INDvsAUS : स्मिथच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला तारले; भारतापुढे 287 धावांचे आव्हान

टीम ई-सकाळ
Sunday, 19 January 2020

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्याने टीम इंडियापुढे पेच निर्माण झाला आहे.

बंगळूर : ऑस्ट्रेलियाचा तुफान फलंदाज स्टीव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांचा टिच्चून सामना करत शतकी खेळी साकारली. याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 287 धावांचे आव्हान उभारले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार अॅरॉन फिंचने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा अडथळा मोहम्मद शमीने दूर करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला स्टिव्ह स्मिथ आणि कर्णधार अॅरॉन फिंच ही जोडी जमताना दिसत होती. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या नादात उडालेल्या गोंधळाने फिंचचा बळी घेतला. जडेजा आणि मोहम्मद शमीने त्याला रण आउट केले. 

- Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मुलींचा ठसा

त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या लबुश्चेंगने स्मिथच्या जोडीने डावाला आकार दिला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्याला जास्त काळ मैदानावर तग धरता आला नाही. जडेजाने टाकलेल्या एका चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने त्याचा अफलातून कॅच पकडला. लबुश्चेंगने 64 चेंडूत 5 चौकारांच्या साहाय्याने 54 धावांची खेळी केली. 

- 'धक्के मारून बाहेर काढल्याशिवाय धोनी काही जात नाही'; अभिनेत्याची टीका

स्टीव्ह स्मिथने एका बाजूने किल्ला लढता ठेवला होता.  त्याने शतक पूर्ण केल्यानंतर मोठे फटके खेळण्यास सुरवात केली. या खेळीदरम्यान त्याने 4000 धावांचा टप्पाही गाठला. मात्र, या नादात तो बाद झाला. 132 चेंडूत 131 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. 

- धोनीला करारातून वगळण्याबाबत दादाचे 'नो कमेंट्स प्लीज'!

स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे एका पाठोपाठ एक फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. शेवटी 50 षटकांत कांगारुंची मजल 286 धावांपर्यंत पोहोचली. त्यांनी टीम इंडियापुढे 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाल्याने टीम इंडियापुढे पेच निर्माण झाला आहे. मात्र, आता टीम इंडिया याचा कसा सामना करते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsAUS Steve Smith ton lifts Australia to 286 vs India