
रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे.
मात्र, सलग १३ व्या वर्षी मुंबई इंडियन्सने त्यांच्या हंगामातील पहिला सामना पराभूत झाला आहे. २०१३ पासून एकदाही मुंबई इंडियन्सला पहिला सामना जिंकता आलेला नाही.
दरम्यान, रविवारी नियमित कर्णधार हार्दिक पांड्यावर गेल्यावर्षीच्या स्लो ओव्हर रेटच्या नियमाअंतर्गत एका सामन्याची बंदी असल्याने तो मुंबई इंडियन्ससाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार यादवने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. दरम्यान, सामन्यानंतर सूर्यकुमारने मुंबई इंडियन्सच्या पराभवामागील कारणही सांगितले.