पाली : पोलिसांनी 49 हजारांचा मुद्देमाल केला जप्त!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

पालीमधील समर्थ नगरमधील हरिओम वास्तू सोसायटीत राहणारे विशाल नामदेव शिंदे यांच्या घरात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती.

पाली : एकदा चोरीला गेलेला एैवज जसाच्या तसा क्वचितच एखाद्याला परत मिळतो. असाच अनुभव पाली येथील विशाल शिंदे यांना आला आहे. त्यांच्या घरातील चोरीला गेलेला एैवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे परत मिळाला आहे.

पालीमधील समर्थ नगरमधील हरिओम वास्तू सोसायटीत राहणारे विशाल नामदेव शिंदे यांच्या घरात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीत तीस हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चैन आणि सोन्याचे पेंडंट, चौदा हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या आणि काळया मण्यांचा सर, पाच हजार रुपये किंमतीचा कानातील झुमक्यांचा जोड असे एकूण एकोणपन्नास हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले होते. याबाबत पाली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग अलिबाग यांनी दोन आरोपींना चोरीच्या गुन्ह्यांत पकडले होते.

- संगमेश्वरात भाजपला गृहीत धरणे शिवसेनेला पडले महागात

या दोन आरोपींनी जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामध्ये पालीतील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीची देखील कबूली दिली. त्यानुसार पाली पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत ठेवले. आणि त्यांच्याकडून शिंदे यांचा एक सोन्याचा गोफ असलेली चैन आणि एक सोन्याचा सर असा एकूण पस्तीस हजार रुपये किंमतीचा ऐवज ताब्यात घेतला असून नुकताच विशाल शिंदे यांना सुपूर्त केला आहे.

- आदित्य ठाकरेंसोबत समन्वयाने काम करणार : रोहित पवार

या प्रकरणातील आरोपी सुनील लालसिंग मुझालदा (वय 22, रा. घोर, पोष्ट- तांडा, मध्यप्रदेश) आणि रवी उर्फ छोटू मोहन डावर (रा. जवार टेकडी, इंदोर, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाली पोलिस निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना शोधून चोरीला गेलेला ऐवज पुन्हा मिळवून दिल्याबद्दल विशाल शिंदे यांनी पोलिस प्रशासनाने आभार मानले.

- निवडणुकीनंतरही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग; नाशिकमध्ये धक्का


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police seized 49 thousand rupees worth of stolen goods