esakal | खारेपाटण : जिल्ह्यात १२ हजार चाकरमानी दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटण चेकपोस्ट

खारेपाटण : जिल्ह्यात १२ हजार चाकरमानी दाखल

sakal_logo
By
राजेश सरकारे : सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण : सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्‍या खारेपाटण चेकपोस्टवरून काल (ता.९) रात्री उशिरापर्यंत १२ हजार २७७ प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या सर्व चाकरमान्यांचे स्वागत पोलिस प्रशासन, खारेपाटण ग्रामपंचायत तसेच येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. चाकरमान्यांच्या नोंदणीवेळी गर्दी होऊ नये यासाठी खारेपाटण चेकपोस्ट, रामेश्‍वर नगर आणि वारगाव येथे स्वतंत्र नोंदणी कक्ष उभारण्यात आला आहे.

हेही वाचा: Ratnagiri : बाजार लखलखला; बाप्पा पावला

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची चेकपोस्ट आणि रेल्‍वे स्टेशनवर कोरोना चाचणी न करण्याचा निर्णय जिल्‍हा प्रशासनाने घेतल्‍याने जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला; मात्र जिल्ह्यात दाखल होणाऱ्या सर्व चाकरमान्यांची नोंद चेकपोस्ट आणि रेल्‍वे स्थानकांत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या नोंदणीला ७ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली. तर काल (ता.९) सायंकाळी उशिरापर्यंत खारेपाटण चेकपोस्टवर १२ हजार २७७ चाकरमान्यांची नोंद झाली आहे. यापुढील काळातही जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची नोंद केली जात असून त्‍यासाठी महसूल, आरोग्‍य आणि पोलिस विभागांचे पथक चोवीस तास सज्‍ज ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: Devrukh : खड्डेच चोहीकडे; प्रवाशांचे मोडले कंबरडे

खारेपाटण चेकपोस्टवर प्रवाशांची तसेच वाहनांची दाटी होऊ नये यासाठी रामेश्‍वर नगर येथे खासगी बसेस आणि त्‍यामधून येणाऱ्या प्रवाशांची नोंद करण्यात आली. चेकपोस्टवर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी आराम बस जेथून सुटणार तेथेच सर्व प्रवाशांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक यांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले होते. चेकपोस्टवर या यादीची खातरजमा करून लगेच आरास बसेस पुढे पाठविण्यात आल्या. यामुळे चेकपोस्टवरील चाकरमान्यांचा विलंब टळला.

हेही वाचा: Ratnagiri : अक्षरदेवता श्रीगणेश आद्य लिपिकार

वारगाव येथे एस.टी. बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवण्यात आली तर चेकपोस्टवर इतर सर्व वाहनांतून येणाऱ्या नागरिकांची नोंद घेण्यात आली. खारेपाटण चेकपोस्टवरून २ हजार ६३५ प्रवासी जिल्ह्यात रवाना झाले. खाजगी वाहनातून ५ हजार ९५६ प्रवासी दाखल झाले. एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून ३ हजार ६७१ प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले. गणेशोत्‍सवातील गौरी पूजनालाही महत्‍व असल्‍याने उद्या (ता.११) सायंकाळपर्यंतही चाकरमान्यांचा ओघ सुरू राहणार आहे.

तीन दिवस महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्यावतीने येथे कार्यरत असलेले पथक तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी वर्गाला आपल्या घरी जाण्यासाठी विलंब होऊ नये तसेच गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जिल्हा आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन रात्रंदिवस जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मेहनत घेत आहेत. या सर्वांच्या नियोजनामुळे लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा या त्रासातून यावेळी गणेशभक्तांची सुटका झाली आहे.

हेही वाचा: डोली-पालखीत विराजमान होऊन रत्नागिरी,सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन

गुलाबपुष्प देऊन चाकरमान्यांचे स्वागत

चौपदरीकरणाचे अपूर्ण काम, खड्डेमय रस्ते, तसेच वाहनांच्या रांगा ही सर्व विघ्ने पार करून सिंधुदुर्गात आलेल्‍या चाकरमान्यांचे खारेपाटण चेकपोस्टवर पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. खारेपाटण येथील सामाजिक कार्यकते सुकांत वरुणकर यांनी चहा, पाणी मोफत सोय गणेशभक्तांना केली आहे. याखेरीज सरपंच रमाकांत राऊत यांच्यासह रफीक नाईक, सुकांत वरुणकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यरत आहेत.

loading image
go to top