MI vs LSG : मुंबईच्या पराभवाचे 'अष्टक' पूर्ण | IPL 2022 Mumbai Indians Lost | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Mumbai Indians Lost There 8th Match

MI vs LSG : मुंबईच्या पराभवाचे 'अष्टक' पूर्ण

मुंबई : लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 36 धावांनी पारभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. मुंबई इंडियन्सने आपले पराभवाचे अष्टक पूर्ण केले. लखनौने केएल राहुलच्या (KL Rahul) नाबाद 103 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईसमोर 169 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईला हे आव्हान पेलवले नाही. त्यांनी 20 षटकात 8 बाद 132 धावा केल्या. मुंबईकडून सर्वाधिक धावा रोहित शर्माने केल्या (39) त्यानंतर तिलक वर्माने देखील 38 धावांचे योगदान दिले. लखनौकडून क्रुणाल पांड्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

हेही वाचा: MI vs LSG : मुंबईच्या पराभवात लखनौने पडू दिला नाही खंड; पाहा Highlights

मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंटने ठेवलेल्या 169 धावांचे आव्हान पार करताना चांगली सुरुवात केली. सलामी जोडी इशान किशन आणि रोहित शर्माने मुंबईला 43 धावांपर्यंत पोहचवले. यात रोहितचा 31 तर इशानच्या 6 धावांचा वाटा होता. मात्र पॉवर प्लेनंतर कासवाच्या गतीने धावा करणारा इशान किशन रवी बिश्नोईला मोठा फटका मारण्याच्या नादात 20 चेंडू खाऊन फक्त 8 धावा करत माघारी फिरला.

त्यानंतर आलेल्या डेवाल्ड ब्रेविसने देखील 3 धावांची भर घालत पॅव्हेलियनची वाट धरली. दरम्यान, एकट्याच्या जीवावर संघाचे अर्धशतक धावफलकावर लावणारा रोहित शर्मा देखील बाद झाला. 39 धावा करणाऱ्या रोहितची शिकार त्याचा जुना सहकारी क्रुणाल पांड्याने केली. रोहित बाद झाल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादववर आली होती. मात्र त्याला आयुष बदोनीने अवघ्या 7 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

हेही वाचा: KL Rahul | 'दुबळ्या संघाविरूद्ध शतक करून काय फायदा?'

मुंबईची मधली फळी ढेपाळल्यानंतर आलेल्या कायरॉन पोलार्ड आणि तिलक वर्माने डाव सावरत अर्धशतकी (57) भागीदारी रचली. मात्र खेळपट्टी स्लो होत गेल्याने त्यांना फटकेबाजी करण्यात अडचण येत होती. त्यामुळे धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेले. शेवटची दोन षटके राहिली असताना तिलक वर्मा 26 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर क्रुणाल पांड्याने अखेरच्या षटकात पोलार्ड (19) आणि सॅम्सला बाद करत मुंबईला 20 षटकात 8 बाद 132 धावात रोखले.

मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करत लखनौ सुपर जायंटला धक्के देण्यास सुरूवात केली. जसप्रीत बुमराहने क्विटंन डिकॉकला (10) बाद करत लखनौला धक्के देण्यास सुरूवात केली. त्यानंतर केएल राहुलने मनिष पांडेबरोबर भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र कायरॉन पोलार्डने पांडेला (22) बाद करत ही जोडी फोडली.

हेही वाचा: एका IPL बोलीने क्लार्कबरोबरची मैत्री तुटली; सायमंट्सने केला खुलासा

दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट पडण्याची सिलसिला सुरूच होता. डॅनियल सॅम्सने स्टॉयनिसला शुन्यावर बाद केले. पाठोपाठ पोरार्डने जुना सहकारी क्रुणाल पांड्याला बाद करत लखनौला अडचणीत आणले. त्यानंतर मेरेडिथनेही 10 धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला बाद करत लखनौची अवस्था 5 बाद 121 धावा अशी केली.

एका बाजूने पडझड सुरू असताना केएल राहुल मात्र एकाकी लढा देत होता. त्याने आयुष बदोनीला साथीला घेत शेवटच्या पाच षटकात 47 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, केएल राहुलने यंदाच्या हंगामातील आपले दुसरे शतकही पूर्ण केले. अखेर लखनौने 20 षटकात 6 बाद 168 धावांपर्यंत मजल मारली. त्यात केएल राहुलच्या 103 धावांचा सिंहाचा वाटा होता.

Web Title: Ipl 2022 Mumbai Indians Lost There 8th Match In A Row Lucknow Super Giants Kl Rahul Shine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top