esakal | सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीकरांचे जुळले शिंदे घराण्याशी नाते
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीकरांचे जुळले शिंदे घराण्याशी नाते

सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; सावंतवाडीकरांचे जुळले शिंदे घराण्याशी नाते

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सिंधुदुर्ग : रामचंद्र सावंत यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र तिसरे खेम सावंत (राजश्री) हे गादीवर आले. 1755 ते 1803, अशी त्यांची कारकीर्द अनेक चढउताराने भरलेली आहे. सावंतवाडी संस्थानचे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशी त्यांच्याच कारकीर्दीत जिव्हाळ्याचे नाते संबंध निर्माण झाले. त्यांच्या पहिल्या पत्नी लक्ष्मीबाई या शिंदे घराण्यातील. या काळात सावंतवाडी संस्थानशी स्वामीनिष्ठ असलेल्या जीवबादादा बक्षी अर्थात जीवाजी बल्लाळ यांची सावंतवाडी संस्थानच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

रामचंद्र सावंत यांना उशिरा पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या निधनावेळी त्यांचे पुत्र खेमसावंत तिसरे अर्थात राजश्री हे अवघे सहा वर्षांचे होते. सावंतवाडी संस्थानचे वारस म्हणून त्यांना राजा करण्यात आले. त्यांच्यावतीने त्यांच्या आई जानकीबाई या मुख्य प्रधान जीवाजी विश्राम सबनीस यांच्या मदतीने कारभार पाहत होत्या. याच दरम्यान संस्थानने पराभव केलेल्या कुडाळच्या तत्कालीन देशमुखी असलेल्या प्रभू घराण्यातील वारसांनी पुन्हा सत्ता स्थापनेसाठी डोके वर काढले. सावंतवाडीकरांच्या हल्ल्यानंतर 1697 मध्ये पळून गेलेल्या नारायण प्रभू यांचा मुलगा दादाजी प्रभू यांनी 1756 मध्ये सत्ता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपला प्रतिनिधी पुण्यातील पेशव्यांच्या दरबारात पाठवला. कुडाळमध्ये आपल्याला पुन्हा सत्ता मिळावी यासाठी सावंतवाडीकरांना शह द्यायला सैन्याची मदत करावी, अशी मनधरणी त्यांनी केली. पेशव्यांनी ती मान्यही केली. पेशव्यांचे सरदार नारो त्रिंबक हे दंडाराजपुरी येथे होते. त्यांना या कामासाठी नियुक्‍त केले. त्रिंबक हे तीन हजारची फौज घेवून कोकणात उतरले. त्यांचे सैन्य अगदी नेरूरपर्यंत चाल करून आले.

हा सगळा घटनाक्रम सावंतवाडीकरांना आधीच कळला होता. मुख्य प्रधान जीवाजी सबनीस यांनी आधीच पेशव्यांचे मन वळवून हे सैन्य मागे नेण्याविषयी हुकुम मिळवला. अगदी वेळेत तो हुकुम त्रिंबक यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी आपले सैन्य माघारी नेले. प्रभू यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. यानंतर मात्र त्यांनी कधी पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही. हे सावंतवाडीवरील संकट टळल्यावर जीवाजी सबनीस यांनी पोर्तुगीजांनी घेतलेला मुलूख परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याच काळात पोर्तुगीजांनाही उतरती कळा लागली होती. त्यांनी सावंतवाडीकरांकडून मिळवलेल्या पेडणे महालातील लोकांवर अन्याय करायला सुरूवात केली होती. त्याकाळात तंबाखुचे मोठे महत्त्व होते. हा तंबाखु पोर्तुगीजांच्या सत्तेखालील गोव्यातूनच घ्यावा, अशी सक्‍ती त्यांनी केली होती. याचा असंतोष लोकांमध्ये होता.

