INDvsAUS: टीम इंडियाची मापं काढणाऱ्यांचे दात घशात!

टीम ई-सकाळ
Tuesday, 19 January 2021

ब्रिस्बेनमधील मॅच जिंकत भारताने इतिहास रचला. ३ विकेटने कांगारुंना त्यांच्याच देशात धूळ चारली.

INDvsAUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवत भारतानं इतिहास घडवला. आणि गब्बाच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची विजयी मालिका खंडीत केली. अनेक अडखळे पार करत विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सपाटून मार खाणाऱ्या टीम इंडियावर चोहोबाजूंनी टीका केली होती. पण त्यानंतर अजिंक्य रहाणेने टीम इंडियाची धुरा सांभाळत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंसह तेथील मीडियानेही टीम इंडियावर टीका करत तुम्ही वाईटरित्या मालिका हरणार याचाच पाढा गिरवला होता. 

'पडोसन'ला इम्प्रेस करण्यासाठी विराट घेतोय धोनीचा सल्ला; पाहा व्हिडिओ!​

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क म्हणाला होता की, विराट कोहलीशिवाय टीम इंडियाची बॅटिंग लाइन-अपची तुम्ही कल्पना करू शकता का? ते (टीम इंडिया) खूप अडचणीत आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे क्लीन स्वीपची चांगला संधी आहे. कोहली खेळणार नाही. त्यामुळे टॉस केल्यानंतर त्यांच्याकडे खेळ पुढे घेऊन जाणारा कुणीही नाही, असं ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक वेळा विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या रिकी पाँटिंगचं मत पडलं.

या दोघांचा सूर मार्क वॉने आळवला. टीम इंडिया ही मालिका ४-०ने पराभूत होईल. मला काही कळत नाही भारत कसं पुनरागमन करणार? ऑस्ट्रेलिया ४-०ने मालिका जिंकेल. तर ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर ब्रॅड हॅडिन म्हणाला, मी विचार करतो की, भारताकडे केवळ एकाच ठिकाणी मॅच जिंकण्याची शक्यता आहे ती अॅडलेडवर. त्यानंतर त्यांच्याकडे कोणतीही संधी नाही, असं मला वाटतं. तर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनने टीम इंडिया कसोटी मालिका हरणारच आहे, असं म्हटलं होतं. 

INDvsAUS : 'मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर राहुल द्रविड!'​

याची दखल प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनीही घेतली आहे. ऑस्ट्रेलिया खेळाडूंना महिंद्रा यांनी जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले, 'तुम्ही तुमच्या शब्दांना कसे खाऊ इच्छिता? ग्रिल्ड, फ्राइड, बेक केलेला, चपाती की डोशामध्ये गुंडाळून?'

दरम्यान, ब्रिस्बेनमधील मॅच जिंकत भारताने इतिहास रचला. ३ विकेटने कांगारुंना त्यांच्याच देशात धूळ चारली. ऋषभ पंत ने नाबाद ८९ रन्सची केलेली खेळी या विजयात महत्त्वाची ठरली. तसेच शुभमन गिल (९१ धावा), मोहम्मद सिराज, अजिंक्य रहाणे हे विजयाचे शिल्पकार ठरले. ५६ धावांसाठी २११ चेंडूंचा सामना करणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा उल्लेख इथं आवर्जून करावा लागेल. कारण त्यानंही निकरानं बालेकिल्ला लढवत ठेवला होता. 

भारताला कधीच कमी समजू नका, पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कोच जस्टिन लँगरचा सल्ला​

गाबा क्रिकेट ग्राउंडवर ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रमही टीम इंडियाच्या नावावर जमा झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासात भारताने हा तिसरा सर्वात मोठा रनचेस करत विजय मिळवला आहे. गाबाच्या मैदानावर कांगारुंचा संघ ३२ वर्षांत कधीही पराभूत झाला नाही, पण टीम इंडियाच्या शिलेदारांनी हा पराक्रम करत ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखायला लावली. 

- क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team India responded to the critics with a historic victory over Australia