रत्नागिरीतील या दोन मच्छीमारांना शासनाने दिली नुकसान भरपाई...

government help for ratnagiri fishermen
government help for ratnagiri fishermen

रत्नागिरी : शासनाच्या सागरी जीव बचाव योजनेंतर्गत मुंबई, ठाण्यासह कोकणातील 59 मच्छीमारांना समुद्री वन्य जीवांचे संरक्षण करताना झालेल्या नुकसान भरपाईपोटी बारा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मच्छीमारांचा समावेश आहे.


वन्यजीवांना व वनस्पतींना भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा,1972 च्या अंतर्गत संरक्षण दिले गेले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रामध्ये सागरी प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती आढळतात. अगदी सूक्ष्मजीवांपासून ते महाकाय देवमाशांपर्यंत. यापैकी काही प्राण्यांपर्यंत समावेश आहे. त्यापैकी काही प्राण्यांच्या प्रजाती जसे समुद्री सस्तन प्राणी (डॉल्फिन, व्हेल), शार्कमाशांच्या काही प्रजाती, सागरी कासवांना भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमात सर्वोच्च संरक्षण दिले आहे.

समुद्रात मासेमारी करीत असताना बरयाचवेळा संरक्षित असलेल्या दुर्मीळ प्रजाती अनावधाने मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात. मच्छीमारांनी तातडीने जाळे कापले तरच हे प्राणी वाचू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये मच्छीमार त्यांचे जाळे कापून अशा प्राण्यांना समुद्रात सोडतात. पण, मासेमारीचे जाळे कापताना मच्छीमारांना मोठे नुकसान सहन करावे लागते. शाश्वत मासेमारीसाठी आणि मच्छीमारांच्या अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचा वन विभाग आणि राज्य मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यावतीने मासेमारांकरिता नुकसान भरपाई योजना 21 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. संरक्षित प्राण्यांना सुटका करण्यासाठी जाळे कापल्यास जाळ्याच्या नुकसान भरपाई पोटी 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान कांदळवन कक्षाच्या (मँग्रोव्ह सेल) अंतर्गत मच्छीमारांना देण्यात येते.

कांदळवन कक्ष आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील विविध किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी जिल्हा निहाय जनजागृती कार्यशाळा मच्छीमारी बंदीत जून व जुलै 2019 या काळात घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून आतपर्यंत एकूण 64 प्रकरणे अनुदानासाठी शासनाकडे सादर करण्यात आली होती. त्यात ठाणे 23, सिंधुदुर्ग 16, रायगड 13, पालघर 9, रत्नागिरी 2 व मुंबई 1 अशी प्रकरणे ओहत. गेल्या आठवड्यात कांदळवन कक्षाने 19 प्रकरणांची शहानिशा करून 3 लाख 65 हजार रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मच्छीमारांना दिली आहे.

आत्तापर्यंत 64 प्रकरणातील 59 मच्छीमारांना नुकसानभरपाईपोटी सुमारे 11 लाख, 96 हजार, 350 रुपयांची रक्कम कांदळवन कक्षातर्फे देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन प्रकरणांचा समावेश आहे. गेल्या दहा महिन्यांत दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये 27 ऑलिव्ह रिडले कासव, 16 ग्रीन सी कासव, 17 व्हेल शार्क (देव मुशी/बहिरी), 1 हॉक्सबिल कासव, 1 इंडिअन ओशियन हम्पबॅक डॉल्फिन, 1 लेदरबॅक समुद्री कासव व 1 जाईंट गिटारफिश या प्रजातींना जीवनदान मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com