जडेजा, पुजारासह पाच क्रिकेटपटूंना उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नोटीस; काय झालंय नेमकं?

pujara jadeja
pujara jadeja

नवी दिल्लीः आपल्या ठावठिकाणाबद्दल माहिती न दिल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजासह पाच क्रिकेटपटूंना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात माहिती देण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट मंडळाने योग्य प्रकारे पार न पाडल्याचा फटका या खेळाडूंना बसणार आहे. भारतीय मंडळाने पासवर्डचा गोंधळ झाल्यामुळे हे घडले असल्याचे सांगितले आहे; पण यामुळे या खेळाडूंवर बंदी येऊ शकते.

पुजारा, जडेजासह केएल राहुल, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा या क्रिकेटपटूंना ही नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडे उत्तेजक चाचणीबाबतची पूर्ण नोंदणी असलेले 110 खेळाडू आहेत. त्यात या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. त्यांना आपला तीन महिन्यांचा ठावठिकाणा कळवणे बंधनकारक असते. भारतीय मंडळाने खेळाडूंच्यावतीने नोटीसला उत्तर दिले आहे.

उत्तेजक प्रतिबंधक प्रशासकीय आणि व्यवस्थापन यंत्रणेच्या सॉफ्टवेअरमध्ये ठावठिकाणा सांगण्याचे दोन पर्याय असतात. एकंदर क्रीडापटू हे काम करतात; अथवा त्यांची संघटना हे काम करते. खेळाडूंना संगणकाबाबत पुरेशी कल्पना नसल्याने तसेच सर्वच ठिकाणी इंटरनेट सुविधा चांगली नसल्याने हे काम संघटनांनी करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संघटना अनेकदा खेळाडूंच्या वतीने ही जबाबदारी घेतात. क्रिकेटपटूंनाही प्रसंगी ही प्रक्रिया पूर्ण करणे जमत नाही किंवा त्यांना वेळ नसतो. त्यामुळे हे काम त्यांच्या महासंघाने अर्थातच भारतीय क्रिकेट मंडळाने करण्याचे ठरवले आहे, असे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे उपसंचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.

नोटीस दिलेल्या पाच खेळाडूंचा आगामी ठावठिकाणाच भारतीय मंडळाने तीन महिने कळवला नाही, हेच यातून लक्षात येते. यासंदर्भात भारतीय मंडळाने पासवर्ड काम करीत नसल्याचे कारण दिले आहे. आता तो प्रश्न सुटला असल्याचे सांगितले आहे. हे कारण आम्ही समजू शकतो. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आता ठावठिकाणा तीन वेळा न कळवल्यास तीन वर्षांची बंदी येऊ शकते. आता भारतीय मंडळाने कळवलेला खुलासा हे तीनपैकी एकाबाबत कारण मानले जाणार का, याबाबतचा निर्णयही होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात भारतीय मंडळ काय करते, यावरही अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.  

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचे याबाबतचा नियम स्पष्ट आहे. ठावठिकाणा तीनदा न कळवल्यास उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचा एकदा भंग केल्याचे मानले जाते आणि त्याबद्दल दोन वर्षांची बंदी आहे. आता हा विचार केल्यास पासवर्ड काम करीत नसल्याचा प्रश्न सोडवण्यास एवढे दिवस का लागले, याबाबत भारतीय मंडळ काहीही बोलण्यास तयार नाही.

खेळाडूंना सूचना का दिली नाही?
एकंदर सर्व प्रकरणावर नजर टाकल्यास भारतीय क्रिकेटपटूंनी आपला ठावठिकाणा लॉकडाऊनच्या कालावधीत कळवला नसल्याचे लक्षात येते. आता या कालावधीत कोणताही दौरा नसल्याने खेळाडू एकाच मुक्कामी असणार, हे स्पष्ट होते. त्यातील अनेक जण समाजमाध्यमांवर चांगलेच कार्यरत होते. मात्र, इन्स्टाग्राम आणि पॉडकॉस्टवरील खेळाडूंच्या पोस्ट पाहून त्यावरून निष्कर्ष काढू नका, हे काम अनेकदा त्यांचे एजंट करीत असतात, असे भारतीय मंडळाचे पदाधिकारी सांगतात. मात्र, त्यानंतरही पासवर्डचा प्रश्न असल्याने तुमचा ठावठिकाणा कळवता येत नाही, त्यामुळे तुम्ही हे काम करावे, हे भारतीय मंडळाने खेळाडूंना का कळवले नाही, अशी विचारणा काही वरिष्ठ क्रिकेट पदाधिकारी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com