हेही वाचा: आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक जण ठार

सावंतवाडीकरांसाठी हे एक कारण मिळाले. त्यांच्या आधारे 9 एप्रिल 1858 ला त्यांनी पोर्तुगीजांच्या सैन्यावर चाल केली. त्यांच्याकडून पेडणे आणि साखळी हे महाल परत मिळवले; मात्र या प्रांतातील हळर्ण, तेरेखोल आणि डिचोली हे तिन्ही किल्ले त्यांच्या हाती आले नाही. हे किल्ले सावंतांकडे गेले तर पर्यायाने त्यांच्याशी सख्य असलेल्या पुण्यातील पेशव्यांना किनारपट्‌टीवर बळकट स्थान मिळेल अशी भिती पोर्तुगीजांना वाटत होती. त्यामुळे तत्कालीन गर्व्हनर जनरल हा स्वतः गोव्यातील आमोणे येथील सैन्याला घेवून आला. सावंतवाडीचे सैन्य तेथील एका मंदिराच्या परिसरात होते. पोर्तुगीजांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. यात सावंतवाडीकरांना माघारी यावे लागले.

पुढे 16 जुलै 1759 ला गव्हर्नर जनरलने सावंतवाडीकरांशी एक गुप्त तह केला. त्यात त्यांनी 25 ऑक्‍टोबर 1754 च्या तहाने पोर्तुगीजांकडे सावंतवाडीकरांचा जो मुलुख होता, तो सर्व किंवा त्याचा काही भाग परत देण्याची पोर्तुगीज सरकारकडे शिफारस करण्याचे मान्य केले; मात्र पुढे तसे प्रत्यक्षात घडले नाही. 1761 मध्ये सावंतांनी पुन्हा पोर्तुगीजांवर स्वारी केली. यात पेडणे, डिचोली, साखळी ही ठाणी पुन्हा हस्तगत केली. याच काळात सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने आताच्या गोव्याच्या हद्‌दीत एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे पेडणे महालाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या केरी येथील रहीवाशी असलेल्या जीवाजी बल्लाळ उर्फ जीवबादादा बक्षी यांचा उदय. जीवबादादा हे अत्यंत पराक्रमी होते. त्याचबरोबर सावंतवाडी संस्थानात जन्मल्यामुळे संस्थानशी स्वामीनिष्ठ होते.

1756 मध्ये सोळा वर्षाचे असताना ते आपल्या भाग्याच्या शोधात केरी गाव सोडून निघाले. कोल्हापूरहून साताऱ्यात छत्रपतींच्या दरबारी पोहोचले. तेथे काही काळ त्यांनी नोकरी केली. 1761 मध्ये पानीपतची लढाई झाली. यात त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी गाजवलेला पराक्रम पेशव्यांच्याही मनात भरला. पानीपतहून परतल्यानंतर 1762 मध्ये पेशव्यांनी त्यांची ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या दरबारात त्यांचे सेनापती म्हणून नियुक्‍ती केली. तेथे त्यांनी अनेक पराक्रम गाजवले. यामुळे शिंद्यांच्या दरबारात त्यांचे महत्त्व वाढले. पुढे आयुष्यभर त्यांनी आपल्याला मिळालेल्या महत्त्वाचा आपले मुळ स्वामी असलेल्या सावंतवाडी राजघराण्यासाठी उपयोग केला.

हेही वाचा: सिंधुदुर्गात कोरोनाचा तांडव; तीस दिवसांत 5 हजार 350 बाधित

सावंतवाडीकरांची अनेक मोठी कामे जीवबादादामुळे सहज झाली. या सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते शिंदे घराणे आणि सावंतवाडीकरांचा जुळून आलेला नातेसंबंध. त्याकाळात शिंदे घराण्याच्या राजगादीवर महादजी शिंदेसारखे पराक्रमी पुरुष होते. त्यामुळे या घराण्याला आणि ग्वाल्हेर संस्थानाला एक शक्‍तीशाली सत्ताधीश अशी ओळख होती. या घराण्याचा सावंतवाडी संस्थानशी नाते संबंध जुळावा अशी जीवबादादा यांची इच्छा होती. महादजींचे बंधू जयाप्पा शिंदे यांची मुलगी लक्ष्मीबाई या त्यावेळी लग्नासाठी उपवर होत्या. त्यांचा विवाह खेमसावंत तिसरे यांच्याशी झाल्यास सावंतवाडीच्या दृष्टीने ती महत्त्वाची घटना ठरेल, असे केवळ जीवबादादाच नाही तर सावंतवाडी राजदरबारातील मुत्सदी सल्लागारांनाही वाटत होते. त्यांनीही जीवबादादांना तसा प्रयत्न करायला सांगितले होतेच. याच दरम्यान लक्ष्मीबाई यांच्या विवाहासाठी प्रयत्न सुरू झाले.

