U19 CWC Final : टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; बांगलादेशने पटकावलं पहिलं जेतेपद!

Team-Bangladesh
Team-Bangladesh

पोचेस्ट्रुम : संपूर्ण स्पर्धेत प्रामुख्याने फलंदाजीत दिमाखदार कामगिरी करणारी भारतीय फलंदाजी अंतिम सामन्यात ठेपाळली. परिणामी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. परिस्थिती अवघड झालेली असली तरी अखेपर्यंत लढा देणाऱ्या बांगलादेशने पहिल्यांदा विजेतेपद मिळवले. 

उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या 172 धावांचे आव्हान एकही फलंदाज न गमावता पार करणारा भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात मात्र 177 धावांत गारद झाला. यशस्वी जैसवाल एकाकी लढत असताना त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. बांगलादेशने हे आव्हान तीन विकेटने पार केले पण अंतिम क्षणी आलेल्या पावसामुळे आणि परिणामी डकवर्थ लुईसच्या आकडेवारीने बांगलादेशचा विजय सोपा झाला. 

केवळ 177 धावांचे पाठबळ असल्यामुळे बांगलादेशचा डाव गुंडाळण्याशिवाय पर्याय नव्हता त्यातच बांगलादेशला 50 धावांची सलामी मिळाली होती, परंतु त्यानंतर बिष्णोईच्या लेगस्पिन माऱ्याने बांगलादेशचे एकेक फलंदाज बाद होत गेले. त्यांचा निम्मा संघ 85 धावांत बाद झाला तेव्हा भारतालाही विजयाची समान संधी मिळाली होती. कमालीचा संघर्ष सुरु असताना सलामीवीर परवेझ इमोन आणि अकबल अली यांनी सातव्या विकेटसाठी 41 धावांनी भागीदारी करून सामना बांगलादेशच्या बाजूने झुकवला. 

15 ऐवजी 7 धावांचे आव्हान 

पावसाची लक्षणे दिसू लागताच बांगलादेशने खेळ संथ केला कारण त्यावेळी डकवर्थ लुईसच्या आकडेवारीत ते पुढे होते. 15 धावांची त्यांना गरज असताना पाऊस आला आणि सामना काही काळ थांबल्यामुळे 30 चेंडूत सात धावांची गरज असे नवे समिकरण तयार झाले आणि बांगलादेशचा काम सोपे झाले. 

तत्पूर्वी, येथे गेले दोन दिवस रात्री पाऊस पडत होता, त्यामुळे आज सकाळी सूर्यप्रकाश असला तरी प्रथम फलंदाजी सोपी नव्हती. त्यातच भारतीय कर्णधार प्रियम गर्गने नाणेफेक गमावली, त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्याची वेळ भारतावर आली. 

यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. अवघड परिस्थिती सांभाळली होती. येथून पुढे धावांचा वेग वाढवला जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार इतक्‍यात वर्मा बाद झाला. त्यानंतर लगेचच कर्णधार प्रियम गर्ग माघारी फिरला, त्यामुळे पुन्हा दडपण आले. यशस्वी 88 धावांवर तो बाद झाला त्यानंतर भारताचा हा पुढचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. अखेरच्या सहा फलंदाजांपैकी एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. 

संक्षिप्त धावफलक :

भारत : 47.2 षटकांत सर्व बाद 177 (यशस्वी जैसवाल 88- 121 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, तिलक वर्मा 38- 65 चेंडू, 3 चौकार, ध्रुव जुरेल 22, शोरिफुल इस्लाम 10-1-31-2, तन्झिम शकिब 8.2-2-28-2, अविषेक दास 9-0-40-3) पराभूत वि. बांगलादेश : 42.1 षटकांत 7 बाद 170 (डकवर्थ लुईसनुसार विजयी) (परवेझ इमोन 47, अकबर अली 43, सुशांत मिश्रा 7-0-25-2, रवी बिष्णोई 10-3-30-4)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com