महिला क्रिकेट संघाची भरारी...

शिवराम गोपाळ वैद्य
शुक्रवार, 21 जुलै 2017

या वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. संघाची कर्णधार मिताली राज आणि तिच्या सहकारी चमूने या स्पर्धेमध्ये एकूणच चमकदार कामगिरी करून भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या तुलनेमध्ये महिलांचा संघही कुठे कमी नाही हे दाखवून दिले आहे.

या वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. संघाची कर्णधार मिताली राज आणि तिच्या सहकारी चमूने या स्पर्धेमध्ये एकूणच चमकदार कामगिरी करून भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या तुलनेमध्ये महिलांचा संघही कुठे कमी नाही हे दाखवून दिले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाकडे देशाने म्हणावे तेवढे कधीही लक्षच दिले नव्हते. पूर्वी सुद्धा महिला क्रिकेट संघामधील डायना एदलजी एवढे एकच नाव बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. बाकी या संघाची कर्णधार कोण आहे हेच बहुतेकांना ठाऊक नसतांना, इतर महिला खेळाडूंची आणि त्यातल्या त्यात संघाच्या प्रशिक्षकांची नावे ठाऊक असण्याचे काहीही कारण नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे महिला क्रिकेट संघाने कितीही चांगली कामगिरी केली तरी त्याला म्हणावे तेवढी प्रसिद्धी दिली जात नव्हती, त्यांच्यावर खास लेख लिहिले जात नव्हते, त्यांच्याबद्दल मिडियामध्ये चर्चा होत नव्हत्या. मात्र आता काळ बदलला आहे. आपल्या महिला संघाने सातत्यपूर्ण अशी कामगिरी करून देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. भले त्यांना प्रसिद्धी ना मिळो, विराट कोहली प्रमाणे भले त्यांची कर्णधार एका खास "गुरू" साठी अडून न बसो, भले त्या जाहिरातीत ना चमको, भले त्यांच्यावर लेख ना येवोत, भले विराट कोहलीप्रमाणे त्यांचे चोचले पुरवले न जावोत, तरीही या सर्वांवर मात करून या महिला संघाने देशाला त्यांची दखल घेण्यास भागच पाडले आहे.

एका पत्रकाराने मिताली राज ला असा प्रश्न विचारला होता की, तिला पुरुष क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूचा खेळ आवडतो? यावर मिताली राज ने बाणेदार उत्तर दिले होते की असा प्रश्न तुम्ही कधी पुरुष संघातील खेळाडूंना केला आहे काय? या खेळाडूंनी आणि प्रसिद्धी माध्यमांनीही महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या कामगिरीची कधी दखल तरी घेतली आहे काय? असो. या भारतीय महिला संघाला अशाच देदीप्यमान यशासाठी देशवासीयांच्या खूप खूप शुभेच्छा !

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news indian women cricket team