भातशेती रुतली मजुरीच्या चिखलात; प्रत्येकी मोजावे लागतात 300 ते 350 रुपये 

दिलीप पाटील
सोमवार, 17 जुलै 2017

  • वाडा तालुक्यात मजुरांची चणचण 
  • येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यात प्रसिद्ध 

वाड्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीला छेद देत आधुनिक शेतीकडे वळला आहे. शेतकरी आता मल्चिंग शेती, एस.आर.टी, एस.आर.आय, डम सिडर , बावचा, वापे पध्दतीची भातशेती करू लागला आहे. तालुक्यात एस. आर. टी भातशेती सुमारे 50 एकर तर मल्चिंग सहा ते सात एकर क्षेत्रात केली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

वाडा : तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच गाव पाड्यांमध्ये भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यात 176 गावे आणि 500 पेक्षा अधिक पाडे आहेत. 14 हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते.

येथील शेतकरी झिनी, सुरती, गुजरात 11, गुजरात 4, रत्ना, सुवर्णा, कर्जत 2,3,6,7,9, पालघर, इंद्रायणी, सह्याद्री, दप्तरी, आणि मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यात प्रसिद्ध आहे. भातपिकाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या संख्येने मजूर होते. काही वर्षापासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे शेकडो मजूर कारखान्यात काम करतात त्यामुळे पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षापासून मिळत नसल्याने भातपिकाची लागवड कशी करायची असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. भातलावणीसाठी जिल्ह्य़ात कुठेही यांत्रिक अवजारे नाहीत. काही जिल्ह्य़ात कृषी विद्यापीठात तयार केलेली भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत.

रुढी परंपरेनुसार शेतातील देवांना पोळी भाजी चा नैवेद्य देऊन शेतकऱ्यांनी कामांना सुरुवात केली. मात्र एकाच वेळी सर्वच ठिकाणी लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात. त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज 300 ते 350 रूपये आणि सकाळ, दुपार व रात्रीच्या जेवणाचा खर्च द्यावा लागत आहे. या सर्व कारणांमुळे शेती व्यवसाय जास्त कष्टाचा आणि खर्चिक झाला आहे. त्यामुळे भातशेती करणे परवडत नसल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.

निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भातशेती तसेच मजुरांचे वाढलेले दर, खताचे व यांत्रिक उपकरणाचे वाढलेले दर, यामुळे भातशेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरभात शेतीला पसंती दिली आहे. यावर्षी 35 ते 40 टक्के पेरभात शेती केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भातपेरणीच्या वेळेवरच शेताची चांगली मशागत करून पेरभात शेतात टाकले जाते. त्याला पुन्हा लावण्याची गरज नसते. आणि हे काम कमी मनुष्यबळात होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरभात शेतीलाच पसंती दिली आहे. तर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वर्षभर खायला लागेल एवढी भातशेती केली जात आहे. त्यामुळे उर्वरित ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे. भाताचे भाव गेल्या अनेक वर्षापासून आहेत तेच आहेत. त्यामुळे महागलेली भातशेती करणे सद्यस्थितीत परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: konkan news palghar news agri paddy rice crop peasants demand