लक्ष्मीबाई यांच्या आई सखुबाई शिंदे यांनी महादजी यांना पत्र लिहून आपल्या मुलीच्या लग्नाविषयी लिहिले होते. योगायोगाने महादजींनी ही गोष्ट जीवबादादांना सांगितली. यावेळी जीवबादादांनी क्षणाचाही विलंब न करता सावंतवाडीचे सरदेसाई खेमसावंत तिसरे हे आपल्या पुतणीसाठी योग्य वर आहेत. तुम्ही कोकणात आपले दूत पाठवून खात्री करून घ्यावी असे सांगितले. महादजींनी आपली माणसे सावंतवाडीत पाठवली. जीवबादादांनी ही माहिती सावंतवाडी संस्थानातील मुत्सदी सल्लागार असलेल्या नरोबा व इतर मंडळींना कळवली. एकदिवशी दरबार भरवून शिंदे यांच्याकडून आलेल्या लोकांची आणि राजघराण्याची भेट घडवून आणण्यात आली. महादजी शिंदे यांचा हेतू राजेसाहेब, राजमाता आणि इतर मंडळींना सांगण्यात आला. अर्थातच त्याला होकार मिळाला. पुढे ही मंडळी ग्वाल्हेरला गेली आणि सावंतवाडीकरांचा होकार कळवला. शिवाय सावंतवाडीच्या दरबाराची बरीच तारीफ केली.

महादजी शिंदे आणि त्यांची भावजय सखुबाई यांना हे स्थळ पसंत पडले. पुढे 1763 मध्ये शिंदे घराण्याचे मुळ जहांगीरीचे गाव असलेल्या श्रीगोंदे येथे खेमसावंत तिसरे आणि लक्ष्मीबाई यांचे लग्न थाटामाटात झाले. त्यावेळी राजांचे वाय चौदा वर्षांचे होते. पुढे खेमसावंत तिसरे यांची आणखी तीन लग्न झाली. दुर्गाबाई, नर्मदाबाई आणि सावित्रीबाई अशी त्यांच्या पत्नींची नावे. यातील दुर्गाबाई या धारराव खानवीलकर यांच्या कन्या, नर्मदाबाई या मानसिंगराव सुरवे तर सावित्रीबाई या हनमंतराव घाटगे यांच्या कन्या.

हेही वाचा: सिंधुदुर्गात ऑक्सीजन स्फोटची 'ती' अफवाच

कुडाळचे महत्त्व मोठे

सिंधुदुर्गाच्या इतिहासात कुडाळचे महत्त्व मोठे आहे. याचे संदर्भ या आधीच्या लेखात वारंवार आले आहे. कुडाळ प्रांताची देशमुखी पाहणाऱ्या घराण्याचे मुख्य ठाणे कुडाळ शहरातच होते. या शहराने अनेक लढाया पाहिल्या. याच्या केंद्रस्थानी कुडाळमधील भुईकोट होता. हे स्थान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हा भुईकोट आदिलशाहीच्या काळात उभारला गेला. तो कुडाळ परगण्यातील मोक्‍याचा मानला जाई. वेंगुर्ले, मालवण आणि राजापूर या विजापूरच्या अधिपत्याखालील महत्त्वाची बंदरे होती. यातील वेंगुर्ले आणि मालवणवर याच कोटातून नियंत्रण चाले. आता या ठिकाणी घोडेबाव ही एक प्राचीन विहीर, जुन्या बांधकामाचे अवशेष आदी आहेत. भुईकोटाचा पडकोट किंवा मुख्य कोटाचा तट यापैकी फारसे काही शिल्लक नाही. या परीसरात भुईकोटातील इमारत मात्र सुस्थितीत आहे. त्यात सध्या न्यायालयाचे कामकाज चालते

loading image