाले काँग्रेसवासी

जंगलात घेतला आश्रय

फोंडसावंत तांबूळकर आणि त्यांची मुले तसेच युवराज आनासाहेब यांनी मनोहरगड सोडल्यानंतर नेतार्डे व आताच्या गोव्यातील मोपा या दोन गावांमध्ये असलेल्या खोलबाग येथील दाट जंगलात आश्रय घेतला. तेथून ते जोग सावंतांचीवाडी येथील घनदाट जंगलात बराचकाळ राहीले. पुढे पेडणे महालाच्या कार्यक्षेत्रातील वरावडे या गावात फेब्रुवारी १८४५ पर्यंत होते. तेथे गोव्याच्या पोर्तुगिज सरकारकडून आश्रय मिळावा यासाठीच्या अधिकृत हुकुमाची ते वाट पाहत होते.

बक्षीस जाहीर करूनही पकडण्यात अपयश

बंडखोरांना संस्थानातून बाहेर घालवल्यानंतर १३ फेब्रुवारी १८४५ला ब्रिटिशांनी मुंबई सरकारच्या मंजुरीने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात फोंडसावंतांचे मुलगे भिमसावंत उर्फ नाना देसाई, तानसावंत उर्फ बाबा देसाई व हनुमंत सावंत यांना पकडून देणाऱ्‍यांना ३ हजार रुपयांचे व आपु देसाई आणि फोंडसावंत यांना पकडणाऱ्यास १ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. फोंडसावंत तेव्हा ८० वर्षांचे होते. आपू देसाई यांना दारूचे व्यसन होते. असे असूनही बंडवाल्यांपैकी एकालाही पकडून देण्याची हिम्मत कोणी दाखवली नाही. अखेर ते सगळे पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले.

loading image
go to top