
Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत रविवारी (२६ जानेवारी) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने दणदणीत विजयाची नोंद केली. नाशिकला झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बडोदा संघाला तब्बल ४३९ धावांनी पराभवाचा धक्का दिला. महाराष्ट्राचा हा ६ सामन्यांतील केवळ दुसराच विजय आहे.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राची कामगिरी फारशी चांगली झाली नव्हती. परंतु, दुसऱ्या टप्प्यात बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राने सर्व विभागात उल्लेखनीय कामगिरी केली. ऋतुराजनेही गोलंदाजांचा योग्य वापर करत बडोद्यावर सातत्याने दबाव ठेवण्यात यश मिळवले. महाराष्ट्राच्या विजयात सौरभ नवलेने मोलाचा वाटा उचलला.