मार्गदर्शकांबरोबर करार संपला आहे, संपवलेला नाही; राही सरनोबतचे स्पष्टीकरण

rahi.
rahi.

मुंबई ः मुनखबयार दॉर्जसुरेन यांच्याबरोबरील माझ्या कराराची मुदत संपली आहे. आम्ही करार संपवलेला नाही. सध्याच्या अनिश्‍चिततेच्या परिस्थितीत करार नव्याने केलेला नाही, मी मार्गदर्शकांना सोडले आहे, असे राही सरनोबतने स्पष्ट केले. ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहीने रिओ ऑलिंपिकनंतर काही महिन्यांतच मुनखबयार यांची नियुक्ती केली होती. त्या मार्गदर्शक असताना राहीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासीक कामगिरी केली; तसेच गतवर्षी म्युनिच विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेत
ऑलिंपिक पात्रता निश्‍चित केली होती. मात्र सध्या मुनखबयार या राहीच्या मार्गदर्शक नाहीत.

माझा करार संपला आहे, मी मार्गदर्शकांपासून वेगळी झाली आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. माझा करारच तेवढा होता. हा करार 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी होता. आणि सध्याची परिस्थिती इतकी वेगळी आहे, की तो करार एका वर्षासाठी वाढवावा की नाही, याबाबत मी विचार केलेला नाही, एवढेच मी सांगत आहे, असे राहीने सांगितले.

ऑलिंपिक होणार हे निश्‍चित झाल्यावर मी नव्याने करार करण्याबाबत विचार करू शकेन. आवश्‍यकता वाटली तरी त्यांच्याबरोबर चर्चाही करणार आहे. आत्ता त्याबाबत कसे काही सांगणार. सध्याची परिस्थितीच वेगळी आहे. डिसेंबरपर्यंत कोणतीही स्पर्धा नाही. सराव कधी सुरू होईल, याची खात्री नाही. या परिस्थितीत कोणता निर्णय घ्यायला हवा होता, अशी विचारणा राहीने केली.

आता समजा करार केलाच, तर मार्गदर्शक मुनखबयार सध्या भारतात येऊ शकणार नाहीत, किंवा मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. परदेशात जाऊन सराव करणे दूर राहिले. भारतातच असलेल्या नेमबाजांचे सराव शिबिरही सुरू झालेले नाही. आता आमच्यातील करार संपला आहे. तो नव्याने करायचा ठरवला, तर त्याची औपचारिकता पूर्ण कशी करणार, कार्यालयेही कुठे सुरू आहेत. ती प्रक्रियाही दीर्घ आहे, याकडे राहीने लक्ष वेधले.


आमच्यातील करार हा आपोआपच संपला आहे. ऑलिंपिक झाले असते, तर त्यानंतर हा करार संपणारच होता. त्या वेळी काही राहीने करार केला नाही, असे आपण म्हटले नसते.
- राही सरनोबत, भारतीय नेमबाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com